पत्रकार दातीर हत्याकांड प्रकरणी साडेनऊशे पानांचे आरोपपत्र दाखल! जमीनीच्या वादातून आपल्या साथीदारांसह कान्हु मोरे याने खून केल्याचे उघड..
नायक वृत्तसेवा, राहुरी
तीन महिन्यांपूर्वी राहुरी तालुक्यात घडलेल्या पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींविरोधात 942 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या या हत्याकांडाचा सुरुवातीचा तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी तर नंतरचा तपास श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पूर्ण केला. या हत्यांकाडामागील नेमक्या हेतूची उकल करण्यासह मुख्य सूत्रधाराला अटक करण्याचे आव्हान स्वीकारुन पोलीस उपअधीक्षक मिटके यांनी तपासाला गती देत हत्याकांडातील उर्वरीत सर्व आरोपींना गजाआड करुन या प्रकरणी आज आरोपपत्र दाखल केले आहे. या हत्याकांडाने राज्यातील पत्रकारिता क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. खूनाच्या गुन्ह्यात सुरुवातीला काही राजकीय धुरिणांची नावेही चर्चीली गेल्याने या संपूर्ण प्रकरणाचे गांभिर्य वाढले होते. मात्र पोलिसांनी प्रकरणातील प्रत्येक बारकावे विचारात घेवून या हत्याकाडांची उकल करीत एकएक करीत सर्व आरोपींना गजाआड केले.
तीन महिन्यांपूर्वी 6 एप्रिलरोजी भर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राहुरी येथील पत्रकार व दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक असलेले रोहिदास दातीर आपल्या दुचाकीवरुन मल्हारवाडी रस्त्याने घरी जात असतांना पाठीमागून आलेल्या पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातील चौघांनी त्यांना सातपीरबाबा दर्ग्याजवळ अडवून मारहाण करीत त्यांचे अपहरण केले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनास्थळी धाव घेवून तपासणी केली असता दातीर यांच्या पायातील चप्पल आणि त्यांची दुचाकी रस्त्यावरच पडलेली आढळून आली. त्यावरुन त्यांचे अपहरण झाल्याचे गृहीत धरुन त्यांनी तत्काळ प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. यादरम्यान अपहृत दातीर यांच्या पत्नीने राहुरी पोलिसांत फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात 363 सह 341 कलमान्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी मारहाण करुन खून केलेल्या दातीर यांचा मृतदेह राहुरी महाविद्यालयाजवळ टाकून दिल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आणि पोलिसांवरील दबावही वाढला. पो.नि.दुधाळ यांनी सुरुवातीच्या तपासादरम्यान विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व खबर्यांच्या माहितीवरुन गुन्ह्यात वापरलेले स्कॉर्पिओ वाहन जप्त केले, मात्र आरोपींचा माग लागत नव्हता. त्याच सुमारास आरोपींची नावे एका राजकीय पक्षाशी जोडली गेल्याने जिल्ह्यात विविध अफवांचे पिकं येवून या हत्याकांडाशी अनेकांची नावेही जोडली गेली. त्यामुळे पोलिसांवरील दबाव दररोज वाढत होता. त्यातच पो.नि.दुधाळ यांनी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी (वय 25, रा.एकलव्य वसाहत) व तौफीक मुक्तार शेख (वय 21, रा.राहुरी फॅक्टरी) या दोघांना मोठ्या शिताफीने अटक केली. मात्र या गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधारासह अन्य आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपविला.
