रक्षाबंधनाच्या दिनीच एका भगिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न! गंगामाईचा पवित्र परिसर बनला गंजडींचा अड्डा; पोलिसांनी वेळीच लक्ष्य देण्याची गरज..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस असलेल्या रक्षाबंधनाच्या दिनी संगमनेरातून धक्कादायक वृत्त समोर आले असून चक्क एका भगिनीवर अतिप्रसंग करण्याचा दोघांनी प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून संबंधित तरुणीने दाखवलेली धिटाई आणि ऐनवेळी केशवतीर्थावरील एका वृद्धांची त्या भगिनीच्या मदतीसाठी धाव पुढील अनर्थ टाळण्यास कारणीभूत ठरली. याप्रकरणी चौघा संशयितांची नावे समोर आली असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दररोज शेकडों महिलांची वर्दळ असलेल्या व हिंदू धर्मियांसाठी मंदिरांचा परिसर म्हणून परिचित असलेल्या गंगामाई परिसरात सदरचा प्रकार घडला असून अतिप्रसंग करणारे टोळके गंजडी असल्याचेही समोर आले आहे. या प्रकाराने या परिसरात येणार्या नागरिकांनी संताप व्यक्त केला असून नदी परिसरातील नशेडींसह येथे सारखा वावर असणार्या वाळू तस्कारांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता.22) देशभर रक्षाबंधनाचा सण उत्साहाने साजरा होत असतांना संगमनेरच्या प्रवरानदीकाठावरुन मात्र धक्कादायक वृत्त हाती आले आहे. आपल्या भावंडांना राखी बांधून त्यांच्याकडून सुरक्षेचे कवच प्राप्त केलेली एक भगिनी यासंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे साई मंदिरात दर्शनासाठी गेली व तेथून नदीकाठी चक्कर म्हणून गंगामाईपर्यंत पायी जावून माघारी येतांना केशवतीर्थ घाटाजवळील खुर्च्यांवर काहीवेळ बसली. यावेळी सदरची तरुणी आपल्या मोबाईमध्ये आलेल्या राखी पोर्णिमेच्या संदेशांना प्रतिसाद देण्यात गर्क असतांना आसपासचा परिसर सामसुम पाहून दोघां गंजडींच्या मनातील राक्षस जागा झाला.
त्यातील एकाने कडेकडेने त्या तरुणीच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. त्या तरुणीचे त्याच्याकडे लक्ष जाईपर्यंत तो जवळपास तिच्याजवळ पोहोचला होता. त्याला पाहताच त्या तरुणीचे लक्ष्य त्याच्यावर खिळले, त्याचे हावभाव आणि जवळ येण्याची कृती पाहून त्या तरुणीला काहीतरी अघटीत होणार याची कल्पना आली. तिने उभे राहून त्याला दरडावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर त्या तरुणीने मोबाईल हातात घेवून पोलिसांनाच फोन करते असे म्हणत फोनही कानाला लावला. मात्र त्याचाही त्या गंजडीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर तर त्याने धडक पुढे जात ‘ऐ थांब’ असे म्हणत त्या तरुणीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्या गंजडीचा दुसरा एक साथीदार जवळच्या बांधावर उभा राहून योग्य क्षणाचीच प्रतीक्षा करीत होता.
आता आपले काही खरे नाही असे लक्षात आलेल्या त्या तरुणीने अखेर जीवाच्या आकांताने मोठ्याने हाका मारण्यास सुरुवात केली, आणि जणू साक्षात केशवतीर्थच तिच्या मदतीला धावला. त्या तरुणीचा मदतीचा धावा ऐकताच घाटावरुन दरडावणीचे श्वर ऐकू आले, ते ऐकून त्या गंजडींची नशाच उतरली आणि अवघ्या काही क्षणातच ते दोघेही तेथून पसार झाले. त्या नंतर त्या तरुणीने संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि नंतर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना फोन करुन घडला प्रकार सांगितला. त्यानंतर काही वेळाने पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी गंगामाईवर येवून परिसर पिंजला मात्र, ते नशेबहाद्दर आढळले नाहीत. संबंधित तरुणीने आज सकाळी शहर पोलीस ठाण्यात जावून घडला प्रकार कथन केला आहे. पोलिसांनाही या प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता असलेली चार नावे समजली असून सकाळपासून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
संगमनेर शहरातील नागरिकांना फिरण्यासाठी अथवा पाहुण्यांना दाखवण्यासाठीचे एकमेव ठिकाण म्हणजे गंगामाईचा परिसर. त्यातच या संपूर्ण परिसरात असंख्य मंदिरे असल्याने पहाटेपासूनच भजन-कीर्तनाचे स्वर या परिसरातून कानी पडत असतात. संगमनेरातील शेकडों नागरिक अगदी पहाटेपासूनच या परिसरात फिरण्यासाठी येतात, त्यात महिलांची संख्या खुप मोठी असते. सदरचा प्रकारही नेमका गंगामाई घाटापासून ते केशवतीर्थापर्यंतच्या परिसरात घडला आहे. सध्या हा संपूर्ण परिसर गंजडी, दारुडे व वाळू तस्करांच्या ताब्यात असून दिवसभर या भागात त्यांचा अनिर्बंध वावर असतो. त्यातूनच ऐन रक्षाबंधनाच्या दिनी एका भगिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी काळ सोकावण्यापूर्वीच या प्रकरणात सहभागी असलेले हुडकून त्यांना आसमानाची सफर घडवण्याची गरज आहे. या घटनेने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदू धर्मियांसाठी अतिशय पवित्र असलेल्या गंगामाई परिसरात अनेक प्राचीन मंदिरांसह दशक्रीया विधीचे ठिकाणही आहे. संगमनेरातील फिरण्याचे एकमेव ठिकाण म्हणून महिला, मुली, तरुण व वृद्धांचा नेहमीच येथे मोठा वावर असतो. आजवर या परिसरात महिलांवर हात टाकण्याचा प्रकार समोर आलेला नाही. मात्र गेल्या काही महिन्यांत या परिसराचा ताबा गंजडी, दारुडे आणि वाळू तस्करांकडे गेल्याने या पवित्र परिसरात अवैध उद्योग सुरु झाले आहेत. रविवारच्या घटनेने त्याचे संकेतही दिले आहेत. पोलिसांनी वेळीच या गोष्टीची दखल घेवून येथील टवाळखोरांचे बेकायदा अड्डे उध्वस्थ करण्याची गरज आहे, अन्यथा गंगामाई परिसरात घडलेली एखादी घटना शहराचे स्वास्थ बिघडवणारी ठरेल हे मात्र खरे.