संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पुन्हा लाचखोर पकडला! आरोपींसह फिर्यादींनाही नागवणारा पोलीस नाईक बी.बी.देशमुख एसीबीच्या ताब्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

अवघ्या महिन्याभरात दुसर्‍यांदा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पुन्हा लाचखोर कर्मचारी सापडला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींसह तक्रारदारालाही ‘धाकात’ घेवून दुहेरी मलिदा छापण्यास सोकावलेल्या पोलीस नाईक बी.बी.देशमुख याच्या पापाचा घडा अखेर आज भरला आणि त्याला अवघी एक हजार रुपयांची लाच स्विकारतांना नाशिकच्या एलसीबीने रंगेहात पकडले. या वृत्ताने जिल्हा पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे शहर पोलीस ठाण्याचे नूतन निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी फिर्यादी अथवा तक्रारदाराकडून पैसे मागणार्‍यांवर यापूर्वीच कठोर कारवाईचा इशारा दिला होता, मात्र आज त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत लाचखोर देशमुख याने डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो अलगद फसला.

     याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका किरकोळ कापड विक्रेत्याची पत्नी घरातून निघून गेली होती. त्याबाबत संबंधितेच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रारही दाखल केली होती. त्याचा तपास बी.बी.देशमुख या लाचखोर पोलीस कर्मचार्‍याकडे सोपवण्यात आला होता. या दरम्यान सदरची विवाहिता आढळून आली असता त्या लाचखोराने तिचा जवाब नोंदवण्यापूर्वी तिच्या पतीकडून एक हजारांच्या लाचेची मागणी केली. मात्र त्यावेळी त्याच्याकडे पैसे नसल्याने आज सायंकाळी सदरची रक्कम देण्याचे ठरले होते.

     त्यानुसार आज सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या दुसर्‍या मजल्यावर संबंधित तक्रारदार व तो लाचखोर पोलीस कर्मचारी अशा दोघांमध्ये तडजोड झाली व त्यानुसार तक्रारदाराने त्याला एक हजार रुपये सुपूर्दही केले. त्याचक्षणी सापळा लावून बसलेल्या नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी झडप घालीत जागेवरच त्याच्या मुसक्या आवळल्या. आपण फसलो आहोत याची जाणीव होताच पैशांसाठी आरोपींसह फिर्यादींनाही थरथरायला लावणारा हा लाचखोर अंगात थंडी घुसल्यागत थरथर उडू लागला. त्याला ताब्यात घेवून शासकीय विश्रामगृहावर नेण्यात आले असून त्याने घेतलेली एक हजार रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप चौकशी सुरु असल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.

     महिन्याभरापूर्वी घरातच चोरी करुन ते सोने नाशिकमधील एका सोनाराला विकणार्‍या तरुणाला अटक झाली होती. त्याच्या चौकशीतून नाशिकमधील ज्या सोनाराचे नाव समोर आले त्या सोनाराकडून सध्या निलंबित असलेला व त्या प्रकरणातील तपासी अधिकारी राणा प्रतापसिंग परदेशी याने दोन लाखांची लाच मागीतली होती. मात्र शेवटी एका लाखात तडजोड होवून ती स्विकारतांना त्याला सिनेस्टाईल अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतांनाच आता शहर पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा लाचखोरीचा प्रकार समोर आल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दिवाळीच्या आधीच पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी एसीबीच्या जाळ्यात अडकला तेव्हा पोलीस ठाण्याचा पदभार पो.नि.अभय परमार यांच्याकडे होता, त्या प्रकरणाचा फटका त्यांनाही बसला. त्यामुळे त्यांची बदली होवून पो.नि.मुकूंद देशमुख यांनी पदभार स्विकारताच त्यांनी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेवून लाचखोरी खपवून घेणार नसल्याचे बजावून सांगीतले होते. मात्र आज ते स्वतः नगर येथील बैठकीला गेल्याची संधी साधून सदर लाचखोराने गुपचूप दुसर्‍या मजल्यावर आपल्या पैशांची हवस भागवण्यासाठी फिर्यादीलाच नागवण्याचा प्रयत्न केला, त्यात नाशिकच्या एसीबीने त्यालाच नग्न केले.

Visits: 138 Today: 2 Total: 1101083

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *