पुणे-नाशिक महामार्गावर बारा तासांत तीन अपघात! दुचाकींच्या अपघातात दोन ठार, दोन गंभीर जखमी; तर शेळकेवाडी शिवारात मालवाहू टेम्पो उलटला..

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची श्रृंखला सुरूच आहे. मंगळवार (ता.21) तर अपघातांचा वारच ठरला. पठारभागातील वरूडी फाटा येथे दोन दुचाकींच्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. तसेच कर्जुले पठार येथे अज्ञात वाहणाच्या धडकेत एकाचा बळी गेला. दुसर्‍या दिवशी बुधवारी (ता.22) पहाटे महामार्गालगत मालवाहू टेम्पो उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी तरुण विधीज्ञ शंतनू श्रीधर वैद्य (वय 35, रा. संगमनेर) हे दुचाकीवरुन (क्रमांक एमएच.17, सीएच.3633) संगमनेर मार्गे आळेफाट्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी जोर्वे येथील गणपत जाधव व अलका जाधव हे दुचाकीवरुन (क्रमांक एमएच.17, एक्यू.9942) जोर्वे येथून सारोळेपठारला जात होते. दरम्यान, दोनही दुचाकी वरूडी फाटा येथे आल्या असता अपघात होवून शंतनू वैद्य हे जागीच ठार झाले तर गणपत जाधव व अलका जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.

सदर अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग मदत केंद्राचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सुनील साळवे, उमेश गव्हाणे, नंदकुमार बर्डे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर टोलनाक्याचे कर्मचारीही रुग्णवाहिका घेवून घटनास्थळी हजर झाले. याचदिवशी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कर्जुले पठार येथील अनिल लहानू अरगडे (वय 38) हे महामार्ग ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाले. या दोन्ही अपघातांच्या घटनेने वैद्य व अरगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


दुसर्‍या दिवशी अपघातांची श्रृंखला कायम राहून पहाटे मालवाहू टेम्पो नाशिक येथून संगमनेर मार्गे पुण्याच्या दिशेने जात असताना शेळकेवाडी शिवारात महामार्गालगत उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामध्ये अनेक दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहे. याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा अपघातांची श्रृंखला सुरूच राहून, अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात राहील.

Visits: 165 Today: 2 Total: 1113981

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *