‘संभाजी बिडी’ निर्मिती कंपनीने नाव बदलून महाराष्ट्राची माफी मागावी!

‘संभाजी बिडी’ निर्मिती कंपनीने नाव बदलून महाराष्ट्राची माफी मागावी!
शिवजागर फाउंडेशनची कोपरगावच्या तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
महाराष्ट्रात गेल्या 80 वर्षांपासून संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विक्री केली जात आहे. या बिडीच्या बंडलवर महाराजांच्या नावाची छपाई होते. मात्र, नंतर हा कागद फाडून फेकला जातो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा यातून अवमान होत आहे, तो अवमान आता सहन केला जाणार नाही. यासाठी या बिडी उत्पादन करणार्‍या कंपनीने नाव बदलून निर्मिती करावी व महाराष्ट्राची साबळे-वाघिरे कुटुंबियांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवजागर फाउंडेशन यांच्यावतीने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.


छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने बिडीचे उत्पादन करणार्‍या या कंपनीच्या विरोधात शिवभक्तांनी राज्यभरात आंदोलन पुकारले होते; त्यात त्यांना यशही मिळाले. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील सासवड पोलीस ठाण्यात कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शिवभक्तांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संघटना पुढे सरसावल्या आहेत. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी बिडी घेऊन जाणार्‍या ट्रकची तोडफोडही करण्यात आली होती. तसेच संभाजी बिडीचे नाव बदला नाही तर दहा दिवसांत कंपनी पेटवून देऊ, असा इशारा मराठा आरक्षण कृती समितीने दिला आहे.


या आंदोलनाला मराठा आरक्षण कृती समिती, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे, सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन, अखिल भारतीय होलार समाज संघटना, राष्ट्रीय विद्यार्थी संघटना, शिवशंभू स्वराज्य संघटना अशा अनेक संघटनांनी या पाठिंबा दिला आहे. तर कोपरगावच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर शिवजागर फाउंडेशनचे अजय सुपेकर, परेश सोनवणे, सनी काळे, अरुण सुपेकर, मयूर चव्हाण, राहुल तळेकर, संतोष जाधव, प्रीतम सोनवणे, करण दुसाने, अनिकेत सताळे, तेजस चव्हाण, राजेंद्र परदेशी यांच्या सह्या आहेत. त्यांनी महापुरुषांचा अवमान करणार्‍या या कंपनीवर कायदेशीररित्या लवकरात लवकर कारवाई करावी, असे न झाल्यास तमाम शिवभक्त एकत्र येऊन राज्यभर मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.

 

Visits: 59 Today: 1 Total: 433906

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *