कोपरगाव ‘मनसे’तर्फे ऊर्जामंत्री राऊत यांचा जाहीर निषेध
कोपरगाव ‘मनसे’तर्फे ऊर्जामंत्री राऊत यांचा जाहीर निषेध
तहसीलदारांना दिले निवेदन; जनतेचा भ्रमनिरास झाल्याचा आरोप
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
संपूर्ण जगात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने जगातील बहुतांश देश लॉकडाऊनच्या अवस्थेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संपूर्ण भारतात लॉकडाऊनची हाक दिली. त्याला महाराष्ट्र सरकारने देखील चांगला प्रतिसाद देत कडक अंमलबजावणी करत जीवनावश्यक सोडून सर्व काही बंद केले. मात्र, या काळात वीज ग्राहकांना सरासरी बील दिले. तर लॉकडाऊन शिथील होताच अव्वाच्या सव्वा बिले पाठविली. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलाबाबत ग्राहकांना सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु, त्यांनी पलटवार केल्याने कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकताच त्यांच्या वक्तव्याचा निषेध करुन तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
लॉकडाऊनचा सर्वसामान्यांसह मोठमोठ्या कंपन्यांना देखील फटका बसला आहे. यात अनेकांना आपल्या नोकर्या देखील गमवाव्या लागल्या, काही कुटुंबांवर तर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. कसाबसा आपला प्रपंच त्यांनी जिवंत ठेवला आणि आता अनलॉक सुरू झाल्यापासून सगळं सुरळीत होईल असे वाटत असतानाच महावितरणने लॉकडाऊन काळात रिडींग न घेता सरासरी वीजबिल ग्राहकांना दिले. ते अनलॉकनंतर अव्वाच्या सव्वा पटीत पाठवली. या विरोधात मनसेने वेळीवेळी आंदोलन करुन शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. कोपरगावात देखील वीज बिलांची होळी केली होती. तर राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला. त्यावेळी शासनाच्यावतीने सांगण्यात आले की, काही प्रमाणात बिलात सूट किंवा माफी देण्यात येईल. त्याविषयी आमच्या उच्चस्तरीय बैठका सुरू आहे. या आशेवर संपूर्ण महाराष्ट्र असताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वीज बिलात कोणत्याही प्रकारे माफी अथवा सूट मिळणार नाही. त्यामुळे संबंध महाराष्ट्रामधील जनतेचा भ्रमनिरास झाला असून त्यांचा या वक्तव्याचा व महाराष्ट्र सरकारचा निषेध करत तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन देतेवेळी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे, माजी तालुकाध्यक्ष अलीम शहा, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, उपशहराध्यक्ष विजय सुपेकर, अनिल गाडे, हिंदुसम्राट संघटनेचे संस्थापक व गिताई प्रतिष्ठानचे सचिव बापू काकडे, वाहतूक शाखेचे तालुकाध्यक्ष जावेद शेख, वाहतूक शाखा शहराध्यक्ष सचिन खैरे, विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी सपकाळ, विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी, उपशहराध्यक्ष संजय जाधव, युवा नेते नवनाथ मोहिते, हिंदुसम्राट संघटनेचे अध्यक्ष अतीश शिंदे, उपाध्यक्ष अनिकेत खैरे आदी मनसे सैनिक उपस्थित होते.