… ऐन बैलपोळ्यालाच पोपट्या-सर्जाला करावी लागली पोलीस ठाण्याची वारी! दरेवाडी येथून चोरी झालेल्या बैलजोडीचा पोलिसांसह शेतकर्‍यांनी लावला छडा

नायक वृत्तसेवा, घारगाव
वर्षभर बळीराजाबरोबर राबणार्‍या सर्जा-राजाला बैलपोळ्याच्याच दिवशी पोलीस ठाण्याची वारी करण्याची दुर्दैवी वेळ आल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागात घडली आहे. मात्र, घारगाव पोलिसांनी जंग जंग पछाडत व तांत्रिक बाबींच्या आधारे चोरी गेलेल्या बैलजोडीचा छडा लावत ही बैलजोड शेतकर्‍याच्या स्वाधीन केली. यावेळी दरेवाडीच्या शेतकर्‍याचा आनंद गगनात मावेनासा झाला. या घटनेवरुन संगमनेर तालुक्यात जनावरे चोरणारांची मोठी टोळी सक्रीय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पठारभागातील दरेवाडी येथील दत्तात्रय सखाराम इघे यांनी नेहमीप्रमाणे रविवारी (ता.5) सायंकाळी आपल्या पोपट्या व सर्जा या बैलजोडील घराच्या समोर बांधले होते. सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतकरी इघे यांची दावणीची बैलजोड सोडून पिकअपमध्ये घेवून जात होते. त्याच दरम्यान इघे यांनी विचारणा केली असता त्यांना धक्काबुक्की करून बळजबरीने बैलजोड चोरून कत्तलीसाठी घेवून गेले. त्यानंतर बैल चोरून नेल्याची माहिती इघे यांनी मोबाईलवरून सगळ्यांना सांगितली.

या माहितीवरुन परिसरातील शेतकर्‍यांनी तपास सुरू केला. अनेकांनी बैलजोडी चोरी गेल्याचे समाज माध्यमांवरही टाकले. त्यानंतर निंभाळे येथे बैलजोडी असल्याची माहिती समजताच शेतकरी इघे यांच्यासह गावातील नागरिक तेथे गेले होते. बैलजोडी इघे यांचीच असल्याची खात्री पटल्यानंतर ही बैलजोडी घारगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली. यावेळी पोपट्या व सर्जाला पाहून इघे यांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. मात्र, बैलपोळ्याच्याच दिवशी बैलांना पोलीस ठाण्याची वारी करावी लागल्याची सल त्यांना मनात होती.

या प्रकरणी दत्तात्रय इघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी बाळासाहेब पांडुरंग फड (रा.दरेवाडी), बाळू मारूती कोळेकर (रा.डिग्रस) यांच्यासह इतर साथीदारांवर गुरनं.206/2021 भादंवि कलम 392, 34 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन 1976 व सुधारित कायदा 1995चे कलम 5 (अ) (ब), 9 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहे.


ऐन बैलपोळ्यालाच पोपट्या-सर्जाला पोलीस ठाण्याची वारी करावी लागल्याने मालकासह शेतकर्‍यांत नाराजी पसरली होती. मात्र, या घटनेवरुन संगमनेर तालुक्यात जनावरे चोरणारांची टोळी सक्रीय असल्याची भीती पोलिसांनी वर्तविली आहे. यामुळे शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Visits: 221 Today: 2 Total: 1596603

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *