श्रीरामपूर तालुक्यातून बेपत्ता झालेला मुलगा तामिळनाडूत सापडला
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तब्बल दीड वर्षापूर्वी तालुक्यातील एका गावातून बेपत्ता झालेला 12 वर्षीय मुलगा अखेर वेल्लुपुरम (तामिळनाडू) येथे नुकताच सापडला आहे. त्याला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात 6 फेब्रुवारी, 2020 रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुमारे दीड वर्ष तालुका पोलिसांकडून न लागल्याने पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार एस. बी. कांबळे यांनी त्याचा शोध घेतला.
तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक मसूद खान यांच्या सूचनेप्रमाणे राज्यातील विविध बालसुधारगृहे, सामजिक संस्था यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला. तसेच देशभरातील बाल कल्याण समिती व सामजिक संस्थांशी संपर्क साधण्याची विनंती केली. सदर बालकाबाबत वेळोवेळी अहमदनगर येथील बाल कल्याण समितीने माहिती घेतली. तेव्हा बेपत्ता असलेला मुलगा वेल्लुपुरम (तामिळनाडू) येथील बाल कल्याण समितीमध्ये असल्याचे समोर आले. हा मुलगा बाल कल्याण समिती वेल्लुपुरम (तामिळनाडू) यांना मिळाल्याने त्यांनी त्याला अहमदनगर येथील बाल कल्याण समितीकडे नुकतेच सुपूर्द केले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांनी बाल कल्याण समितीकडून योग्य त्या पूर्ततेसह ताब्यात घेवून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्यात पुन्हा वर्ग केला. सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मसूद खान व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष तसेच बाल कल्याण समितीने केली आहे.