खडकाळ माळरानावर उभी राहणार ‘आयटी’ क्षेत्रातील ‘बाप’ कंपनी! पारेगावच्या अप्रवासी भारतीयाचा प्रयोग; शेतकर्यांच्या मुलांची स्वप्नं पूर्ण करण्याची धडपड..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
असं म्हणतात की, मनात आणलं तर जगात असाध्य असं काहीच नाही. महाराष्ट्राला तर अशक्य ते शक्य करुन दाखवणार्यांची मोठी परंपराच लाभली आहे. याच परंपरेत आता संगमनेर तालुक्यातील एका ध्येयवेड्या अप्रवासी भारतीयाचीही भर पडली आहे. अमेरिकेत आपली आयटी कंपनी चालवणार्या मुळच्या तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील रावसाहेब घुगे या तरुणाने आता आपल्या गावातच अशी कंपनी उभी करण्याचा चंग बांधला आहे. विशेष म्हणजे ज्या भागात प्यायच्या पाण्यासाठीही मारामार असते, अशा पारेगाव खुर्दच्या खडकाळ माळरानावर जवळजवळ उभी राहीलेली या कंपनीची भव्य इमारत संपूर्ण पंचक्रोशीची मान उंचावणारी ठरत आहे. शेतकर्यांच्या उच्चशिक्षित मुलांचे आयटी कंपन्यांमध्ये काम करण्याचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण या कंपनीची स्थापना करीत असल्याचे प्रांजळ मतही घुगे सहज व्यक्त करतात.
नव्वदच्या दशकांत जागतिकीकरणातून देशात माहिती आणि तंत्रज्ञानाची कवाडे उघडली गेली. त्याचा परिणाम देशातील व्यावसायिक शिक्षणात स्पर्धा सुरु झाली. शिक्षणातून या क्षेत्रात काम करणार्यांना जागतिक पातळीवरील कंपन्यांमध्येही संधी उपलब्ध होवू लागल्याने महानगरांमध्ये या क्षेत्रातील शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध झाले. मात्र या धांदलीत ग्रामीणभाग मात्र मागेच राहीला. त्यातही माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भविष्य घडविण्याचे स्वप्नं पाहून शेतकरी, कष्टकरी व सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांनीही त्याला पुरक असलेले शिक्षण प्राप्त केले. मात्र महानगरांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्यांच्या शिक्षणाचा दर्जा जोखला जावू लागल्याने आणि बहुतेक शेतकरी आपल्या मुलांना परदेशी अथवा बाहेरगावी नोकरीसाठी पाठवण्यास राजी नसल्याने अशा मुलांचे आयटी क्षेत्रात काम करण्याचे स्वप्नं स्वप्नंच ठरले. अर्थात अशा सर्व अडथळ्यांची शर्यत ओलांडून आज अनेक महाराष्ट्रीयन ग्रामीण विद्यार्थी या क्षेत्रात कार्यरतही आहेतच.
मात्र हा टक्का खूपच कमी असल्याची सल तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील रावसाहेब घुगे या तरुणाला कायम सतावत होती. या तरुणानेही महानगरांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आपले शिक्षण पूर्ण केले. अमेरिकन स्थित कंपनीत सुरुवातीची काही वर्ष काम केल्यानंतर त्याने तेथेच आपली स्वतःची बिझनेस अॅप्लिकेशन अॅण्ड प्लॅटफॉर्म अर्थात ‘बाप’ ही कंपनी सुरु केली. अल्पावधीतच या कंपनीने अमेरिकेत चांगलाच जम बसविला. सर्वकाही मनासारखे झाल्यानंतर या तरुणाच्या मनातील ती ‘सल’ त्याला पुन्हा अस्वस्थ करु लागली. त्यामुळे अमेरिकेत कार्यरत असतांनाच त्याने मनोमन ध्येय बाळगले आणि त्यादृष्टीने त्याची पूर्तता करण्यास सुरुवात केली. त्याचे ध्ये एकच आहे, संगमनेर व अकोले तालुक्यासारख्या ग्रामीणभागातील विद्यार्थी मोठ्या परिश्रमाने शिक्षण घेतात. मात्र त्यांना अपेक्षित नोकरी मिळत नसल्याने त्यांच्या कष्टाचे चीज होतं नाही. हाच विचार घेवून हा तरुण वाशिंग्टनहून थेट पारेगाव खुर्दमध्ये पोहोचला.
त्याने जेव्हा आपला विचार आपल्या कुटुंबातील सदस्यांना, गावातील प्रमुख लोकांसह मित्रांना सांगितला तेव्हा त्या प्रत्येकाच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहीले. मात्र मनात आणलं तर जगात असाध्य असं काहीच नाही या उक्तीवर या ध्येयवेड्या तरुणाचा पूर्ण विश्वास असल्याने त्याने अमेरिकेत कमावलेला पैसा पारेगाव खुर्दच्या खडकाळ माळरानावरच पेरण्याचा मनोमन पक्का विचार केला आणि त्याच्या बिझनेस अॅप्लिकेशन अॅण्ड प्लॅटफॉर्म (बाप) या कंपनीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. सद्यस्थितीत या कंपनीचे बांधकाम पूर्ण झाले असून इमारतीच्या सुशोभिकरणासह फर्निचरचे काम सुरु होत आहे. पुढील तीन ते चार महिन्यांतच ही इमारत पूर्ण होवून तालुक्याच्या खडकाळ माळरानावर जिल्ह्यातील पहिली माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘बाप’ कंपनी उभी राहणार आहे. कंपनीचे कार्यालयीन कामकाज सुरु होण्यास अजून काहीसा अवधी असला, तरीही कंपनीद्वारा काही प्रकल्पावरील काम सुरु झाले असून त्यासाठी संगमनेर, अकोले व सिन्नर तालुक्यातील एकूण 45 विद्यार्थ्यांना नोकरीवर घेण्यात आले असून सध्या ते घरातूनच (वर्क फ्रॉम होम) काम करीत आहेत.
चारशे वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यावेळी अवघ्या हिंदुस्थानावर परकियांचे जुलमी साम्राज्य विस्तारलेले होते. अशा महाभयानक काळात अवघ्या बारा वर्षांच्या शिवरायांनी रायरेश्वराच्या शिवलिंगावर स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि केवळ पन्नास वर्षांच्या आयुष्यात हिंदवी स्वराज्य निर्माण केले. सह्याद्रीच्या खडकाचा हाच बाणा मनात बाळगून आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेवून पारेगाव खुर्दच्या रावसाहेब घुगे या अवघ्या सदतीस वर्षाच्या ध्येयवेड्या तरुणाने असाध्य ते साध्य करतांना माळरानावर आपल्या कंपनीची भव्य वास्तू उभारली असून या इमारतीने पाण्यासाठी भटकंती करणार्या पारेगाव खुर्दची उंची वाढवली आहे.
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र त्यापासून शेतकर्यांची व ग्रामीण भागातील मुलं नेहमीच मागे राहतात. पारेगाव खुर्दमध्ये त्यासाठीच मी बाप नावाची आयटी कंपनी उभी करीत आहे. या कंपनीत शेतकर्यांच्या मुलांनाच प्राधान्य दिले जाणार असून त्यांना योग्य प्रशिक्षणासह कंपनीत नोकरीही दिली जाणार आहे. त्यामुळे संगमनेर व अकोले तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीणभागातील उच्चशिक्षित तरुणांचे आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्नंही पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे.
– रावसाहेब घुगे
संचालक : बिझनेस अॅप्लिकेशन अॅण्ड प्लॅटफॉर्म (बाप)