अवैध वाळू वाहतुकीसाठी लाच मागितल्याप्रकरणी पोलीस शिपाई निलंबित राहुरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी; जिल्हा पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील चिखलठाण येथे अवैध वाळू वाहतुकीसाठी लाच मागितल्याप्रकरणी व्हिडीओ पुराव्यासह ग्रामस्थांच्या तक्रारीवरून पोलीस शिपाई श्रीकृष्ण बाबासाहेब केकाण यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत त्यांची अहमदनगर येथील पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चिखलठाण येथे 12 ऑक्टोबरला घराच्या कामासाठी मुळा नदीपात्रातून वाळू भरून चाललेला टेम्पो पोलीस शिपाई श्रीकृष्ण केकाण यांनी पकडला. याप्रकरणी टेम्पो मालक भारत नानाभाऊ काळनर यांच्याकडे अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता मागितला. पैसे दिले नाही तर, साहेबांनी गाडी लावायला सांगितली आहे. अशी वरिष्ठांच्या नावाने लाच मागितली आणि पोलीस खात्याची बदनामी केली. याप्रकरणी 15 मिनिटांच्या व्हिडीओ पुराव्यासह ग्रामस्थ भारत काळनर व जमीर सय्यद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिले.

पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी तक्रारीची प्राथमिक चौकशी केली. त्यात, व्हिडीओ पुराव्यातील संभाषण व साक्षीदारांचे जबाब नोंदवून त्याचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला. त्यावर 11 नोव्हेंबरला निलंबनाचा आदेश काढण्यात आला. त्यात व्हिडीओ क्लिपमध्ये अवैध वाळू वाहतुकीच्या हप्त्याची मागणी करताना दिसत आहे. केकाण यांनी बेजबाबदार वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली आहे. चौकशीत हस्तक्षेप व साक्षीदारांवर दबाव टाकण्याची संधी प्राप्त होऊ नये. म्हणून त्यांना पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. तसेच केकाण यांनी जिल्हा मुख्यालयात प्रत्येक शुक्रवारी परेड ग्राउंडवर उपस्थित राहून हजेरी द्यावी. पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही, असेही आदेशात म्हंटले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा 11 नोव्हेंबर रोजीचा पोलीस शिपाई श्रीकृष्ण केकाण यांच्या निलंबनाचा आदेश राहुरी पोलीस ठाण्याला प्राप्त झाला आहे. तेव्हापासून केकाण गैरहजर होते. त्यांना बोलावून बुधवारी (ता.25) आदेश बजावला आहे. त्यांच्या गैरहजेरीचा अहवाल नुकताच मुख्यालयात पाठविला आहे.
– हनुमंत गाडे (पोलीस निरीक्षक, राहुरी)

Visits: 17 Today: 1 Total: 169685

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *