दोन गावठी कट्टे व अकरा जिवंत काडतुसांसह एकास अटक

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सलाबतपूर येथे दोन गावठी कट्ट्यांसह 11 जिवंत काडतुसे कमरेला लावून गावात दहशत निर्माण करणार्या सराईत गुन्हेगाराला नेवासा पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने गजाआड केले असल्याची माहीती सोमवारी (ता.30) दुपारी साजेतीन वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर शिवारात राहणार्या विलास श्रीपती काळे याचा मुलगा पाल्या विलास काळे याने दोन गावठी कट्ट्यांसह 11 जिवंत काडतुसे खरेदी केले होते. हे गावठी कट्टे व जिवंत काडतुसे कमरेला लावून त्याचा बाप विलास काळे गावात दहशत निर्माण करत असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राहुल यादव यांना मिळाली. सदर घटनेची माहिती यादव यांनी परिक्षाविधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक त्यागी यांना दिली. त्यागी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सलाबतपूर परिसरात पोलिसांचा फौजफाटा सज्ज करुन मोठ्या शिताफीने दोन गावठी कट्टे आणि 11 जिवंत काडतुस असा एकूण 85 हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीस गजाआड करण्यात यश मिळविले. यातील विलास काळे (वय 65) याला अटक केली आहे तर त्याचा मुलगा पाल्या काळे हा फरार झालेला आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असून लवकरच आरोपीस अटक करण्यात येणार असल्याचा आशावाद अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे यांनी व्यक्त केला आहे.

