विद्यमान नगरसेविकेसह चौघांकडून चक्क शिक्षणसंस्थाच लाटण्याचा प्रयत्न! न्यायालयाच्या आदेशान्वये चौघांवर फसवणूकीसह कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बनावट कागदपत्रे, दस्त व शिक्के तयार करुन सहाय्यक धर्मदाय आयुक्तांची दिशाभूल करीत संगमनेर तालुक्यात नावारुपाला आलेली चक्क शिक्षण संस्थाच गिळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेच्या ‘खर्या’ अध्यक्षांच्या तक्रार अर्जावरुन संगमनेरच्या कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने संगमनेर नगर पालिकेच्या विद्यमान नगरसेविकेसह तिचा पती आणि अन्य दोघांवर संगनमत करुन कटकारस्थान रचणे, ठकबाजी करणे, खोटे दस्तावेज व शिक्के तयार करण्यासह विविध कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे वीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संस्थेत संबंधित नगरसेविकेचा आणि तिच्या पतीचा दुरान्वयेही संबंध नसतांना त्यांनी परस्पर संस्थेच्या ‘विशेष’ बैठका बोलावून सदरचे षडयंत्र साधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

याबाबत तालुक्यातील वडगावपानच्या नजीर इस्माईल तांबोळी यांच्या तक्रारीवरुन संगमनेरच्या कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तक्रारदाराचे बंधु करीम तांबोळी यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी तालुक्यात आलाईड एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. सन 2002 साली अहमदनगरच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात या संस्थेची अधिकृत नोंदही करण्यात आली होती. त्यावेळी करीम तांबोळी हे स्वतः संस्थेच्या अध्यक्षस्थानी होते तर, फक्रुद्दिन अलीसाहेब जानबार शेख, वसीम करीम तांबोळी (रा.लोणी), खान महंदम मुशरफ खैराती (रा.मुंबई), महंमद आरिफ महंमद हानिफ (रा.मनमाड) व बशीर अहमद शेख (रा.कोपरगाव) आदी पाच जणांची सदस्य म्हणून नोंद करण्यात आली आली होती.

समनापुर येथे सुरु झालेल्या आलाईड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने संस्थेने संगमनेरमध्ये भाड्याची जागा घेवून पहिलीपासून वर्ग असलेली इंग्रजी माध्यमातील शाळा सुरु केली. याच दरम्यान सन 2007 साली संस्थेच्या विश्वस्त मंडळातील इलियाज इब्राहिम जोड, फक्रुद्दिन अलीसाहेब जानबार शेख व रफिक अंजुमन अब्दुल खलील अन्सारी यांनी आपल्या विश्वस्तपदाचे राजीनामे कार्यकारी मंडळाकडे सोपविले, त्यानुसार ते मंजूर करण्यात आले. त्या दिवसानंतर या तिघांचाही संस्थेशी कोणताही संबंध राहीला नव्हता. त्यानंतर संस्थेने रिक्त झालेल्या जागांवर नूतन सदस्यांची निवड करण्यासाठी सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे नोव्हेंबर 2014 मध्ये अर्ज केला, मात्र कागदपत्रांचा अपूर्ततेमूळे तो नामंजूर करण्यात आला.

त्यानंतर संस्थेने ऑगस्ट 2016 मध्ये विशेष बैठक बोलावून सन 2007 ते 2012 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्याचा ठराव करण्यात आला व तसा अर्ज धर्मदाय आयुक्तांना पाठविण्यात आला. त्या अर्जाची चौकशी व तपासणी करुन धर्मदाय आयुक्तांनी जुलै 2017 मध्ये तो मंजूर केला. त्यानुसार संस्थेने 2017 मध्ये उपाध्यक्ष म्हणून नजीर इस्माईल तांबोळी, सचिव म्हणून वसिम करीम तांबोळी (दोघेही रा.वडगावपान) व खान महंमद मुशर्रफ खैराती (रा.मुंबई) अशा तिघांची नव्याने नियुक्ति करण्यात आली. मात्र याच कालावधीत संस्थेचे अध्यक्ष करीम इस्माईल तांबोळी यांना कर्करोगाने ग्रासल्याने त्यांच्याकडून धर्मदाय आयुक्तांना पाठवायच्या बदल अर्जास विलंब झाल्याने तो 5 ऑक्टोबर 2019 मध्ये पाठविण्यात आला. 2007 ते 2019 या बारा वर्षांत संस्थेचे अध्यक्ष म्हणून करीम तांबोळी हेच कामकाज सांभाळीत होते व संस्थेचे सर्व दस्तावेज त्यांच्याच ताब्यात होते.

