कोपरगावात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
कोपरगावात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरानाजीक असलेल्या नगर-मनमाड मार्गावरील कातकडे पट्रोल पंपासमोर रात्री बारा वाजेच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेले टोळीला कोपरगाव शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर यातील एक आरोपी फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना गुप्त बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, बेट नाका परिसरातील कातकडे पेट्रोल पंपाजवळ काही इसम स्कॉर्पिओ गाडी क्रमांक (एमएच.23, एएस.7458) व एका एफझेड दुचाकीसह (चेसी क्रमांक एम.12 सी.जे.9 डी.2006972) जमलेले असून ते दरोड्याच्या तयारीत आहे. यावरून 10.50 वाजेच्या सुमारास एक संशयितरित्या उभी असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ पोलिसांना आढळली. त्यांनी अधिक चौकशी केली असता महेश भाऊसाहेब मंचरे (वय 24, रा.गोटुंबे आखाडा, ता.राहुरी), सूरज लक्ष्मण वडमारे (वय 22, रा.आहेर वायगाव, ता.गेवराई, जि.बीड), राहुल कुंडलिक बुधनव (वय 22, रा.खामगाव ता.जि.बीड), गफूर गनीभाई बागवान (रा.निंभारा मैदान, कोपरगाव) यांच्याकडे एक लोखंडी गज, एक लाकडी दांडके, एक गज, दोन कोयते, विव्हो कंपनीचे तीन भ्रमणध्वनी आदी ऐवज आढळून आला. पोलिसांनी सदर ऐवज जप्त केला असून त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पो.कॉ.संभाजी भीमराज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं.816/2020 भा.दं.वि. कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भारत चितळकर (पूर्ण नाव माहित नाही, रा.गुंथेगाव ता.गेवराई, जि.बीड) हा फरार आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत. वरील अटक झालेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर वरील अटक झालेल्या आरोपींमधील महेश मंचरे येरवडा कारागृहातून तसेच गफूर बागवान नाशिक कारागृहातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅरोलवर सोडण्यात आले असल्याचे समजते.