वृद्धाच्या मूत्रनलिकेची किचकट शस्त्रक्रिया संगमनेरात यशस्वी मूत्रविकार तज्ज्ञ डॉ.हृषीकेश वाघोलीकरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव

महेश पगारे, संगमनेर
संगमनेरचे वैद्यकीय क्षेत्र उत्तर नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी जणू नवसंजीवनी देणारे ठिकाणच बनले आहे. शहरात अनेक नामवंत आणि अनुभव असणारे वैद्यक कोरोनाच्या संकटातही चोवीस तास सेवा देत आहेत. यामुळे असंख्य रुग्ण उपचारांसाठी संगमनेरची निवड करतात. याचाच प्रत्यय नुकताच आला असून, 66 वर्षीय वृद्धाची किचकट शस्त्रक्रिया करण्याचे दिव्य मूत्रविकार तज्ज्ञ डॉ.हृषीकेश वाघोलीकर यांनी लिलया पार पाडत वृद्धाला ‘नवसंजीवनी’ दिल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तालुक्यातील वृद्ध नामदेव केरे (वय 66) यांना बर्‍याच वर्षांपासून लघवीचा त्रास होत होता. लघवी करताना वेळ लागणे, वारंवार संसर्ग होणे आदी समस्यांनी ते त्रासले होते. त्यांनी विविध तपासण्या केल्यानंतर असे लक्षात आले की त्यांची पूर्ण मूत्रनलिका ही खराब झाली (युरेथ्रल स्ट्रीक्चर) असून, शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा त्यांनी संगमनेरातील प्रथितयश मूत्रविकार तज्ज्ञ डॉ.हृषीकेश वाघोलीकर यांची भेट घेत समस्या सांगितली. त्यानंतर अन्य तपासण्या केल्यानंतर ‘युरेथ्रोप्लास्टी’ ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेची तारीख ठरवली आणि किचकट शस्त्रक्रियेचे शिवधनुष्य डॉ.वाघोलीकरांनी हाती घेतले. दोन्ही गालाच्या आतली कातडी (बकल म्युकोजा ग्राफ्ट) घेऊन त्यापासून नवीन मूत्रनलिका बनविली. संपूर्ण मूत्रनलिका खराब असल्याने शस्त्रक्रिया तब्बल 5 तास चालली. त्यात रुग्ण वयस्कर असल्याने भूल देताना नेहमीपेक्षा जास्त धोका असतो, तसेच शस्त्रक्रियेची जखम भरून येण्यासही अडथळा येऊ शकतो. या शक्यता लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेत रुग्णाला अवघ्या पाचच दिवसांत रुग्णालयातून सुट्टी दिली. शिवाय शस्त्रक्रियेचा कोणताही त्रास रुग्णाला झाला नाही.

दरम्यान, 4 आठवड्यानंतर लघवीची नळी काढल्यानंतर रुग्णाला व्यवस्थितरित्या लघवी झाली व पूर्ण जखमही भरून आली. रुग्णाला याआधी इतक्या वर्षांपासून असलेला लघवीचा त्रास यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मुक्त झाला आहे. विशेष म्हणजे सदर शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेंतर्गत ‘धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ येथे पूर्णपणे मोफत करण्यात आली. या नवीसंजीवनीबद्दल कृतकृत्य झालेले रुग्ण नामदेव केरे यांनी डॉ.वाघोलीकरांचे आभार मानले आहे. तर सर्वच क्षेत्रांतून देवदूत डॉ.वाघोलीकरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डॉ.हृषीकेश वाघोलीकर हे युरो शल्यविशारद असून, ते संगमनेरमधील सुप्रसिद्ध फिजीशियन स्व.डॉ.दिनेश वाघोलीकर यांचे चिरंजीव आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ते संगमनेर व आजुबाजूच्या परिसरात कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी मुतखडा, प्रोस्टेट व इत्तर मूत्रविकारांवर 750 हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. विशेष म्हणजे कोविड काळातही मागील दोन महिन्यात त्यांनी 6 वेळा युरेथ्रोप्लास्टी ही किचकट शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे मूत्रविकारातील रुग्णांसाठी ते ‘देवदूत’च ठरत आहे.

Visits: 29 Today: 1 Total: 221814

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *