… अखेर देसवडेचा स्वातंत्र्योत्तर काळापासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी!
… अखेर देसवडेचा स्वातंत्र्योत्तर काळापासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी!
जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या निधीतून कामास सुरुवात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर-पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवरील देसवडे (काळेवाडी) गावाचा स्वातंत्र्योत्तर काळापासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न अहमदनगर जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या विकास निधीतून मार्गी लागणार आहे. नुकताच या कामाचा शुभारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
![]()
देसवडे (काळेवाडी) गावची मुख्य बाजारपेठ संगमनेर तालुक्यातील साकूर ही आहे. परंतु, या गावामध्ये तीनशे मीटर उंचीचा डोंगर असल्याने पूर्वीच्या काळी रखरखत्या उन्हात माता-भगिनी पिण्याचे पाणी पायथ्याकडून माथ्यावर घेऊन जात असल्यामुळे या पाऊलवाटेला ‘पाणघाट’ अशी ओळख मिळाली आहे. मात्र, दहा मिनिटांच्या अंतरावरचं साकूर सध्या दळणवळणाच्या दृष्टीने खूप अडचणीचे ठरत आहे. देसवडे-मांडवेकडून साकूरला पोहोचण्यासाठी तब्बल 45 मिनिटे लागतात तर टेकडवाडीकडून साकूरला पोहोचण्यासाठी 1 तास 15 मिनिटे लागतात. शेतकर्यांना खताच्या गोण्या, फवारणी औषधे आणण्यासाठी आठवड्यातून तीन-चार वेळा जावे लागते. तसेच नदीकाठी राहणार्या लोकांची शेती पठारावरती आहे तर पठारावर राहणार्या लोकांची शेती नदीकाठी आहे. अनेक दिवसांपासून शेती औजारे ने-आण करण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांची होत असणारी गैरसोय या रस्त्यामुळे टळणार आहे.

त्याचबरोबर साकूर, काळेवाडी, पोखरी, म्हसोबा झाप आणि आणे या गावांना जाण्यासाठी पाणघाट रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः संगमनेर-साकूर राज्य परिवहन महामंडळाची बस पोखरीला जाऊ शकते तर पोखरीत थांबणारी नारायणगाव-पोखरी, पुणे-पोखरी, नगर-पोखरी बस या साकूरला जाऊ शकतील आणि खर्या अर्थाने दुर्लक्षित असणारा परिसर विकसित होईल, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला. दरम्यान, स्वातंत्र्योत्तर काळापासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न शिवाजी महाराज दाते यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांच्याजवळ बोलून दाखवला. त्यानंतर पाणघाटासाठी पाठपुरावा सुरू झाला. कधी पारनेर तर कधी नगर, लोकप्रतिनिधींपर्यंत हा विषय पोहोचला. सदर रस्त्याचे महत्त्व सभापती दाते यांना पटल्याने आणि स्वतःला अनुभव असल्याने त्यांनी तात्काळ रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्याचा ध्यास घेतला आणि अखेर या शुभकार्याला सुरुवात केली.

यावेळी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रामदास भोसले, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे, शिवाजी महाराज दाते, देसवडेचे उपसरपंच बबन शिंदे, बाळासाहेब भोर, नीलेश भोर, शिवनाथ नाईकवाडी, ज्ञानदेव दाते, प्रवीण भोर, संपत तोडकर, शिवाजी गुंड, बबन गुंड, गोविंद औटी, पांडुरंग गुंड, बंडू औटी, दीपक गुंड, सूर्यभान दाते, तुकाराम दाते, प्रकाश टेकुडे, धोंडीभाऊ दाते, शिवाजी तोडकर, ज्ञानदेव दाते, अमोल गुंड, रमेश दाते, दत्ता फटांगरे, रोहिदास दाते, प्रदीप गुंड, रामभाऊ गुंड, राजेंद्र गुंड, कृष्णा दाते, गंगाराम टेकुडे, सखाहरी दाते, सुभाष दाते, शिवनाथ दाते, देवराम औटी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. बबन शिंदे यांनी सूत्रसंचालन तर भाऊसाहेब टेकुडे यांनी आभार मानले.
![]()