उपअधीक्षक मिटके यांच्याकडे तपासाची सूत्रे येताच त्यांनी मुख्य आरोपी ‘लक्ष्य’ करीत खबर्यांचे जाळे विणले आणि त्यात त्यांना यशही मिळाले. या दरम्यान गुन्ह्याचा सूत्रधार नेवासा फाटा येथे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी जलदगतीने हालचाली करीत नेवासा फाटा येथे सापळा लावला आणि अखेर मोहीम फत्ते झाली. उपअधीक्षक मिटकेंच्या जाळ्यात दातीर हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असलेला कान्हु गंगाराम मोरे अलगद येवून अडकला. न्यायालयाकडून त्याला दहा दिवस कोठडीत घेत अन्य आरोपींची उकल करतांना अक्षय सुरेश कुलथे हा पसार आरोपी थेट उत्तरप्रदेशातील फत्तेपूर जिल्ह्यात जावून दडल्याचे समोर आले. मिटकेंच्या पथकाने तेथेही धाड घातली आणि त्याला राहुरीत आणले. मोरे याच्या चौकशीत राहुरीतील अनिल जनार्दन गावडे या व्यापार्याने त्याला आर्थिक मदत केल्याचेही समोर आले.
मात्र गावडे हा एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याने त्याचे काहीच वाकडे होणार नाही अशी चर्चाही राहुरीत सुरु झाली. परंतु उपअधीक्षक मिटके यांनी ती फोल ठरवित त्याच्यावरही गुन्हेगारांना मदत केल्याचा ठपका ठेवतांना गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची कोणतीही ठोस माहिती हाती नसतांनाही सुरुवातीला पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी तपास करीत दोघांना तर नंतरचा तपास करीत पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सूत्रधारासह अन्य दोघांना गजाआड केले व नव्वद दिवसांच्या कालावधीत या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण करीत 942 पानांचे दोषारोपपत्र आज (ता.6) रोजी न्यायालयात दाखल केले. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्या या हत्याकांडात सुरुवातीला चर्चीली गेलेली नावे आणि पोलिसांपासून दूर असलेले आरोपी यामुळे काहीसा संशयही निर्माण झाला होता. मात्र मिटके यांनी त्या सर्व चर्चा अफवा ठरवित या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करुन सर्व आरोपींना अटक करुन आरोपपत्र दाखल केले आहे.
या गुन्ह्यातील मुख्यसूत्रधार असलेल्या कान्हु गंगाराम मोरे याचे व पत्रकार रोहीदास दातीर यांचे गणेगाव येथील जमीनीवरुन वाद सुरु होते. त्यातून मोरे याने आपले साथीदार तौफीक मुक्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे व लाल्या उर्फ अर्जुन विक्रम माळी यांना राहुरीत बोलावून या प्रकरणात त्यांची मदत मागीतली. सर्वांचे एकमत झाल्यानंतर मोरेे याने तिघांनाही प्रत्येकी दहा हजार रुपये दिले. पत्रकार दातीर यांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेले स्कॉर्पिओ वाहन मोरे याच्याच मालकीचे आहे. त्याचा वापर करुन दातीर यांचे अपहरण करण्यात आले व दरडगाव येथील वनविभागाच्या जागेत नेवून त्यांची हत्या करण्यात आली. जनतेच्या मनात आपला धाक निर्माण व्हावा या हेतूने खून केल्यानंतर आरोपींनी दातीर यांचा मृतदेह वाहनातून राहुरी शहरात आणला व राहुरी नजीकच्या रक्तपेढीजवळ तो टाकून देत शहरात दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. मात्र या प्रकरणाची उकल करीत सर्व आरोपींना गजाआड करुन पोलिसांनी कान्हु मोरेसह अन्य आरोपींची दहशत धुळीत मिळविली आहे.
या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केला असला तरीही मुख्य सूत्रधारासह उर्वरीत आरोपींना गजाआड करण्यासह गुन्ह्यामागील हेतू शोधण्याचा कसब उपअधीक्षक संदीप मिटके यांनी साधला. नगर शहरातील आपल्या कारकीर्दीपासून चर्चेत असलेल्या मिटके यांच्याकडे नयन तांदळे टोळीसह रेमडेसिवीर प्रकरणाचाही तपास दिला गेला होता. त्यानंतर पत्रकार दातीर यांच्या खूनाचा तपासही त्यांनीच पूर्ण करीत आज 90 दिवसांतच आरोपपत्र दाखल केले आहे. संदीप मिटके यांची जिगरबाज पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यात ओळख आहे, या निमित्ताने ती अधिक गडद झाली आहे.