नूतन तीन सदस्यांचा बदल अहवाल धर्मदाय आयुक्तांकडे पाठविल्याच्या तारखेपासून चौथ्या दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबर 2019 रोजी संस्थेचे खाते असलेल्या संगमनेरातील एच.डी.एफ.सी बँक, स्टेट बँक व डि.सी.बी बँकेत सह्या बदलण्यासाठीचा अर्ज दाखल झाले. या तिनही बँकांनी याबाबत संस्थेचे अध्यक्ष करीम तांबोळी यांना कळविले. त्यांनी तात्काळ बँकेत जावून चौकशी केली असता शेख रईस अहमद (विद्यमान नगरसेविकेचा पती) यानेच ते अर्ज दाखल केल्याचे त्यांना समजले. त्याच्या दुसर्याच दिवशी 10 ऑक्टोबर 2019 रोजी तांबोळी यांनी नगरला जावून धर्मदाय आयुक्तांकडे जमा झालेल्या कागदपत्रांची चौकशी केली असता त्यांना अत्यंत धक्कादायक बाब समजली.

त्या कागदपत्रांनुसार संस्थेचे कधीही सचिव नसलेल्या व 2007 मध्येच संस्थेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिलेल्या फक्रुद्दिन अलीसाहेब जानबार शेख यांच्या बनावट सहीने 27 जुलै 2018 रोजी संस्थेची विशेष बैठक बोलावण्यात आल्याचे दाखवण्यात आले व संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसह अन्य विषयांचा त्यात समावेश करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यासाठी बैठकीचे खोटे प्रोसिडींगही तयार केले गेले. हा सिलसिला पुढेही अव्याहत ठेवतांना संबंधितांनी कधीही सचिव नसलेल्या व सदस्यत्त्वाचा राजीनामा दिलेल्या सदर व्यक्तिच्या नावाचा, खोट्या सही व शिक्क्यांचा वापर करुन 2018 मध्ये 10 ऑगस्ट, 15 ऑगस्ट व 21 ऑगस्ट रोजी बैठका बोलावण्यात आल्याचे व त्यातून इतिवृत्ताचे वाचन करुन कार्यकारी मंडळातील रिक्त पदांची भरती, त्याची मंजूरी व बदल अर्ज दाखल करण्याबाबतचे बोगस ठराव करण्यात आले.

बेकायदेशीर व अधिकार नसतांना घेण्यात आलेल्या या बैठकांमधून शेख महंमद जावेद हुसैन, शेख रईस अहमद, शेख जावेद शेखलाल यांची नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर संस्थेचा अध्यक्ष नसलेल्यांपैकी शेख रईस अहमद (विद्यमान नगरसेविकेचा पती) याने सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे तो संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करण्यास तयार असल्याबाबतचा अर्ज दाखल केला. त्यानंतर 8 ऑक्टोबर 2018 रोजी तथाकथीत अध्यक्ष शेख रईस अहमद याने धर्मदाय आयुक्तांना बदल अहवाल पाठवून त्यातही फक्रुद्दिन शेख यांच्या बनावट सह्या व शिक्क्यांचा वापर केला. 18 डिसेंबर 2018 रोजी त्याने फक्रुद्दिन शेख यांचा फोटो न लावता खोटी पब्लिक नोटरी करुन बनावट प्रतिज्ञापत्रही सादर केले. खोटे दस्तावेज, खोट्या बैठका, खोटे सही व शिक्के अशा फसवणूकीच्या सर्व शस्त्रांचा वापर करीत त्याने अहमदनगरच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्तांची दिशाभूल केली व त्याद्वारे 6 जून 2019 रोजी आपणच आलाईड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असल्याचा मंजूरी आदेश प्राप्त केला.

सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याने तक्रारदार नजीर इस्माईल तांबोळी यांनी संगमनेरच्या कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरुन न्यायालयाने शहर पोलिसांना केलेल्या आदेशान्वये संगमनेर शहर पोलिसांनी सी.आर.पी.सी 156 (3) प्रमाणे शेख रईस अहमद (विद्यमान नगरसेविकेचा पती), जावेद शेख लाल, शबाना रईस शेख (विद्यमान नगरसेविका) (तिघेही रा.अलकानगर) व महंमद जावेद हुसैन (रा.कोंढवा खु. पुणे) या चौघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (ब), 416, 420 ,465, 467, 468, 471, 472, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने संगमनेरच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून पालिका वर्तुळातही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

कोणताही संबंध नसतांना परस्पर बैठका घेणे, ठराव करणे, प्रोसिंडीग लिहणे व संस्थेच्या कधी अस्तित्तवातच नसलेल्या सचिवांच्या नावाचा परस्पर वापर करुन स्वतःचे आर्थिक हित साधण्याचा हा प्रकार संगमनेरकरांसाठा नवा निश्चितच नाही. यापूर्वीही अशाच पद्धतीने स्थापन झालेल्या काही संस्था नंतर बनावट कागदपत्रे तयार करुन गिळण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र काळानुसार तो आता इतिहास झाला होता. आलाईड एज्युकेशन संस्थेतील या प्रकाराने मात्र इतिहासात गेलेल्या त्या प्रकरणांनाही पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. फसवणूकीच्या या घटनेने संगमनेरातील शैक्षणिक वातावरणात मात्र खळबळ उडवून दिली आहे.

