दिवाळीच्या खरेदीसाठी केलेली गर्दी संगमनेरकरांना भोवणार? दिवाळी संपताच तालुक्याच्या रुग्णगतीत लक्षणीय वाढ झाल्याने पुन्हा चिंता वाढल्या.

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाचा काळ असूनही संगमनेरकरांनी त्याकडे सर्रास दुर्लक्ष करुन खरेदीचा आनंद लुटल्याने त्याचे दुष्परिणाम समोर येवू लागले आहेत. दिवाळीच्या सुरुवातीच्या दोन दिवसांपासून आजपर्यंतच्या आठच दिवसांत तालुक्यातील संक्रमणाची गती पुन्हा एकदा चढणीला लागली आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन होवूनही नागरिकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या आठ दिवसांत सरासरी 25 रुग्ण या वेगाने तालुक्यात तब्बल 195 रुग्णांची भर पडली असून दिवाळीपासूनच्या अवघ्या चारच दिवसांत त्यातील 118 रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी नोव्हेंबरमधील सर्वाधिक 56 रुग्ण समोर आल्याने उंचावलेली सरासरी यापुढेही कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने दिवाळीची मनमुराद खरेदी संगमनेरकरांना भोवणार असेच काहीसे चित्र दिसू लागले आहे.

मार्च-एप्रिलपासून सुरु झालेल्या कोविडच्या संक्रमणाने या महिन्यात जवळपास माघार घेतल्याचे चित्र दिसत होते. त्यानुसार दररोज येणारी रुग्णसंख्याही खालावत जात होती. ऑगस्टमध्येही सुरुवातीच्या तीन आठवड्यांमध्ये दररोजच्या सरासरीत घट झाल्याचे दिसत होते. मात्र त्यानंतर गणेशोत्सव, मोहरम यासारख्या सणांच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि सप्टेंबर महिना आत्तापर्यंची सर्वात मोठी रुग्णभर घालणारा महिना ठरला. या एकाच महिन्याने तालुक्यातील रुग्णसंख्येत 1 हजार 521 रुग्णांची भर घातल्यानंतर ऑक्टोबरने काहीसा दिलासा देत वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणली. या एका महिन्यात पुढे गेलेले संक्रमण माघारी सरकत 1 हजार 79 वर आले.

तालुक्याच्या रुग्णगतीला लागलेली ओहोटी नोव्हेंबरनेही कायम राखली. त्यातच चालू महिन्यात शहरी संक्रमणात लक्षणीय घट झाल्याने तालुक्यातील कोविड संक्रमणाचा काळ संपत असल्यागत समाधानकारक चित्र निर्माण झाले होते. मात्र महिन्याच्या मध्यात येणार्या दिवाळीत नागरिकांनी कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा मोठा फटका बसण्याचेही अंदाज वर्तविले गेले. त्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर झाली, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नागरिकांना साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र दिवाळीच्या उत्साहात नागरिकांना या तत्त्वांचा आणि आवाहनाचा विसर पडला आणि सर्वत्र जणू दिवाळी खरेदीची लाटच आल्याचे भयानक दृष्य बघायला मिळाले.

त्याचा पहिला परिणाम मंगळवारी (ता.17) समोर आला. गेल्या 1 नोव्हेंबरपासून मागे हटत जाणारी रुग्णसंख्या काल अचासनक उसळून समोर आली. मंगळवारच्या रुग्णसंख्येने या महिन्यातील रुग्णवाढीचा नवा उच्चांकही प्रस्थापित करताना शहरातील बारा जणांसह तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल 56 नवीन बाधितांची भर घातली. यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी तालुक्यात 38 रुग्ण समोर आले होते, आत्तापर्यंत या महिन्यातील हाच सर्वोच्च रुग्णसंख्येचा आकडा होता. मात्र दिवाळीच्या गर्दीने त्याला खूप मागे टाकीत त्याच्या जवळपास दुपटीचा वेग धारण केला आहे.

मंगळवारी समोर आलेल्या शहरातील बारा जणांमध्ये जनता नगरमधील 35 वर्षीय महिला, गणेश नगरमधील 65, 43 व 41 वर्षीय महिलेसह 55 व 51 वर्षीय इसम आणि 24 व 22 वर्षीय तरुण, मोमीनपुरा परिसरातील 52 वर्षीय इसम, स्वामी समर्थ नगरमधील 46 वर्षीय इसम, शहर पोलीस ठाण्यातील 31 वर्षीय पोलीस कर्मचारी व कोल्हेवाडी रस्त्यावरील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील उंबरी बाळापूर येथील 32 वर्षीय महिला, आश्वी ब्रु.येथील 45 वर्षीय दोघांसह 21 वर्षीय तरुण आणि 17 व 14 वर्षीय मुली, खळी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गोडसेवाडी येथील 59 वर्षीय इसम, बोरबन येथील 48 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला,

घारगावमधील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 41 व 39 वर्षीय तरुण, 60 व 31 वर्षीय महिला व 13 वर्षीय बालिका, वेल्हाळे येथील सातवर्षीय बालक, राजापूरमधील 51 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला, मंगळापूरमधील 59 वर्षीय इसमासह 27 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 46, 30 व 22 वर्षीय तरुण, 65, 53, 40 व 25 वर्षीय महिला, 17 व 13 वर्षीय मुलींसह पाचवर्षीय बालक, सुकेवाडीतील 45 वर्षीय इसम, पिंपळगाव देपा येथील 80 वर्षीय दोघे वयोवृद्ध नागरिक, पिंपरणे येथील 53 वर्षीय इसम, चिंचपूरमधील 63 वर्षीय महिला, कौठे कमळेश्वर येथील 52 वर्षीय इसम, कणकापूरमधील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,

आश्वी खुर्दमधील 75 व 52 वर्षीय महिलेसह 25 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 31 वर्षीय तरुण व समनापूरमधील 50 वर्षीय इसमाला कोविडचे संक्रमण झाले आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात 33 अहवाल रॅपिड अँटीजेन चाचण्यातून तर 23 अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले आहेत. मंगळवारी या महिन्यातील सर्वोच्च रुग्णसंख्या समोर आल्याने तालुक्याने बाधितांचे 47 वे शतकही ओलांडले असून एकूण रुग्णसंख्या 4 हजार 707 वर पोहोचली आहे.

गेल्या 10 नोव्हेंबरपासूनच्या अवघ्या आठच दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत टप्प्याटप्प्याने वाढ होत सरासरी 25 रुग्ण दररोज या गतीने 195 रुग्णांचर नव्याने भर पडली आहे. तर दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून (13 नोव्हेंबर) तालुक्यात 118 रुग्ण वाढले असून दिवाळीचा सण संपल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (ता.17) शहरातील बारा जणांसह तालुक्यातील 56 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीचे दुष्परिणाम मंगळवारपासून समोर येण्यास सुरुवात झाली असल्याचेच दिसून येत आहे.

