अकोले भूमि अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार माजी आमदारांकडून उघड
अकोले भूमि अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार माजी आमदारांकडून उघड
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील 190 गावांसाठी भूमि अभिलेख कार्यालयात मोजणीकरिता एकच मशीन व कर्मचारीही कमी आहेत. याबाबत अधिकार्यांनी वरिष्ठांकडे मागणीच केली नसल्याचा गलथान कारभार माजी आमदार वैभव पिचड यांनी नुकताच उघड केला आहे. तर चर्चेदरम्यान अधिकार्याला तालुक्याच्या आमदाराचे नाव काय, असे विचारले असता त्यांनी इतरांना विचारुन सांगितले. यावरुन अधिकार्याला तालुक्याचे लोकप्रतिनिधी कोण आहे हेच माहित नसल्याचेही उघड झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
माजी आमदार पिचड यांनी भूमि अभिलेख कार्यालयात भेट देऊन अधिकार्यांशी कार्यालयाच्या अडचणी समजून घेण्यासाठी व जनतेची कामे प्रलंबित असण्यामागची कारणे समजून घेतली. यावेळी पिचड म्हणाले, तुम्ही अडचणींबाबत काही पत्रव्यवहार केला असेल तर दाखवा. जिल्हाधिकारी यांचेकडे अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. पण तसा कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही, असे दिसून आले आहे. अडचणी वरिष्ठांनाच सांगितल्या जात नाही, तर प्रश्न कसा सुटणार असा सवाल माजी आमदार पिचड यांनी केला. दरम्यान, या कार्यालयात अनेक कामे प्रलंबित आहेत. राजूर येथील आवारी (वय 85) या दीड महिन्यापासून चकरा मारूनही त्यांना चलन मिळाले नाही, असा या कार्यालयाचा गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले. तर मोजणी अधिकारी बाहेर मोजणीसाठी जाताना त्यांची कोणतीही माहिती नोटीस फलकावर लावताना दिसत नाहीत. त्यामुळे जनता भूमि अभिलेख कार्यालयात कामासाठी चकरा मारून वैतागून जाताना दिसतात. अधिकारी दालनाचा दरवाजा बंद करून बसतात. त्यामुळे जनतेची अनेकवेळा अधिकारी आहे की नाही याबाबत फसगत होते. म्हणून माजी आमदार पिचड यांनी अधिकार्यांना दरवाजा उघडा ठेवून दालनामध्ये बसा किंवा दरवाजाला काच बसवून घ्या, म्हणजे अधिकारी दालनामध्ये असल्याचे व काय करीत आहे हेही जनतेला समजेल अशी विनंती केली. तर कर्मचार्यांना निवासी राहण्याबाबतही सूचना द्या असे सांगितले.