श्रीरामपूरातील गौंड समाजाला घरकुलांसाठी जागा मिळणार ः ससाणे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसची निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरामध्ये गोंड आदिवासी समाजाची बरीच कुटुंबे आहेत. स्व. जयंत ससाणे यांच्या काळात बर्याच कुटुंबांना घरकुल देण्यात आले होते; परंतु कुटुंबातील सदस्य संख्या वाढल्यामुळे त्यांना प्रत्येक शिधापत्रिका मागे एक घर देणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने गौंड समाजाला घरकुलासाठी जागा मिळावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून गौंड समाजाला त्यांची हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली.

सध्या आदिवासी समाजातील काही नागरिक तंबू, पाल टाकून आपले वास्तव्य करीत आहे. श्रीरामपूर शहरातील आदिवासी गौंड समाजाला घरकुल बांधण्यासाठी जागेअभावी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बँकेचे संचालक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या पुढाकारातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे श्रीरामपूर शहरातील आदिवासी गौंड समाजातील नागरिकांना व ज्या ग्रामपंचायतींना गावठाणाची अडचण आहे, त्यांना शेती महामंडळाने आरक्षित ठेवलेल्या जमिनी घरकुलांसाठी मिळणेबाबत निवेदन देण्यात आले आहे.

यावर मंत्री थोरात यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर शासन स्तरावर प्रयत्न करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आदिवासी गौंड समाजाला व गावठाणाची अडचण असलेल्या ग्रामपंचायतींना घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, गौंड समाजाचे नेते रणजीत जामकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष परदेशी उपस्थित होते.
