डाळिंब उत्पादकांना 6 कोटी 26 लाखांचा विमा मंजूर ः थोरात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील 1440 शेतकर्यांना 1063 हेक्टरवर असलेल्या डाळिंब पिकाच्या आंबेबहारकरिता 6 कोटी 26 लाख रुपये विमा मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.
यावर्षी निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला आहे. याच बरोबर हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत सन 2019-2020 (आंबे बहार) डाळिंब पिकासाठी तालुक्यातील 1440 शेतकर्यांना 1063 हेक्टर क्षेत्राकरिता एकूण 6 कोटी 26 लाख रुपये विमा मंजूर झाला आहे. यामध्ये साकूर मंडलकरिता 1 कोटी 10 लाख तर त्या खालोखाल तळेगाव मंडलकरिता 80 लाख रुपये पीकविमा मिळाला आहे. तसेच आश्वी बु., धांदरफळ बु., डोळासणे, घारगाव, पिंपरणे, संगमनेर बु., शिबलापूर, समनापूर मंडलमधील सर्व अर्जदार शेतकर्यांचा समावेश असल्याची माहिती संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. या विम्याची रक्कम आपल्या बँक खात्यावर मिळणार असून शेतकर्यांनी बँकेत संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे व तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले आहे.