सराला बेटावरील वास्तुंची माहिती कुपीच्या माध्यमातून जिवंत राहणार

सराला बेटावरील वास्तुंची माहिती कुपीच्या माध्यमातून जिवंत राहणार
शिर्डीकरांनी केला अनोखा प्रयोग; हजारो वर्षे जमिनीखाली कुपी राहणार सुरक्षित
नायक वृत्तसेवा, शिर्डी
हडप्पा, मोहेंजोदडो इतकेच काय जोर्वेसारख्या हजारो वर्षांपूर्वीच्या शहराची संस्कृती, इतिहास उत्खननातूनच जगासमोर आली. याच पूर्वापार धर्तीवर साईसमाधी शताब्दी वर्षातील हरिनाम सप्ताह व त्या निमित्ताने गोदावरीच्या कुशीत असलेल्या सराला बेटावर उभारलेल्या वास्तुंची ऐतिहासिक माहिती कुपीच्या माध्यमातून हजारो वर्षे जमिनीच्या पोटात जिवंत ठेवण्याचा अनोखा प्रयोग शिर्डीकर करणार आहेत.

जवळपास दीडशे वर्षांपूर्वी सराला बेटाचे मठाधिपती गंगागिरी महाराजांनी शिर्डीकरांना साईबाबांच्या देवत्वाचा परिचय करून दिला. दोन वर्षांपूर्वी साईंचा समाधी शताब्दी सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने या दोन संतांच्या भेटीला उजाळा देण्यासाठी सराला बेटाचे महंत रामगिरी महाराजांच्या पुढाकारातून शिर्डीत गंगागिरी महाराजांचा 171 वा हरिनाम सप्ताह साजरा झाला. यातून जवळपास 1 कोटी 6 लाख रक्कम शिल्लक राहिली. सप्ताहाची, गंगागिरी महाराज व साईबाबांच्या भेटीची स्मृती जतन करण्यासाठी या रकमेतून सराला बेटावर धर्मशाळा बांधण्यात आली. येत्या 26 नोव्हेंबर रोजी वास्तूपुजन करून या वास्तुचा भक्तार्पण सोहळा संपन्न होत आहे. सगळ्या बाजूने पाण्याने वेढलेल्या या बेटावरील वास्तुची व साईनगरीतील सप्ताहाची माहिती शेकडो वर्षांनीही जगाला उपलब्ध व्हावी, साईबाबा व गंगागिरी महाराजांच्या संतभेटीची स्मृती इतिहासाच्या कपाटात चिरंतर जतन व्हावी यासाठी आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

यामध्ये चांदीच्या दोन डब्यांमध्ये साईंची विभुती व गुरूस्थानची माती, शिर्डीतील हरिनाम सप्ताहाचे चांदीचे नाणे (यावर एक बाजूने सप्ताहाचा लोगो तर दुसर्‍या बाजूने श्री विठ्ठल, संत गंगागिरी, साईबाबा, नारायणगिरी व महंत रामगिरी यांच्या प्रतिमा), साईसमाधी शताब्दीचे चांदीचे नाणे, रौप्यपट (चांदीचा पत्र्यावर कोरलेला हरिनाम सप्ताहाचा कालावधी, जमा, खर्च याबद्दल माहिती), प्लास्टिक कोटींगमध्ये पॅक केलेला सप्ताहाचा अहवाल, या अहवालाची माहिती साठवलेला पेनड्राईव्ह, सप्ताहात वाजविण्यात येणारे पितळी टाळ, सध्या चलनात असलेली विविध नाणी अशा नवविधा भक्तीचे प्रतीक असलेल्या नऊ वस्तुंचा समावेश असेल. दरवर्षी साईमंदिरात पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात येते. यंदाच्या पुजनात या वस्तुंचाही समावेश करण्यात आला होता. यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी पुढाकार घेतला. या नऊ वस्तू फायबर कोटींग केलेल्या एका चिनीमातीच्या बरणीत ठेवून तिचे तोंड लाख लावून सील करण्यात येणार आहे.

शुक्रवारी (ता.20) या कुपीची विधीवत पूजा करून तिला समाधी शताब्दी धर्मशाळेच्या परिसरातील जमिनीच्या पोटात सुरक्षित ठेवण्यात आले. काही वर्षांनी उभारलेल्या या वास्तू नामशेष होतील, मात्र या कुपीच्या रूपाने शिर्डीकरांनी आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताहाची व त्यातून उभारलेल्या वास्तुची माहिती शेकडो-हजारो वर्षे जमिनीखाली सुरक्षित राहील. कधीतरी उत्खननात ही कुपी जगासमोर येईल तेव्हा साईसमाधी शताब्दीतील हरिनाम सप्ताह, शिलकेतून उभारलेली वास्तू आदिंचा सप्रमाण उलगडा होईल. नुकतीच अयोध्येतील राममंदीर उभारणीपूर्वीही हीच पद्धत अवलंबण्यात आली.

 

Visits: 11 Today: 1 Total: 116881

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *