महात्मा गांधींच्या संगमनेर भेटीला शंभर वर्षे पूर्ण! स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी केला होता देशव्यापी दौरा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशातील स्वदेशी चळवळ पुढे नेण्यासाठी महात्मा गांधी यांनी टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली. स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांकडून देणग्या मिळवण्यासाठी त्यांनी देशव्यापी दौरा आखला. या दौर्याचा एक भाग म्हणून महात्मा गांधी संगमनेरला आले होते. या घटनेला शुक्रवारी (21 मे) 100 वर्षे पूर्ण होत आहे, अशी माहिती संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक आणि विद्यमान कार्याध्यक्ष डॉ.संतोष खेडलेकर यांनी दिली.
महात्मा गांधींच्या संगमनेर दौर्याबद्दल सांगताना डॉ.खेडलेकर यांनी सांगितले की, 21 मे, 1921 रोजी महात्मा गांधी नाशिकहून संगमनेरला आले. संगमनेरातल्या काकासाहेब पिंगळे, बापूसाहेब पारेगावकर, तुकाराम निर्हाळी, गंगाधर दळवी, मुरलीधर जयरामदास मालपाणी, जगन्नाथ दळवी, गणेश सखाराम सराफ, लालसाहेब पीरजादे, शिवनारायण नावंदर, बाबुराव ठाकूर, शंकरराव संतवकील आदी पुढारी मंडळींनी महात्मा गांधींना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिले. गांधीजींनी ते स्वीकारले. त्यादिवशी ते शहरातील श्रीचंद वीरचंद गुजराती यांच्याकडे मुक्कामाला थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत महादेवभाई देसाई हे देखील होते. महात्माजींच्या मुक्कामानंतर या परिसराला गांधी चौक म्हणून ओळखले जात आहे. दुसर्या दिवशी 22 मे रोजी संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात गांधीजींची जाहीर सभा झाली. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संगमनेरकरांनी टिळक स्वराज्य फंडासाठी देणग्या दिल्या. सभेत गांधीजींनी केलेल्या आवाहनाने प्रभावित होऊन द्वारकाबाई मोहनीराज देशपांडे या गृहिणीने भर सभेत आपल्या हातातली सोन्याची पाटली टिळक स्वराज्य फंडासाठी दिली.
संगमनेरकर नागरिकांच्यावतीने गांधीजींना या सभेत मानपत्र देण्यात आले. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या या मानपत्रावर लालसाहेब पीरजादे, गणेश सखाराम सराफ, बाबुराव अण्णाजी ठाकूर, शिवनारायण शाळीग्राम नावंदर व तुकाराम बाळाजी निर्हाळी यांची नावे कोरलेली आहेत. हे मानपत्र गांधीजींनी त्यांची आठवण म्हणून पुन्हा नगरपालिकेकडे सुपूर्द केले. महादेव शंकर शिंदे नावाच्या कारागिराने तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले हे मानपत्र सध्या नगरपालिकेकडे उपलब्ध आहे. या सभेनंतर महात्मा गांधी कोपरगाव मार्गे येवला येथे सभेसाठी रवाना झाले. संगमनेरच्या सभेचा वृत्तांत 9 जून, 1921 च्या नवजीवन या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता.