स्वातंत्र्य दिनी भंडारदरा ओव्हर फ्लो होण्याची शक्यता मावळली! पाणलोटात केवळ रिमझिम; पाण्याची आवक कमी त्यात विसर्गही सुरु
नायक वृत्तसेवा, अकोले
निर्मितीपासून बहुतेकवेळा १५ ऑगस्ट पूर्वी ओव्हर फ्लो होण्याची भंडारदरा धरणाची परंपरा यावर्षीही खंडीत होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरल्याने सध्या केवळ रिमझिम पावसाच्या सरी वगळता पाऊस थांबला आहे. त्यामुळे धरणात होणारी पाण्याची आवक अतिशय खालावली असून आज सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत भंडारदर्यात अवघे १२१ दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून पाणीसाठा ९७.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण तुडूंब होण्यासाठी अद्यापही २७७ दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असून सध्या सुरु असलेल्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील २४ तासांत धरणात इतके पाणी येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे यंदा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीच भंडारदरा ओव्हर फ्लो होण्याची आशा जवळजवळ मावळली आहे.
यावर्षी जिल्ह्याला पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. सुरुवातीला दीर्घकाळ ओढ दिल्यानंतर जुलैच्या मध्यात पाणलोटात परतलेल्या पावसाने भंडारदर्यासह मुळा व निळवंडे धरणाच्या पाणलोटात हजेरी लावली. मात्र त्याचवेळी संपूर्ण लाभक्षेत्रात जेमतेम पाऊस झाल्याने धरणांचे पाणी नसलेल्या उर्वरीत जिल्ह्यातील बळीराजाच्या चिंतेत मात्र मोठी भर पडली आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटूनही पाणलोट वगळता संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पाऊसच नसल्याने बळीराजा तणावात आलेला असताना उत्तरेकडील धरणांमध्ये मात्र समाधानकारक पाणीसाठा झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. वास्तविक धरणांच्या लाभक्षेत्रात नियमित मान्सूनपेक्षा परतीच्या पावसाचा तडाखा अधिक असतो. त्यामुळे येत्या दीड-दोन महिन्यात जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांची खालावलेली सरासरी भरुन निघेल असाही अंदाज आहे.
पाणलोटालाही आपल्या लहरी स्वभावाचे दर्शन घडवणार्या पावसाचे गेल्या महिन्याच्या मध्यात पुनरागमन झाले आणि अवघ्या १५ दिवसांतच मुळा, भंडारदरा, निळवंडे, आढळा आणि भोजापूर या जलाशयांच्या साठ्यांमध्ये वेगाने वाढ झाली. त्यामुळे १५ ऑगस्टपूर्वी भंडारदरा धरण ओव्हर फ्लो होईल असे चित्र निर्माण झाले असताना धरणाच्या सुरक्षिततेसाठी सांडव्याचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हापासून पावसाचे प्रमाण लक्षात घेवून पाणीसाठा नियंत्रित केला जात आहे. चालू हंगामात आजअखेर भंडारदर्याच्या जलसाठ्यात नव्याने ११ हजार ६०१ दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. धरणातून आत्तापर्यंत जवळपास ६ हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडून देण्यात आले आहे. त्यातून निळवंडे धरणाचा पाणीसाठाही वधारला असून आज सकाळी धरण ८३.८६ टक्क्यांवर पोहोचले होते. सध्या धरणातून १ हजार ५२६ क्युसेक पाण्याचा विसर्गही सुरु आहे.
मागील काही दिवसांत खालावलेले पावसाचे प्रमाण लक्षात घेवून भंडारदर्याचा सांडवा बंद करण्यात आला असून सध्या केवळ विद्युत गृहासाठी ८२० क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात १२१ दशलक्ष घनफूट पाणी आले असून त्यातील ६७ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. आज सकाळच्या सत्रात पावसाचे प्रमाण लक्षात घेता स्वातंत्र्य दिनापर्यंत भंडारदरा धरण आपली ११ हजार ३९ दशलक्ष घनफूटाची क्षमता गाठण्याची शयता कमी आहे. रात्रीतून पावसाचा जोर वाढला तरच ही किमया साधली जावू शकते. स्वातंत्र्यदिनी भंडारदर्यात पर्यटकांची तोबा गर्दी असते. त्यासाठी राजूर पोलिसांकडून वाहतुकीचे नियमनही केले जाते. उद्या रंध्याजवळून थेट भंडारदर्याकडे जाणार्या रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. शेंडी व पाणलोटातील प्रमुख पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
आज (ता.१४) सकाळी ६ वाजता संपलेल्या चावीस तासांत झालेला पाऊस – घाटघर २५ मि.मी., रतनवाडी २३ मि.मी., पांजरे १९ मि.मी., भंडारदरा १४ मि.मी., वाकी ९ मि.मी. व कोतूळ ३ मि.मी. धरणातील पाणीसाठे : मुळा २० हजार २०३ दशलक्ष घनफूट (७७.७० टक्के), भंडारदरा १० हजार ७६२ दशलक्ष घनफूट (९७.४९ टक्के), निळवंडे ६ हजार ९७७ दशलक्ष घनफूट (८३.४६ टक्के), आढळा ८६० दशलक्ष घनफूट (८३.९६ टक्के) व भोजापूर २३० दशलक्ष घनफूट (६३.७१ टक्के).