मंत्री विखेंविरोधात जिल्ह्यातील भाजप नेत्यांत नाराजीचा सूर उत्तर-दक्षिणवरुन मतभेद; दक्षिणेला सतत डावलल्याची नेत्यांमध्ये भावना


नायक वृत्तसेवा, नगर
सध्या अहमदनगर भाजपमध्ये सगळंच काही आलबेल आहे असे वाटत असले तरी चित्र मात्र वेगळेच पाहायला मिळत आहे. भाजपच्या मूळ नेत्यांत सध्या नाराजीचा सूर दिसत असून त्याचीही अनेक कारणे आहेत. विखेंच्या विरोधात नाराजीचा सूर का आहे? पक्षांतर्गत धुसफूस महसूल तथा पलाकमंत्री राधाकृष्ण विखेंना जड जाणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला शिर्डीत येत आहेत. मागेही गृहमंत्री अमित शहा हे प्रवरेत आले होते. यासोबतच अनेक भाजपश्रेष्ठी फक्त अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात येताना दिसतात. हा मुद्दा मंत्री विखेंची प्रतिष्ठा वाढवणारा असला तरी याच मुद्द्यावरून दक्षिणेतील भाजप नेते नाराज आहेत. भाजपचे सर्वच मोठे नेते अहमदनगरच्या उत्तर भागात येतात अन दक्षिण नगर जिल्ह्याला डावललं जातयं अशी भावना या नेत्यांत तयार झाली आहे.

विशेष म्हणजे ही भावना माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री, आमदार प्रा. राम शिंदे यांनी उघड बोलून दाखवली आहे. शिर्डीसारखे एखादे मंदिर दक्षिण नगरमध्ये बांधलं पाहिजे, म्हणजे भाजप नेते दक्षिणेलाही येतील अशी खंत आमदार राजळे यांनी व्यक्त करून दाखवली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौर्‍यावर येण्यापूर्वीच उत्तर आणि दक्षिणेतील नेत्यांमधील मतभेद समोर आलेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अहमदनगर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेतली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्वच मोठ्या नेत्यांचे दौरे हे उत्तर नगर जिल्ह्यात होत असून ते कधी शिर्डी तर कधी लोणी-राहाता येथे कार्यक्रमास येतात. दक्षिण नगर जिल्ह्याला कुठेतरी डावलले जात आहे असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

Visits: 159 Today: 2 Total: 1107142

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *