संगमनेरच्या ऐतिहासिक हनुमान विजय रथोत्सवात अडथळा! 95 वर्षानंतर पहिल्यांदाच रथ रोखला; धुडगूस घालणार्‍या अकराजणांवर गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पाचशे सशस्त्र ब्रिटीश पोलिसांची दहशत पायदळी तुडवून अव्याहत पार पडल्याने ‘विजय रथ’ म्हणून इतिहासात नोंद झालेल्या संगमनेरच्या हनुमान जयंती उत्सवाला यंदा मात्र गालबोट लागले. दरवर्षी देवस्थानच्या विश्‍वस्त समितीद्वारा आयोजित होत असलेल्या या उत्सवात यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी धुडगूस घालून दहशत निर्माण केली. त्यातून निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात प्रत्यक्ष उत्सवाच्या दिनी निघालेल्या रथोत्सवात नियोजनाशी कोणताही संबंध नसलेल्या अकराजणांनी वाद्य आडवी लावून मार्गस्थ झालेला हनुमानाचा रथ 95 वर्षांनंतर पहिल्यांदाच रोखला. यावेळी जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला असता वरील लोकांनी दहशत निर्माण करीत वाद्य वाजवण्याच्या काठ्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करुन भाविकांच्या भावना दुखावल्या. या प्रकरणी श्रीरामनवमी व हनुमान जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरुन दहाजणांसह एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषसिद्ध झाल्यास दहा वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा होवू शकते.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना शुक्रवार 11 व शनिवार 12 अशा दोन्ही दिवस घडली. या प्रकरणी जन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष कमलाकर भालेकर यांनी सोमवारी (ता.14) रात्री उशिराने दिलेल्या फिर्यादीनुसार यंदाच्या उत्सवासाठी समितीने जुन्नर येथील शिवनेरी ढोलताशा पथक ठरवले होते. परंपरेनुसार सदरचे ढोलपथक उत्सवाच्या पूर्वसंध्येला संगमनेरात दाखल झाले. रात्री नऊच्या सुमारास त्यांच्याकडून श्री हनुमानाला सलामी देण्यासाठी वाद्य वाजवली जात होती. त्याचवेळी विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमर्जी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनु गोविंद नालकर आदी सहाजण कानिफनाथ ढोलताशा पथक घेवून आले व अचानक त्यांनीही वाद्य वाजवण्यास सुरुवात केली.


सदरचा प्रकार पाहून त्यावेळी उपस्थित असलेल्यांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाल्याने चंद्रशेखर हिंदू मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.गिरीश मेंद्रे यांनी सदर ठिकाणी जावून वरील सहाजणांना यांची सलामी झाल्यानंतर तुम्ही वाजवा असे सांगत समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे उत्सव समितीचे उर्वरीत सदस्यही त्या ठिकाणी धावले व वाद सोडवू लागले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्या सर्वांनी ‘हा तुमच्या बापाचा उत्सव आहे का?’ असे म्हणतं धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या गदारोळात योगेश मांगलकर, चेतन तारे, योगीराज परदेशी, श्यामसुंदर जोशी, किशोर उर्फ शुभम रहाणे, ज्ञानेश्‍वर थोरात व अन्य काहीजण वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करीत असताना विनायक गुरुडकर याने योगीराज परदेशी यांची कॉलर पकडून त्यांच्या पोटात लाथ मारली. सौरभ उमर्जीने धक्काबुक्की करीत खिशातील चाकूने चेतन तारे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.


अमोल क्षीरसागर याने फिर्यादी भालेकर यांना शिवीगाळ करीत ‘उद्या तुम्ही चौकातून रथच कसा काढता ते बघतो..’ अशी धमकी दिली. शेखर सोसे याने हातातील फायटरच्या सहाय्याने किशोर लहामगे याच्या डोक्यात घाव घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वेळीच वाकल्याने फायटरचा फटका त्याच्या खांद्यावर बसला. सोनु नालकर याने ‘त्या’ सर्वांना मारुन टाका, सोडू नका अशी चिथावणी दिली तर, श्याम नालकर याने श्यामसुंदर जोशी यांना ‘तु पुन्हा चौकात दिसला तर, मारुन टाकील’ अशी धमकी भरली. यावेळी परिसरातील नागरिकांसह मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असल्याने त्यातील काहींनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद सोडवले आणि श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला क्षुल्लक कारणावरुन वाद उकरुन सुरु झालेल्या झटापटीवर पडदा पडला. मात्र या घटनेने या उत्सवाला गोलबोटंही लागले आणि त्यातून तणावही निर्माण झाला.


दाखल फिर्यादीनुसार प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी (ता.12) सकाळी साडेसातच्या सुमारास ऐतिहासिक परंपेरनुसार जमलेल्या शेकडों महिलांनी रथाचा दोर ओढला आणि श्री हनुमानाच्या विजयी रथोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. रथयात्रा सुरु होवून जवळपास 15 मिनिटांचा कालावधी झाल्यानंतर विनायक गरुडकर, शुभम परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयूर जाधव उर्फ पप्पू यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी वाद्य आडवी लावून मार्गस्थ झालेला हनुमानाचा रथ रोखला. 1929 साली ब्रिटीश मॅजिस्टे्रट रावसाहेब तांबे यांच्या आदेशाने पाचशे सशस्त्र पोलिसांनी पहिल्यांदाच संगमनेरच्या हनुमान जयंती उत्सवात अडथळा आणून रथाचा मार्ग रोखला होता. त्यावेळी संगमनेरच्या झुंजार महिलांनी स्त्री शक्तिचा पराक्रम दाखवताना ब्रिटीशांचा बंदी हुकूम पायदळी तुडवित रथाची चाके ओढली.


तेव्हापासून आजवर कधीही, अगदी कोविड संक्रमणाच्या काळातही या रथाला कोणीही रोखू शकले नाही. यावेळी मात्र काही मूठभर महत्त्वकांक्षी लोकांनी थेट उत्सवाच्या नियोजनातच शिरकाव करीत तब्बल 95 वर्षांनंतर पहिल्यांदाच श्रीराम मंदिरापासून मार्गस्थ झालेला हनुमानाचा विजय रथ अडथळे निर्माण करुन रोखला. त्यामुळे हनुमान भक्तांच्या आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे दाखल फिर्यादीत म्हंटले आहे. मार्गस्थ रथाची चाके अडखळल्याचे पाहून तेथे धावलेल्या उत्सव समितीच्या ज्ञानेश्‍वर थोरात, श्यामसुंदर जोशी, योगीराज परदेशी यांनी संबंधितांना आता रथ आडवू नका अशी विनवणी केली असता विनायक गरुडकर व त्याच्या साथीदारांनी त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गरुडकरने परदेशी यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली, त्यावेळी मध्यस्थी करणार्‍या ज्ञानेश्‍वर थोरात यांचीही त्याने गचांडी धरली व त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी ओढून घेतली.


यावेळी पाठीमागील बाजूस असलेल्या मयूर जाधव याने ढोल वाजवण्याच्या काठीने ज्ञानेश्‍वर थोरात यांच्या तोंडावर व डोक्यावर फटके मारण्याचा प्रयत्न केला. राहुल नेहुलकर याने श्यामसुंदर जोशी याची कॉलर पकडून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी उत्सवात बंदोबस्त कामी हजर असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना वेगळे केल्याने जवळपास अर्धातास सुरु असलेल्या या अडथळा नाट्यावर पडदा पडला आणि ब्रिटीशांनंतर पहिल्यांदाच काहींच्या धुडगूसाच्या कारणाने रोखलेली श्री हनुमान विजय रथाची चाके पुन्हा गतिमान झाली. यासर्व घटनाक्रमानंतर आतातरी परिस्थती शांत राहील असे चित्र असताना ते फोल ठरले. रथोत्सव पूर्ण करुन घरी परतलेला चेतन तारे हा समिती सदस्य दुपारच्या जेवणानंतर दारापुढे हात धूत असताना एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने गलोलीचा वापर करुन त्याला खडा मारला. तो त्याच्या कानफटीत लागल्याने त्याला उलटी होवून तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.


सलग दोन दिवस एकामागून एक घडलेल्या या तीन घटनांनी यंदाच्या श्री हनुमान जयंती जन्मोत्सवाला वादाची किनार लागली. त्यातून हनुमानाच्या विजय रथाची चाके रोखली गेल्याची सल निर्माण झाल्याने अखेर श्रीराम व हनुमान जन्मोत्सव समितीने या प्रकरणी तक्रार देण्याचा निर्णय घेवून सोमवारी (ता.14) रात्री उशिराने समितीचे उपाध्यक्ष कमलाकर भालेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमर्जी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनु गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयूर जाधव उर्फ पप्प्या, राहुल शशीकांत नेहुलकर या दहा जणांसह एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर भारतीय न्यासंहितेच्या कलम 119 (1), 189 (2), 191 (2) (3), 118 (1), 115, 125 (अ), 126 (2), 61 (2), 300, 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने पोलिसांच्या हाती सबळ पुरावा आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषसिद्धी झाल्यास आरोपींना 119 (1) नुसार दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा होवू शकते.


23 एप्रिल 1929 रोजी तत्कालीन ब्रिटीश मॅजिस्ट्रेट रावसाहेब तांबे यांच्या आदेशाने पाचशे सशस्त्र पोलिसांनी चंद्रशेखर चौकाला गराडा घालून त्यावेळच्या रथोत्सवाला मनाई केली होती. मात्र झुंबराबाई अवसक (शिंपी), बंकाबाई परदेशी, लीलाबाई पिंगळे यांच्यासह शेकडो महिलांनी ब्रिटीशांचा बंदी हुकूम पायदळी तुडवून हनुमान रथाच्या चाकांना गती दिली. या घटनेनंतर गेल्या 95 वर्षात पुन्हा कधीही मार्गस्थ झालेल्या या रथाला कोणीही रोखू शकले नाही. अगदी कोविड संक्रमणाच्या काळातही शासनाने विशेष आदेश देत शंभर महिलांच्या उपस्थितीत रथाचा दोर ओढून ही परंपरा अव्याहत ठेवली. यावेळी मात्र या परंपरेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने संगमनेरच्या हनुमान भक्तांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. धार्मिक ठिकाणं आणि उत्सव राजकीय आखाडे बनू नयेत अशा प्रतिक्रियाही आता समोर येवू लागल्या आहेत.

Visits: 35 Today: 1 Total: 435808

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *