मुंबईच्या तरुणीची कोकणकड्यावरुन उडी घेत आत्महत्या! दीड हजार फूट खोल दरी; तीस तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश..

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यभरातील निसर्ग पर्यटकांच्या पसंदीचे ठिकाण असलेल्या आणि नेहमीच गर्दीने दाटलेल्या तालुक्यातील हरिश्‍चंद्रगडावरुन अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी गडावर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील घाटकोपर येथील बावीस वर्षीय तरुणीने भल्याभल्यांना पाहूनच घाम फोडणाऱ्या कोकणकड्यावरुन स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. पुण्यातील बचाव पथकाने सोमवारी सकाळी हरिश्‍चंद्रगडाच्या या महाकाय दरीत उतरुन मृत तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. अवनी मावजी भानुशाली असे मयत तरुणीचे नाव असून या प्रकरणी राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी (ता.7) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणारी अवनी मावजी भानुशाली (व 22) ही तरुणी अकोले तालुक्यातील हरिश्‍चंद्रगडावर निसर्ग पर्यटनासाठी आली होती. रविवारी सकाळी तिने पाचनईमधून वाटाड्या (गाईड) सोबत घेत गड गाठला. हरिश्‍चंद्रेश्‍वर व केदारेश्वर दर्शन, सप्ततीर्थ पुष्करणी आणि आसपासच्या गुहा पाहिल्यानंतर सोबतच्या वाटाड्यासोबत ती कोकणकड्यावर गेली.


एरव्ही शनिवार-रविवार हरिश्‍चंद्रगडावर पर्यटकांची मोठी मांदीयाळी असते. मात्र सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात संख्या रोडवली आहे. अशातच अवनी कोकणकड्यावर आली. त्यावेळी तेथे तुरळक पर्यटकांची गर्दी होती. सोबतच्या वाटाड्याने कोकणकड्याचे स्थान, इतिहासातील घटना आणि सरळ उभ्या असलेल्या कातळाची खोली या विषयीची माहिती तिला दिली. मृत्यूला अलिंगन देण्याचा निर्णय सोबत घेवूनच गडावर पोहोचलेल्या अवनीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरु होतं. ती एकसारखी स्वतःला कड्यावरुन दरीत झोकून देण्यासाठी योग्य ठिकाणाचा शोध घेत होती. 


कोकणकडा पाहताना पर्यटकांचा तोल जावू नये यासाठी वनविभागाने या परिसरात सर्वत्र लोखंडी कठडे उभे केले आहेत. त्यामुळे तिने सोबतची बॅगमध्ये मोबाईल ठेवून ती कठड्यावर हात ठेवून आपले मानसिक नियंत्रण गमावू लागली. उडी मारण्यासाठी कठड्यांच्या पलिकडे जाणे आवश्यक असल्याने तिने तसा प्रयत्न केला असता सोबतच्या वाटाड्याने तसे करणे धोकादायक असल्याचे सांगत तिला तसे करण्यापासून रोखले. त्यामुळे काहीवेळ इकडे तिकडे फिरुन वेळ घालवल्यानंतर अचानक तिने वाटाड्या आणि आसपासच्या तुरळक पर्यटकांची नजर चुकवून थेट कोकणकड्यावरुन दरीत उडी घेतली. हा कडा बघतानाही थरकाप व्हावा अशी स्थिती असताना एका तरुणीने थेट दरीत घेतलेली उडी पाहून उपस्थित सगळेच भयभीत झाले.  

याबाबत राजूर पोलिसांना माहिती कळविण्यात आल्यानंतर सायंकाळी उशिराने पोलीस पथक गडावर पोहोचले. मात्र तो पर्यंत सूर्य मावळतीला गेल्याने शोधकार्य पुढे नेणे शक्य नव्हते. राजूरचे सहाय्यक निरीक्षक दीपक सरोदे यांनी अशाप्रकारच्या घटनांमध्ये मदतीसाठी धावणार्‍या अ‍ॅडव्हेंचर हायकर्स समूहाशी संपर्क साधून त्यांना मदतीसाठी पाचारण केले. या समूहाच्या नाशिक, पुणे आणि लोणावळा येथील सहकार्‍यांनी तातडीने आपापल्या ठिकाणांहून कूच करीत पहाटे तीनच्या सुमारास हरिश्‍चंद्रगड गाठला आणि सोमवारी (ता.8) सकाळी सूर्योदय होताच मदतकार्याला सुरुवात केली. राजुर पोलिसांना कोकणकड्यावर सापडलेल्या तिच्या बॅगमध्ये सुसाईड नोट, काही वह्या आणि घाटकोपर ते इगतपुरी पर्यंत रेल्वेचे तिकीट आढळून आले. सोबत तिचा मोबाईलही होता, मात्र तो बंद स्थितीत होता. पोलिसांनी तो सुरु करुन आत्महत्या करणाऱ्या मुलीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही लॉक असल्याने अडचण निर्माण झाली. त्याच दरम्यान राजुर पोलीस मोबाईल घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचताच त्या मोबाईल फोनवर मयत मुलीच्या वडिलांचा फोन आला आणि त्यामुलीची ओळख पटली.

बचाव पथकातील दोघांनी दोरीच्या सहाय्याने जवळपास दीड हजार फूट खोली असलेल्या या दरीत उतरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा शोध सुरु केला. घटनेनंतर तब्बल 26 तासांनी दगडांवर आदळत, आपटत अगदी कड्याच्या पायथ्याशी जावून कोसळलेला त्या तरुणीचा मृतदेह सापडला. सायंकाळी पाचच्या सुमारास दोराच्या सहाय्याने तो बांधून गडावर ओढण्यात आला. राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाचे सोपस्कार उरकल्यानंतर रात्री उशिराने तो मयतेच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. या प्रकरणी राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अवघ्या बावीस वर्षीय तरुणीने अशाप्रकारे जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


पुराणात माहात्म्य वर्णिलेला हरिश्‍चंद्रगड राज्यातील निसर्ग पर्यटकांमध्ये विशेष आवडीचे ठिकाण आहे. पाचनईकडून उभी सरळ, तर खिरेश्‍वरच्या दिशेने अभारण्यातून सह्याद्रीच्या कणखर पोटात घेवून जाणार्‍या वाटेने सुट्ट्यांमध्ये हजारों पर्यटक येथे भेट देतात आणि यादवकालीन मंदिरातील हरिश्‍चंद्रेश्‍वर, केदारेश्‍वराचे दर्शन घेवून धन्य होतात. मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेला कोकणकडा म्हणजे तर पर्यटकांच्या पसंतीचे आणि निसर्गाच्या चमत्काराचे खास ठिकाण. गडावर गेला आणि कडा न पाहताच परतला असा पर्यटक अभावानेच सापडेल, इतकी या कड्याची भव्यता आणि थरकाप उडवणारी खोली आहे. अशा ठिकाणी मुंबईतील एका तरुणीने येवून आत्महत्या केल्याने रविवार, सोमवार गडावर उपस्थित असलेला प्रत्येक निसर्ग पर्यटक हळहळ करीत होता.

मुंबईतील घाटकोपर परिसरात 84 वर्षीय जेठालाल भानुशाली मुलगा मावजी, त्याची पत्नी, तीन मुली व एक मुलासह राहतात. त्यातील एका मुलीचे लग्न झालेले असून मयत अवनी पदव्युत्तर असून सध्या घरीच असते. लहान बहीण सीएच्या अभ्यासक्रमाला आहे. तर, भाऊ इयत्ता सातवीत आहे. मावजी मुंबईतील एका आडत व्यापाऱ्याकडे खासगी नोकरी करतात. अशा साधारण कुटुंबातील अवनीला परदेशात जाण्याची खूप इच्छा होती. शनिवारी (ता. 6) ती पासपोर्ट काढण्यासाठी जाते असे सांगूनच सकाळी घरातून निघाली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी फोन करून विचारले असता मैत्रिणीकडे असून सकाळी येईल असे ती म्हणाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही सकाळी बराच वेळ ती घरी न आल्याने तिच्या वडिलांनी पुन्हा फोन केला असता तो बंद आला.

त्यानंतर त्यांनी वारंवार तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो झाला नाही. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तिचा फोन लागला. मात्र त्यावेळी दुर्दैवाने समोरून बोलणारी व्यक्ती अवनी नव्हेतर राजुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे होते. फोन करणारी व्यक्ती मयतेचे वडील असल्याचे समजल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती देत त्यांना हरिश्चंद्रगडावर येण्यास सांगितले. त्यानुसार भानुशाली कुटुंब पहाटेच्या सुमारास राजुरहून पाचनईमार्गे हरिश्चंद्रगडावर पोहोचले. पुण्याच्या हायकर्स ग्रुपच्या सदस्यांनी अतिशय निकराने जवळपास दीड हजार फूट खोल असलेल्या या भयंकर दरीत दोर सोडून तिचा शोध घेतला. त्यावेळी दरीच्या अगदी तळभागात तो आढळून आला. या घटनेने पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *