शालिनी विखे आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्काराने सन्मानित
शालिनी विखे आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्काराने सन्मानित
नायक वृत्तसेवा, राहाता
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांना गौरविणार्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांना आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे.
महिला बचतगट चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक संधी प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ऑनलाईन पध्दतीने हा सोहळा पार पडला. अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. कृष्णाजी जगदाळे यावेळी उपस्थित होते. शालिनी विखे यांनी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचतगटांची चळवळ यशस्वी सुरू केली. दहा हजारांपेक्षा जास्त महिलांचे संघटन या चळवळीत जोडले गेले. घरगुती उत्पादनांपासून ते फुलांपासून अगरबत्ती तयार करण्याच्या संकल्पनेला व्यावसायिकतेची जोड देऊन ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना उद्योगाच्या तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्याने बचतगटाच्या उत्पादनांचा अहमदनगर जिल्ह्याचा स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण झाला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चळवळीत योगदान देणार्या महिलांनी आत्मनिर्भरतेने पुढे जाण्यासाठी या पुरस्काराने प्रेरणा मिळाली असल्याची भावना शालिनी विखे यांनी यावेळी व्यक्त केली.