‘भविष्य निर्वाह निधी आपल्या दारात’ उपक्रम संपन्न मालपाणी उद्योग समूहाचा पुढाकार; कामगारांच्या समस्या सोडवण्यावर भर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील मालपाणी उद्योग समूहाच्या पुढाकाराने केंद्र सरकार पुरस्कृत ‘भविष्य निर्वाह निधी आपल्या दारात’ हा उपक्रम संगमनेरमध्ये संपन्न झाला. जनता दरबार स्वरूपाच्या या उपक्रमामध्ये अनेकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या आणि निवृत्त वेतनाशी संबंधित समस्यांची सोडवणूक झाल्याने कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू सफल झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

भविष्य निर्वाह निधीच्या नगर विभागाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी मालपाणी इंडस्ट्रियल पार्कच्या शिवशक्ती सभागृहामध्ये सोमवारी (ता.29) दिवसभर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यामध्ये अंमलबजावणी अधिकारी अमित आहुजा, दीपक चौधरी, समन्वयक अन्वर खान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे महेश धनके यांचा समावेश होता. मालपाणी उद्योग समूहाचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक शिवाजी आहेर यांच्या सहकारखान्याचे व्यवस्थापक रमेश घोलप, बाळासाहेब हासे, रवींद्र कानडे, विशाल वाजपेयी, संतोष राऊत, राहुल शेरमाळे, मंगेश सोनवणे, मुरारी देशपांडे, अर्चना शुक्ला, नितीन हासे, प्रदीप कानवडे, कामगार संघटनेचे नेते कॉ.माधव नेहे, सरचिटणीस अ‍ॅड. ज्ञानदेव सहाणे, बाळासाहेब पवार, गणेश थोरबोले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विशाल वाजपेयी यांनी भविष्य निर्वाह निधी विभागाच्या सहकार्यामुळे आजपर्यंत मालपाणी उद्योग समूहातील 9 हजार 416 दावे सकारात्मक पद्धतीने निकाली निघण्यास मदत झाल्याचे सांगितले. त्यामुळे अनेक परिवारांचे भविष्य सावरण्यास हातभार लागला अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिवाजी आहेर यांनी आपल्या मनोगतात सदर उपक्रमासाठी भविष्य निर्वाह निधी विभागाने टाकलेले लोकाभिमुख पाऊल उद्योगातील कामगार, कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक सर्वांनाच सहाय्यभूत ठरणारे असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड. सहाणे, कॉ. नेहे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. संतोष राऊत यांनी सूत्रसंचालन केले.

Visits: 40 Today: 1 Total: 395706

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *