किसान संघर्ष समितीचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन प्रांताधिकार्यांना निवेदन देत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण दिल्लीला घेरा घालत तिन्ही काळे कृषी कायदे रद्द व्हावे म्हणून गेल्या अठरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. किसान संघर्ष समितीच्यावतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने देशभर केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी (प्रांत) कार्यालयावर धरणे आंदोलन कार्यक्रम जाहीर केला होता. त्याप्रमाणे संगमनेर येथे आज (मंगळवार ता.15) प्रांताधिकार्यांच्या कार्यालयासमोर किसान संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तिन्ही कृषी कायदे रद्द करा, शेतमालाला हमीभाव देणारा नवा कायदा करा, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून शेतकर्यांना संरक्षण देणारे नवे कायदे करा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी साथी सायन्ना एनगंदुल, अनिल गुंजाळ, शिवाजी गायकवाड, अब्दुला चौधरी, प्रा.पोपट सातपुते, निवृत्ती दातीर, शांताराम गोसावी, अॅड.ज्ञानदेव सहाणे, अॅड.निशा शिवूरकर यांची भाषणे झाली. यावेळी सरकारच्या लोकशाही विरोधी वर्तनाचा निषेध करण्यात आला. तसेच अदानी आणि अंबानी यांच्या वस्तूंवर, जीओ सीमवर बहिष्काराचा निर्धार करण्यात आला.
दरम्यान, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरूळे यांना अनिल कढणे, सुनंदा रहाणे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत पंतप्रधान कार्यालयाकडे निवेदन पाठवू असे प्रांताधिकार्यांनी सांगितले. आंदोलन यशस्वीतेसाठी अॅड.अनिल शिंदे, असीफ शेख, दशरथ हासे आदिंनी प्रयत्न केले.