विडी कामगारांच्या समस्या सोडविणारा निस्वार्थी सेवाव्रती ः सायण्णा एनगंदुल
विडी कामगारांच्या समस्या सोडविणारा निस्वार्थी सेवाव्रती ः सायण्णा एनगंदुल
सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी झुंजणार्या लढवय्यावर जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील विडी कामगारांच्या असंख्य समस्यांना वाचा फोडून न्याय देणारे राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ समाजवादी नेते साथी सायण्णा एनगंदुल यांनी आज वयाच्या 89 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने सेवाव्रत व्यक्तिमत्त्वास समाजातील उपेक्षित, वंचित आणि विडी कामगारांसह विविध क्षेत्रांतील घटकांनी त्यांच्यावर शुभेच्छा आणि निरोगी आयुष्य लाभावे यासाठी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

साथी सायण्णा एनगंदुल यांचा जन्म 20 नोव्हेंबर, 1932 एका गरीब कुटुंबात झाला आहे. तेव्हापासून गरिबीचे चटके सहन केल्याने भविष्यातही गोरगरीबांची सेवा करण्याचा ध्यास उराशी बाळगून समाजवादी चळवळीत उतरले. यातूनच शिकवण मिळाल्याने स्वतःचे आयुष्य खुल्या पुस्तकासारखे जगून, स्वतःचे कपडे स्वतः धुऊन नव्या पिढीला साधेपणा आणि स्वावलंबनाचे धडे देणारा सेवादल सैनिक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यावेळी अनेक गोरगरीबांचे विडी तयार करणे हे रोजगाराचे मुख्य साधन होते. साहजिकच त्यांच्या समस्याही असणार. या समस्या सोडविण्यासाठी कामगार चळवळीमध्ये उतरत आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडल्याने अल्पावधीतच राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व केले. या माध्यमातून विडी कामगारांना महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळवून देण्यात यशस्वी झालेला कामगार पुढारी म्हणून लौकिकही मिळविला. याचबरोबर विडी वेल्फेयर बोर्डामार्फत विडी कामगारांसाठी घरकुल, दवाखाना आणि विडी कामगार पाल्यांसाठी शिष्यवृत्ती हे उपक्रम सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला.

या दरम्यानच माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या भारत यात्रेत सहभागी होऊन देशभर पायी चालले. तसेच एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, बापू काळदाते, मृणाल गोरे, भाई वैद्य, भास्करराव दुर्वे (नाना) आदी दिग्गजांसमवेत काम करण्याचे भाग्यही त्यांना लाभले. याचबरोबर शेतकरी शेतमजूर पंचायत, विडी मजदूर सभा, हिंद मजदूर सभा यांच्या माध्यमातून देश पातळीवर आवाज उठवून न्याय मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, मंडल आयोग चळवळ यातही हिरीरीने सहभागी होत आपले योगदान दिले. आणीबाणी विरोधात कार्य केल्याने दीडवर्ष तुरुंगवासही भोगला.

राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी सेवा पथक यांच्या माध्यमातूनही काम करत समाजाप्रति उत्तरदायित्व निभावले. विशेष म्हणजे भारत सरकारच्या ऑल इंडिया विडी वेलफेयर बोर्डाचे दोन वेळा संचालक, महाराष्ट्र सरकारच्या विडी कामगार किमान वेतन समितीचे सदस्य अशी पदेही त्यांनी भूषवत कर्तृृत्वाची छाप सोडली आहे. यामुळेच त्यांची समाजात निस्वार्थी सेवाव्रती म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आज त्यांचा जन्मदिवस असल्याने सर्वच क्षेत्रातील घटकांनी त्यांच्यावर निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावे म्हणून सदिच्छांचा वर्षाव केला आहे.

आयुष्यभर मोर्चे, धरणे, जेलभरो, बेमुदत उपोषणे, सत्याग्रह आदी मार्गाने सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी झुंजत असलेला लढवय्या म्हणून साथी सायण्णा एनगंदुल यांनी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांना 89 व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
– हिरालाल पगडाल (संगमनेर)

