बाळ बोठे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली! सरकारी पक्षाने वेळ मागितल्याने सोमवारी होणार जामीन अर्जावरील फैसला
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नगरच्या जिल्हा न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून न्यायालयाने सरकारी पक्षाच्या विनंतीवरुन आता 14 डिसेंबररोजी सुनावणी घेण्याचे ठरविले आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष खून करणार्या दोघांसह अन्य तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्यापही पसार असल्याने खुनामागील नेमक्या कारणाचा अजूनही उलगडा झालेला नाही.
गेल्या 30 नोव्हेंबर रोजी नगरमधील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांचा पुण्याहून परतत असताना पारनेर तालुक्यातील सुप्यानजीक जातेगाव घाटात त्यांचा निर्घृन खून करण्यात आला होता. यावेळी त्यांच्यासोबत वाहनात असलेल्या त्यांच्या मुलाने आरोपीचा फोटो काढल्याने पोलिसांनी अवघ्या पंधरा तासांतच श्रीरामपूरातून खून करणार्या फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे या दोघांना अटक केली. त्यानंतर आदित्य चोळके व ऋषीकेश पवार यांच्यासह सागर भिंगारदिवेलाही अटक झाली. भिंगारदिवेच्या चौकशीतूनच बाळ बोठे यांचे नाव समोर आले होते. तेव्हापासून बोठे पसार असून या दरम्यानच त्यांनी नगरच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
न्यायालयाने बोठे यांच्या जामीन अर्जाबाबत पोलिसांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगत त्या अर्जावर आज शुक्रवारी (ता.11) सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र या दरम्यान तपासी अधिकार्यांना रेखा जरे यांच्या घरातील तपासणीतून एक चार पानी पत्र हाती लागले. या पत्रात बाळ बोठे यांच्याविषयी अनेक धक्कादायक बाबींचा उल्लेख असल्याने पोलिसांनी त्यातील प्रत्येक तथ्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिसांकडून आज न्यायालयात आपले म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागण्यात आला. तशी विनंती सरकारी पक्षाचे वकील अॅड.सतीश पाटील यांनी न्यायालयाला केल्यानंतर जिल्हा न्यायाधिशांनी ती मान्य करीत या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (ता.14) घेण्याचे ठरविले आहे.
सदरचे हत्याकांड झाल्यानंतर बाळ बोठे यांनीच सुपा टोलनाक्याजवळ रुग्णवाहिका पाठवून रेखा जरे यांना नगरच्या सिव्हील रुग्णालयात आणण्याची व्यवस्था केली होती. रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ते तेथे हजरही झाले होते. वैद्यकीय अधिकार्यांनी जरे यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केल्यानंतर बाकीचे सोपस्कार उरकून त्यांचा मृतदेह घरी नेणे व नंतर अंत्यविधीसाठीही बोठे यांनी धावपळ केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. मात्र याच दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे सुरुवातीला सूत्रधार म्हणून समोर आलेल्या सागर भिंगारदिवेच्या मुसक्या आवळण्यात आल्यानंतर त्याने बोठे यांचे नाव घेतले आणि केवळ पोलीस दलच नव्हे तर राज्यातील पत्रकारिता क्षेत्रात जणू भूकंप जाणवला. तेव्हापासून बोठे पसार असून पोलिसांची पाच पथके त्यांचा राज्यात आणि परराज्यातही कसून शोध घेत आहेत.
या हत्याकांडात सुपारी देणारा, घेणारा, जरे यांच्यावर पाळत ठेवणारा आणि प्रत्यक्ष खून करणारे असे एकूण पाच आरोपी पोलिसांनी पकडले असून हे हत्याकांड कसे घडवून आणले याची इंत्यभूत माहिती त्यांच्याकडून पोलिसांना समजली आहे. मात्र कोणत्या कारणाने जरे यांचा निर्घृन खून करण्यात आला हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या बोठे यांना अटक होत नाही तोपर्यंत हत्येच्या कारणांचा उलगडा होणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला कडाडून विरोधच होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. पुढील सुनावणीत काय घडते याकडे केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
या प्रकरणाचे तपासी अधिकारी, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी गुरुवारी रेखा जरे यांच्या घरी जावून पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना रेखा जरे यांच्या हस्ताक्षरातील चारपानी पत्र सापडले असून त्यात बाळ बोठे यांच्याविषयी बरीच धक्कादायक माहिती असल्याची चर्चा आहे. या पत्रातून आणखी काय उलगडा होतो याबाबत उत्सुकता असली तरीही पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून त्यातील मजकूर गोपनीय ठेवला आहे. कदाचित हे पत्र बोठे यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अटकाव करणारे ठरेल अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.