संगमनेरकरांनो, सावधान! शहरी रुग्णगतीत अचानक वाढ होत आहे!!

संगमनेरकरांनो, सावधान! शहरी रुग्णगतीत अचानक वाढ होत आहे!!
मंगळवारच्या अहवालातून ग्रामीण भागाला मागे टाकीत शहरात आढळले सोळा रुग्ण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये होणार्‍या गर्दीचा परिणाम कोविडचा प्रदुर्भाव वाढण्यात होण्याचा अंदाज खरा ठरतो की काय अशी अवस्था मंगळवारच्या अहवालातून समोर आली आहे. मंगळवारी (ता.10) खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून मोठ्या कालावधीनंतर ग्रामीणभागापेक्षा शहरी रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आल्याने संगमनेरकरांच्या चिंता वाढल्या आहेत. या अहवालातून तालुक्यातील एकूण 27 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले असून त्यातील तब्बल 16 रुग्ण संगमनेर शहरातील आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णगतीतही काहीशी भर पडली असून बाधितांची एकूण संख्या आता 4 हजार 541 वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील वातावरणात मोठा बदल झाला असून हवेतीन गारवा वाढल्याने पारा 13 अंशावर आला आहे. त्यातच आजपासून दिवाळी सणालाही सुरुवात झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. देशातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी दिवाळीनंतर देशात कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली असून अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनीही त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकार्‍यांना व तहसीलदारांना आवश्यक ती तयारी सज्ज ठेवण्यास सांगीतले आहे. आपल्याकडे असा प्रकार होणार नाही यासाठी नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असून शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे.

मंगळवारी (ता.10) रात्री उशीराने खासगी प्रयोगशाळेकडून 18 जणांचे तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 9 जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे प्राप्त झाले. त्यात शहरातील आठ भागांमधील 16 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. या अहवालातून सातत्याने रुग्ण समोर येत असलेल्या मालदाड रोडवरील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 49 वर्षीय इसम, 20 वर्षीय तरुण व 45 वर्षीय महिला, श्रमगाथा सोसायटीतील 63 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 40 वर्षीय तरुण, वाडेकर गल्लीतील 45 वर्षीय इसमासह 41 वर्षीय महिला, जनतानगरमधील 50 वर्षीय इसमासह 43 वर्षीय महिला, सावतामाळी नगरमधील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 67 वर्षीय महिला, नेहरु चौकातील 50 वर्षीय इसम, शिवाजीनगरमधील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व खंडोबा गल्लीतील 49 वर्षीय महिलेला कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. या अहवालातून शहरातील संक्रमणात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

मंगळवारच्या अहवालातून ग्रामीणभागातील संक्रमणात मोठी घट होवून दररोज मोठी रुग्णसंख्या समोर येणार्‍या या क्षेत्रातून अवघे अकरा रुग्ण समोर आले. त्यात सुकेवाडीतील 58 वर्षीय महिलेसह 39 वर्षीय तरुण, समनापूरमधील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 63 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 69 वर्षीय तर शिवारातील गोल्डनसिटी येथील 60 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्दमधील 20 वर्षीय तरुणी, घुलेवाडीतील 55 वर्षीय इसम, आश्वी बु. मधील 21 वर्षीय तरुणी, चिंचोली गुरवमधील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व मनोली येथील 33 वर्षीय तरुणाला कोविडची लागण झाली आहे.

रविवारनंतर तालुक्यातील एकूण संक्रमणाची गती कमी झाल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे पहिल्या आठवड्यात तालुक्यात सरासरी 30 रुग्ण प्रति दिवस याप्रमाणे रुग्णवाढ होत होती, तर शहरी भागात 5.6 रुग्ण व ग्रामीण भागात 24.40 रुग्ण दररोज या वेगाने रुग्ण समोर येत होते. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत काहीसा दिलासा मिळाल्याने ही गती कमी झाल्याचे चिन्ह होते. मंगळवारी तालुक्याची हिच गती सरासरी 25.1 रुग्ण दररोज तर शहरी रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने शहरी सरासरी 6.1 व ग्रामीण सरासरी 19 रुग्ण या गतीवर पोहोचली आहे.


दिवाळीनंतर देशात कोविडची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्या अनुषंगाने देशातील सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनीही जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकार्‍यांसह तहसीलदारांना आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोविडचे गांभिर्य लक्षात घेवून खरेदीसाठी बाहेर पडताना सर्व निकषांचे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा आपली दिवाळी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर अथवा रुग्णालयात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मंगळवारी वाढलेली शहरी रुग्णगती पाहता ‘संगमनेरकरांनो सावधान! रुग्णसंख्या वाढत आहे..’ असे सांगण्याची वेळ आली आहे.

Visits: 88 Today: 1 Total: 1107293

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *