… अखेर शेळकेवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागतून रस्त्यावर टाकला मुरूम जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरेंनी कारखान्याचा जेसीबी देत केले सहकार्य

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शेळकेवाडी ते घारगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांसह वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. परंतु, याची कोणीही दखल घेईना. अखेर शेळकेवाडी ग्रामस्थांनी या रस्त्यावर लोकसहभागातून मुरूम टाकला आहे. त्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून जेसीबी मशीन उपलब्ध करून देत सहकार्य केले.

शेळकेवाडी ते घारगाव हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शेळकेवाडी, कान्होरेमळा, अकलापूर आदी भागातील विद्यार्थ्यांसह सर्व सामान्य नागरिक व वाहनचालकांना याच रस्त्याने ये-जा करावी लागते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. पावसाळ्यात तर संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला होता. यामुळे मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालविणे अवघड झाले होते. तर अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहे. तरी देखील याची कोणीही गांभीर्याने दखल घेईना. अखेर याला वैतागून शेळकेवाडी ग्रामस्थ ग्रामस्थांनी लोकसहभागातून रस्त्यावर मुरूम टाकण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार ग्रामस्थांनी टॅक्ट्रर उपलब्ध केले. पण मुरूम काढण्यासाठी जेसीबी मशीन गरजेचे होते. तो जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. आता या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांसह वाहनचालकांची कसरत कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, ते म्हणाले लवकरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घारगाव ते शेळकेवाडी रस्त्याचे काम होणार आहे.

