शहरातील डॉक्टरची तब्बल चाळीस लाखांना फसवणूक! घोडेकरमळ्यातील अख्ख्या कुटुंबाविरोधात ‘फसवणूकीचा’ गुन्हा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण न करता त्या बदल्यात घेतलेली आगाऊ रक्कम परत मागीतली असता त्यालाच दमदाटी करुन हुसकावून देण्याचा खळबळजनक प्रकार संगमनेरात समोर आला आहे. या प्रकरणी चक्क एका नामांकित डॉक्टरांची तब्बल 40 लाख रुपयांना फसवणूक झाली असून त्यांच्या तक्रारीवरुन शहरातील पाच जणांविरोधात फसवणूकीसह दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी सदर प्रकरण समोर आल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नवीन नगर रस्त्यावर गंगागिर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ.योगेश बाळकृष्ण गेठे यांनी याप्रकरणी फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार डॉ.गेठे यांना चार वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2016 रोजी गुंजाळवाडी शिवारातील गट क्रमांक 45 मधील दहा गुंठे जागा दाखविण्यात आली होती. सदर जागा त्यांना पसंद पडल्याने त्यांनी 24 फेब्रुवारी 2016 पासून रोजी व्यवहारातील भाग म्हणून 20 लाखांचा पहिला व त्यानंतर काही दिवसांतच दुसरा असे एकूण चाळीस लाख रुपये धनादेशाद्वारे अदा केले.


इतकी रक्कम हाती आल्यानंतरही जागा मालक प्रशांत प्रकाश झावरे, वनिता प्रशांत झावरे, प्रवीण प्रकाश झावरे, प्रकाश कोंडाजी झावरे व शारदा प्रकाश झावरे (सर्व रा.घोडेकर मळा) यांनी ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण न करता फिर्यादीला ना जमीनीची कोणतीही कागदपत्रे दिली अथवा दाखवली अगर खरेदी खत करुन दिले. त्यामुळे फिर्यादी डॉक्टरने आपण दिलेली रक्कम मागे देण्याचा तगादा सुरु केला.


या दरम्यान यातील आरोपी नं. 1 ते 3 यांनी फिर्यादी डॉक्टरांना दिलेले 80 लाख रुपयांचे नऊ धनादेश खात्यात वेळोवेळी भरले असता खात्यात रक्कम नसल्याने माघारी आले. तरीही आरोपी मजकूर फिर्यादीला दाद देत नसल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा गाठला, तेथून आदेश प्राप्त होवूनही आरोपी झावरे कुटुंब फिर्यादी डॉ.गेठे यांचे पैसे द्यायला तयार होत नसल्याने अखेर ऐन दिपावलीच्या दिवे लागणीला त्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली.


याबाबत डॉ.योगेश गेठे यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकूंद देशमुख यांना आपबीती कथन केली असता त्यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे वरील पाच जणांवर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भा.द.वी.च्या कलम 420 नुसार तर दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याकडे सोपविला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहीती तपासी अधिकारी साबळे यांनी दैनिक नायकशी बोलताना दिली.

Visits: 18 Today: 1 Total: 115635

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *