व्याह्यानेच केली विवाहित महिलेची आर्थिक फसवणूक! अस्तित्त्वातच नसलेल्या जमिनीची विक्री; गुंजाळवाडीतील महिलेची पोलिसांत धाव..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोटच्या मुलीच्या सासर्यानेच गुंजाळवाडीतील महिलेला अस्तित्त्वात नसलेल्या जमिनीची विक्री करुन त्यांना तब्बल सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहरातील एकासह ‘त्या’ महिलेच्या व्याह्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात संबंधित महिलेच्या बँक खात्यावरील मोबाईल क्रमांक परस्पर बदलून त्या खात्याद्वारे आर्थिक व्यवहार केल्याचेही समोर आले असून त्या महिलेच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी दिनकर कवडे व मनोहर मोरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणी गुंजाळवाडी शिवारात राहणार्या मंदाकिनी अशोक सुर्वे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सदरची घटना सन 2016 साली घडली आहे. सदर महिलेच्या छोट्या मुलीचे सासरे दिनकर धोंडीबा कवडे (रा.धांदरफळ बु.) यांनी त्या महिलेला तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे मोक्याची अडीच एकर शेतजमीन असून ती अवघ्या सहा लाखांत मिळत असल्याचे त्यांना सांगितले. सदर जमिनीच्या व्यवहारासाठी त्यांनी मनोहर लक्ष्मण मोरे (रा.ऐश्वर्या पेट्रोल पंपामागे) या इसमाची ओळख करुन दिली. त्यानंतर या दोघांनीही सदरची महिला व त्यांची सासू या दोहींनाही पिंपळगाव देपा येथे नेवून सदरच्या जमिनीचे क्षेत्र दाखवले व त्याचा गट क्र.257/1 असल्याबाबत सांगत ही जमिन खुप स्वस्तात मिळत असल्याने कोणाकडे विचारणा करु नका, आमच्यावर भरवसा ठेवा असेही सांगितले.
त्यामुळे याबाबत कोणाकडेही वाच्चता न करता त्या महिलेने पैशांची जमवाजमव केली. त्यासाठी सासूचे सोने मोडले, त्यांच्या जून्या ठेव पावत्याही मोडल्या व काही पैसे दुसर्या मुलीकडून उसनवारीनेही घेतले व 16 ऑगस्ट 2016 रोजी संगमनेर येथे वकीलामार्फत विसारपावती करुन सदर शेतजमीनीची सहा लाखांत विक्री केल्याचे दाखवण्यात आले. यानंतर काही दिवसांनी त्या महिलेसह त्यांच्या कुटुंबियांनी आपण घेतलेल्या शेतजमीनीत जावून पिकपाण्याबाबत चाचपणी केली असता त्यांनी खरेदी केलेला गट क्र. 257/1 अस्तित्त्वातच नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना समजली. हा सगळा प्रकार ऐकून मजूरी करुन आपली उपजीविका करणार्या त्या कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली.
त्यामुळे या सर्वांनी लागलीच आपले व्याही दिवकर कवडे यांचे घर गाठून त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी कानावर हात ठेवीत तुमचे सगळे पैसे मनोहर मोरे याच्याकडे असल्याचे सांगितले. मोरे याच्याकडे जावून पैशांची मागणी केली असता त्याने पैसे देतो, काही दिवस थांबा असे सांगितले. मात्र या गोष्टीला अनेक दिवस होवूनही तो पैसे देत नव्हता. त्यावर त्याच्याशी वाद घातला असता त्याने सन 2021 मध्ये 2 लाख 20 हजार व दोन लाख असे दोन धनादेश देत उर्वरीत रक्कम रोख देतो असे सांगून त्यांची बोळवण केली. प्रत्यक्षात मात्र सदरचे धनादेश खात्यात पैसे नसल्याने वठलेच नाहीत. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या पैशांसाठी तगादा लावला, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
या दरम्यान सदर महिला बँकेतील कामासाठी 23 नोव्हेंबर, 2021 रोजी संगमनेरात आली असता त्यांना त्यांच्या खात्यावर असलेला त्यांचा मोबाईल क्रमांक बदलून मनोहर मोरे याने परस्पर स्वतःचा मोबाईल नंबर नोंदविल्याचा व त्या खात्यावरुन आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आले. यावर त्यांनी बँकेकडे तक्रार करीत पुन्हा आपला मोबाईल क्रमांक नोंदवला. यासर्व प्रकारावरुन आपले व्याही दिनकर कवडे व मनोहर मोरे या दोघांनी संगनमताने आपली फसवणूक केली व अस्तित्त्वातच नसलेल्या शेतजमिनीची आपल्याला विक्री करुन सहा लाखांचा गंडा घातला, तसेच परस्पर बँकेला अर्ज देवून खात्यावरील आपला मोबाईल क्रमांकही बदलल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी शहर पोलिसांत धाव घेवून या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.