विरोधकांनी अगस्ति कारखान्याची चिंता करू नये ः पिचड कोतूळ उपबाजार आवारात पेट्रोल-डिझेल पंपाचे लोकार्पण
नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ति सक्षमपणे चालू आहे, विरोधकांनी त्यांची चिंता करू नये. अकोले तालुक्यात अगस्ति कारखाना निवडणुकांना अजून अवधी त्या एप्रिल व मे मध्ये होऊ शकतात. या निवडणुकीसाठी मतदार यादी अजून निश्चित नाही तोच विरोधकांच्या जोर बैठका सुरू झाल्याची टीका माजी मंत्री तथा अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड यांनी केली. तर माजी आमदार वैभव पिचड यांनी आमदारांच्या नेतृत्वाखाली तालुक्याला यावर्षी मिळालेली 29 कोटींची सर्वात कमी नुकसान भरपाई म्हणजे आमदारांचा नाकर्तेपणा असल्याची टीका केली.
अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोतूळ उपबाजार आवारात बाजार समितीच्या पेट्रोल-डिझेल पंपाचा लोकार्पण सोहळा तसेच शॉपिंग सेंटरचे भूमीपूजन 50 टनी वे ब्रीज वजन काट्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती पर्बत नाईकवाडी होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले, अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती अडचणीत असताना उभी केली आता, या समितीमार्फत कोतूळ उपबाजार उभा राहत असल्याने परिसराच्या विकासाला हातभार लागणार आहे. आपण मुळा बांधणीचे काम केले. तर आंबितपासून साकूरपर्यंत बंधारे बांधले. यामुळे आदिवासी शेलद, वाघदरी सारख्या आदिवासी भागात शेतकरी ऊस पिकवू लागला. पिंपळगाव खांड धरणाची साईट शोधण्यासाठी मी पायी गवत तुडवले, आदिवासी उपयोजनेतून मी निधी दिला आणि धरण मार्गी लावले. मात्र या धरणाचे जलपूजन करणारे विरोधक मलाच शिव्या घालत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
निवडणुकीत मला सोडून जाणार्यांची काळजी करू नका. जनता माझ्या बरोबर आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यामुळे अगस्तिला पैसे उपलब्ध झाले. दिवाळी व कोरोना काळात शेतकर्यांना 125 रुपये प्रतिटन दिले. अगस्ति सुरळीत व चांगला चालू आहे. विरोधकांनी त्याची काळजी करु नये तर यापुढेही अगस्ति पूर्ण ताकदीने प्रगती पथावर न्यायचे काम आपल्याला करायचे असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
दरम्यान, शॉपिंग सेंटरला ‘मधुकर पिचड शॉपिंग सेंटर’ असे नामकरण करण्याचा ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाने केल्याने पिचड यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. माजी आमदार वैभव पिचड यांनीही तालुक्यातील विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत अगस्ति कारखान्यासाठी विरोधकांच्या गावोगाव बैठका सुरू आहेत; परंतु विरोधकांकडे कारखाना दिला त्यावेळी तुम्ही त्यात होता, तेव्हा तुम्ही काय केले हे लोकांना माहित आहे असे सांगत समाचार घेतला. आमदारकीच्या वेळी विद्यमान आमदारांनी अनेक स्वप्ने दाखविली. पूल आणि खेड्यांचे राजकारण केले, नवीन कोणतेही विकासाचे कामे नाही. मी भाजप प्रवेश केला त्यावेळी जी कामे मंजूर होती तीच कामे सुरू आहेत. नवीन कोणतेही काम सुरू नाही. केवळ भुलभुलैय्या सुरू असल्याची टीका पिचड यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषद भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, वाघापूरचे भाऊसाहेब बराते, हिंदुस्थान पेट्रोलियमचे कार्यकारी अभियंता आनंद शिंदे, कोतूळचे राजेंद्र देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. तर ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, पंचायत समिती सभापती उर्मिला राऊत, सदस्या माधवी जगधने, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, माजी सभापती सुधाकर देशमुख, यशवंत आभाळे, जे. डी. आंबरे, गणपत देशमुख, अगस्तिचे संचालक बाळासाहेब देशमुख, रावसाहेब वाळुंज, रोहिदास भोर, आनंद वाकचौरे, भाऊसाहेब कासार, आप्पासाहेब आवारी, सयाजीराव देशमुख, सुभाष वायळ, हौसाबाई हांडे, लक्ष्मण कोरडे, संगीता गोडसे, एचपीसीएलचे विक्री अधिकारी निखील वारकर, बाजार समितीचे सचिव अरुण आभाळे आदिंसह परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन संचालक बाळासाहेब सावंत यांनी केले तर आभार संचालक विजय लहामगे यांनी मानले.