बेपत्ता कांतीलाल शेंडगें सुखरूप! पोलिसांनी घेतले बेंगलोर मधून ताब्यात

नायक वृत्तसेवा, साकुर 
उधारीचे पैसे वारंवार मागूनही ते न मिळाल्याने वैतागलेल्या  कांतीलाल दौलत शेंडगे या दिव्यांगाने शनिवार दि. ५ जुलै रोजी घरात एक चिठ्ठी लिहून ठेवुन घरदार सोडले होते. त्यामुळे शेंडगे यांची पत्नी मुले आणि नातेवाईक काळजीत होते. त्यातूनच त्यांच्या पत्नीने घारगाव पोलिसात पती बेपत्ता असल्याची खबर दिली होती. घारगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम बेपत्ता शेंडगे यांच्या शोधासाठी रवाना केल्या होत्या. अखेर त्यातील एका टीमला यश आले असून पोलिसांनी कांतीलाल शेंडगे यांना सुखरूप कर्नाटक राज्यातील बँगलोर येथून ताब्यात घेत कायदेशीर सोपस्कार पार पाडत त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली केले. 
शनिवार दि.५ जुलै रोजी तालुक्यातील साकुर येथील कांतीलाल दौलत शेंडगे या दिव्यांग व्यक्तीने उधारीचे पैसे मिळत नसल्याने कोणाला काहीही न सांगता घरदार सोडले होते. यावेळी  कांतीलाल यांनी  एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत काही व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करत त्या लोकांकडे माझे कष्टाचे लाखो रुपये गुंतून पडले असून त्यांच्यामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे त्यांच्या पत्नीने घारगाव पोलीस ठाणे गाठत पती बेपत्ता असल्याची खबर पोलिसांना दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या पथकातील पो. कॉ. महादेव हांडे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे यांनी कांतीलाल शेंडगे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.या पथकाने तपासाला गती देत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कांतीलाल शेंडगे कुठे आहे याचा अचूक शोध घेतला. त्यानंतर पथकातील पो. कॉ. महादेव हांडे, पो.कॉ. प्रमोद गाडेकर, पो.कॉ सुभाष बोडखे यांनी थेट कर्नाटक राज्यात जाऊन बेंगलोर येथून  कांतीलाल शेंडगे यांना सुखरूप ताब्यात घेतले. यावेळी कांतीलाल यांचा जबाब घेण्यात आला. त्यानंतर कांतीलाल यांना  त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
Visits: 122 Today: 2 Total: 1107224

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *