अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी सोनसाखळी चोरांची टोळी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई; सात गुन्हे उघडकीस, साडेसात लाखांचा मुद्देमालही हस्तगत..
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
गेल्या मोठ्या कालावधीपासून अहमदनगर, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यांसह नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घालून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविणार्या टोळीचा परदाफार्श करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेच्या दमदार कारवाईत श्रीरामपूरातील दोघे जेरबंद झाले असून नाशिकमधील दोघे मात्र पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 65 हजार रुपयांचे दागिनेही हस्तगत केले आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांनाही भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, त्यांच्या चौकशीतून आणखीही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूरातील कुख्यात सोनसाखळी चोर सराफा बाजारात चोरीचे सोने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अहमदनगरच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना समजली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना पथकासह जावून कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ श्रीरामपूर गाठीत गांधी चौकात सोपळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार काही वेळातच संशयीत आरोपी विशाल बालाजी भोसले (वय 29, रा.अशोकनगर, श्रीरामपूर) हा हातात लाल रंगाची कापडी पिशवी घेवून जात असल्याचे पोलिसांना दिसले.
त्याला पाहताच गांधी चौकात चोहोबाजूने सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी एकाचवेळी धावा करीत त्याला जागेवरच पकडले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील कापडी पिशवीत सोन्याच्या दागिन्यांसह दोन लगड आढळून आल्या. त्याला मुद्देमालासह ताब्यात घेवून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात नेत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या अन्य साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर तालुका हद्दितील वडाळा महादेव येथे छापा घातला असता संदीप दादाहरी काळे (वय 32, रा.वडाळा महादेव) हा आरोपी आढळून आला तर योगेश सिताराम पाटेकर हा मात्र पसार झाला.
त्याला ताब्यात घेवून पोलीस पुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आले. यावेळी आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या टोळीतील लहु बबलु काळे (रा.आडगाव) हा नाशिकमध्ये रहात असल्याचे समजल्याने पोलिसांनी नाशिकमध्ये जावून त्याच्या घरावर छापा घातला, मात्र आरोपी आढळला नाही. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना घेवून थेट भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठले व दोन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात दिले. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करुन पोलीस कोठडी मागितली जाणार असून त्यांच्याकडून आणखीही काही गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे.
आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार चालू वर्षातील आत्तापर्यंतच्या कालावधीत या चौघांनी मिळून भिंगार कँम्प, कोतवाली, संगमनेर तालुका व संगमनेर शहर, श्रीरामपूर तालुका व नाशिक जिल्ह्यातील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित दोन गुन्हे केल्याचे समोर आले, या गुन्ह्यातील 7 लाख 65 हजारांचे दागिने विकण्यासाठीच आरोपी घराबाहेर पडला होता, मात्र सराफाच्या दुकानात पोहोचण्यापूर्वीच तो गुन्हे शाखेच्या हाती लागल्याने या टोळीचा परदाफार्श झाला आहे.
अटक करण्यात आलेला संदीप दादाहरी काळे (रा.वडाळा महादेव) हा कुख्यात सोनसाखळी चोर असून त्याच्यावर कोपरगाव शहरातील दोन, राहाता व लोणी शहरातील प्रत्येकी एक असे एकूण चार, पसार असलेल्या लहु बबलु काळे याच्यावर कोपरगाव शहरात दोन, नाशिक रोड परिसरात पाच तर सिन्नर परिसरात दोन आणि पसार असलेल्या योगेश सिताराम पाटेकर याच्यावर श्रीरामपूर तालुक्यातील एक व सिन्नर तालुक्यातील दोन गंभीर गुन्ह्यासह नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.
गेल्या चार दिवसांत स्थानिक गुन्हे शाखा एक्शन मोडमध्ये असून जिल्ह्यातील गुन्हेगारांचे निर्दालन करण्यासाठी एकामागून एक कारवाया केल्या जात आहेत. त्यात आज गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून सराईत सोनसाखळी चोरांची टोळी उघड झाल्याने अशा प्रकारांमध्ये घट होण्यासह पूर्वी घडलेल्या अनेक घटना उघड होण्याची दाट शक्यता आहे. या कारवाईत गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पो.हे.कॉ.विजय वेठेकर, भाऊसाहेब काळे, विश्वास बेरड, संदीप पवार, भाऊसाहेब कुरुंद, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, पो.कॉ.सागर ससाणे, रोहित यमुल, आकाश काळे, योगेश सातपुते व चालक पो.हे.कॉ.चंद्रकांत कुसळकर आदींचा सहभाग होता. या दमदार कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हे शाखेचे कौतुक केले आहे.