घारगाव पाेलिसांच्या निष्क्रियतेला जबाबदार काेण? एकामागून एक घडताहेत घटना; पोलीस निरीक्षक मात्र आपल्याच मस्तीत गूल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मस्तवाल पाेलीस निरीक्षकांच्या राजवटीत गुन्हेगारांसाठी नंदनवन ठरत असलेल्या घारगाव पाेलीस ठाण्याच्या हद्दित गेल्या काही महिन्यात एकामागून एक धक्कादायक प्रकार समाेर येत आहेत. खासगी सावकारीत थेट सहभागाच्या आराेपापासून साकूरमधील पेट्राेल पंपावरील दराेड्यापर्यत, घारगावच्या ज्ञानमंदिरातील विकृतांच्या धिंगाण्यापासून कालच्या साकूर फाट्यावरील ‘ताे’ मृतदेह आणि हिवरगाव पठारावरील संतापजनक प्रकारापर्यंत एकामागून एक घडणाऱ्या या घटना घारगाव पाेलिसांची निष्क्रियता स्पष्ट करणाऱ्या असून अपवाद साेडला तर यातील एकाही प्रकरणाचा तपास झालेला नाही. हप्तेखोरी वाढल्याने पाेलिसांच्या क्रयशक्तिवर त्याचा परिणाम हाेऊन अवैध व्यवसाय, गुन्हेगारी यांना प्राेत्साहन मिळत आहे. गुन्हेगारी घटनांची श्रृंखलाही पाहता पठारावर कायद्याचा ‘धाक’ पूर्णतः संपुष्टात आल्याचे चित्र आहे. आश्चर्य म्हणजे या उपरांतही घारगावच्या इतिहासातील सर्वाधिक निष्क्रिय कारकीर्द ठरलेल्या पाेलीस निरीक्षक संताेष खेडकर यांच्यावर काेणतीही कारवाई झालेली नाही. प्रत्येक घटनेनंतर पाेलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, मात्र प्रत्येकवेळी त्यांना ‘अभय’ मिळाल्याने त्यातून निर्माण झालेल्या कायदा व्यवस्थेच्या समस्येला काेण जबाबदार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
जिल्ह्यातील विस्ताराने माेठ्या समजल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पठारभागासाठी घारगाव येथे स्वतंत्र पाेलीस ठाणे देण्यात आले. ४६ गावांच्या संरक्षणासह कायदा व व्यवस्था राखण्याची जबाबदारी एका पाेलीस निरीक्षकासह दाेन दुय्यम अधिकारी आणि ३० कर्मचाऱ्यांवर साेपविण्यात आली. गेल्या दीड दशकांच्या या पाेलीस ठाण्याच्या इतिहासात यापूर्वीही वादग्रस्त अधिकारी येऊन गेले. यापूर्वी पाेलीस निरीक्षक सुनील पाटील यांचा प्रदीर्घ निष्क्रिय काळही पठारवासियांनी अनुभवला आहे. त्यांच्या जागी लागलीच आणखी एका निष्क्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने पठारभागात गुन्हेगारांनी अक्षरशः थैमान घातले आहे. घडणाऱ्या प्रत्येक घटनेत पैशांचा शाेध घेतला जात असल्याने कर्मचारी कामचुकार बनले आहेत.

किरकाेळ प्रकरणात दाेन्ही बाजुने अदखलपात्र गुन्हे दाखल करुन तडजाेडी केल्या जात आहेत. काल-परवा साकूर फाट्यावर आढळलेल्या ‘अनाेळखी’ मृतदेहाचा किस्सा तर खूपच धक्कादायक आहे. मयत ३५ वर्षीय तरुणाच्या खिशात सापडलेल्या माेबाईल क्रमांकावर फोन करुन पाेलिसांनी मृत व्यक्ती काम करीत असलेल्या ठेकेदाराचा शाेध घेतला. मयताच्या मृत्यूशी काेणताही संबंध नसताना त्याला पाेलीस ठाण्यात नेऊन आधी खुनाचा व नंतर वेठबिगारीच्या गुन्ह्याचा धाक दाखवून काही हजारांची तडजाेड करुन ‘एडी’ दाखल करुन त्याचा मृतदेह ग्रामपंचायत हद्दीत गाडण्यात आल्याची जाेरदार चर्चा आहे. या प्रकरणात मयताचा मृत्यू दारूच्या अतिसेवनाने झाला असावा. मयत व्यक्ती परप्रांतीय असून त्याच्याकडे काेणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने चक्क ती अज्ञात आहे. अशीच आणखी एक व्यक्ति ‘त्या’ क्रेन मालकाकडे कामाला असून त्याच्याकडेही काेणतीही कागदपत्रे आढळून आलेली नाहीत.

हा प्रकार अतिशय गंभीर असून मयत आणि त्याच्या साेबत असलेली दुसरी व्यक्ती काेणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय बेदीक्कतपणे काम मिळवून बिनधास्तपणे वास्तव्यही करीत असल्याचे समाेर आल्यानंतर त्याची गांभीर्याने चाैकशी हाेण्याची गरज हाेती. त्यांच्यासारखी आणखी किती अनाेळखी माणसं तालुक्यात पसरली आहेत, ती काेठून आली आहेत, इतक्या लांब डाेंगराळ भागात येवून वास्तव्य करण्यामागे त्यांचा हेतू काय? यासर्व प्रश्नांचा उलगडा हाेण्याची गरज हाेती. मात्र कर्तव्याच्या आड कागदी आकर्षण आडवं आल्याने इतक्या गंभीर विषयाकडेही दुर्लक्ष केले गेले आणि काही हजारांत फाईल बंद करण्यात आल्याचे बाेलले जाते.

याच महाेदयांच्या कार्यकाळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ हाेत असून त्यातील कितीतरी घटना इभ्रतीच्या भीतीने समाेर आलेल्या नाहीत. गेल्या महिन्यात साकूरमधील एका साडेपंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यावरुन फरफटत रुबाब नावाच्या पानशाॅपमध्ये तिच्यावर दाेनवेळा अत्याचार करण्यात आले. त्यामुळे तिने आत्महत्या केली. त्या प्रकरणात साकूरचे वाड्यावरील खासगी न्यायालयही चर्चेत आले. पाेलिसांनी सुरुवातीला पाच जणांना ताब्यात घेतले, प्रत्यक्षात मात्र चाैघांनाच अटक केली. पाचव्या आराेपीला साेडून देण्यातही माेठी तडाजाेड झाल्याची चर्चा त्यावेळी झाली हाेती. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गाेऱ्हे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाळासाहेब थाेरात, भाजप नेत्या चित्रा वाघ, वंचितच्या उत्कर्षा रुपवते अशा माेठ्या नेत्यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागण्याने ही घटना राज्यात जावून संतापही उसळला.

मात्र, त्या उपरांतही पाेलिसांच्या निष्क्रिय भूमिकेत काेणताही बदल न झाल्याने पठारभागातील गुन्हेगार, अवैध व्यावसायिक व विकृतांवरील कायद्याचा धाक संपुष्टात आल्याचे चित्र दिसू लागले आहे. काल-परवा हिवरगाव पठारावर आईदेखत तिघा टवाळखाेरांनी अल्पवयीन मुलीचा हात धरण्याचा प्रकार आणि त्यानंतर त्या विकृतीत सहभागी हाेऊन २६ जणांनी पीडित मुलीच्या कुटुंबावरच केलेला सशस्त्र हल्ला घारगाव पाेलिसांची लक्तरे उधडणारा आहे. याशिवाय चारपट पैसे उकळल्यानंतरही अबलेची शेतजमीन उकळण्याच्या प्रकरणात खासगी सावकाराला साथ देण्याचा आराेप झालेले उपनिरीक्षक उमेश पतंगे, वाघावर संशय व्यक्त करुन निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न झालेले दाेन खून, साकूर पेट्राेल पंपावरील दराेडा, बाेट्याजवळील रस्तालुटीचे प्रकरण, या प्रकरणाचा प्रामाणिक तपास झाला असता तर कदाचित तक्रारदार तरुणाचा जीव वाचला असता.

पाेलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील प्राथमिक शाळेत विकृतांनी यथेच्छ घातलेला धिंगाणा, पाेषण आहाराची नासधूस, गॅस टाकीतला प्रवाह सुरु ठेवून घातपाताचा प्रयत्न, या प्रकरणातही दिसलेली पाेलिसांची असंवेदनशीलता आणि पिंपळगाव देपा येथील शेतकऱ्यांनी पशूधन चाेरांचा पाठलाग करुन त्यांचे वाहन पकडल्याची आणि पाेलिसांना कळवल्यानंतर ‘आमचे वाहन नादुरुस्त आहे, तुम्हीच चाेरांची गाडी घेवून या’ असे अजब फर्मान ऐकवण्याचा प्रकार घारगाव पाेलिसांची अखंड निष्क्रियता दाखवणारा असून पाेलीस अधीक्षकांनी तत्काळ त्यांची बदली करावी अशी मागणी जाेर धरीत आहे.
एकामागून एक घडणाऱ्या घटना आणि त्यांचे शून्य तपास अशी अखंड निष्क्रिय कारकीर्द असलेल्या आणि भारतीय सैन्य दलातून निवृत्त हाेऊन पाेलीस दलात सामील झालेल्या पाेलीस निरीक्षक संताेष खेडकर यांना त्याचे काेणतेही साेयरसुतक नसल्याचेही वेळाेवेळी दिसून आले आहे. वरिष्ठांनाही सर्वसामान्यांच्या पिळवणूकीबाबत काेणत्याही भावना नसल्याचेही त्यांना मिळणाऱ्या पाठबळातून दिसून येते. मध्यंतरी पाेलीस अधिक्षकांनी त्यांना बदलीसाठी अर्ज करण्याची सूचना केल्याची मात्र त्यांनी ती देखील धुडकावल्याची चर्चा आहे. असे असेल तर या अधिकाऱ्याला नेमके पाठबळ काेणाचे? असा प्रश्न निर्माण झाला असून यात काेणी राजकीय लाभार्थी तर नाही ना? अशीही शंका निर्माण झाली आहे.

Visits: 72 Today: 1 Total: 439807