संगमनेर व अकोले तालुका मिळून आज तब्बल साडेतिनशे रुग्ण! जिल्ह्यानेही आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढीत ओलांडली तब्बल दोन हजारांची रुग्णसंख्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यात सुरु असलेल्या कोविडच्या दुसर्या लाटेने आज अक्षरशः धुमाकूळ घातला असून जिल्ह्यात आजवरची सर्वात उच्चांकी 2 हजार 20 रुग्णसंख्या आज समोर आली आहे. आजच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातून सर्वाधीक 622, राहाता तालुक्यातून 214, संगमनेर तालुक्यातून 205 तर अकोले तालुक्यातून तब्बल 161 रुग्ण समोर आले आहेत. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची कोविड स्थिती अत्यंत भयानक अवस्थेत पोहोचली आहे. संगमनेर व अकोले तालुक्यातही आजवरची उच्चांकी रुग्णसंख्या समोर आली असून या दोन्ही तालुक्यात मिळून 366 रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याची जिल्ह्याची ही पहिलीच वेळ आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुका दहा हजार रुग्ण संख्येच्या दिशेने सरकतांना 9 हजार 388 वर पोहोचला आहे. आजच्या स्थितीत तालुक्यात 718 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कोविडचा उद्रेक झाल्याचे चित्र रोज समोर येणार्या रुग्णसंख्येवरुन दिसत होता. आज मात्र कोविडने अक्षरशः कहर केला आहे. गेल्या बारा महिन्यात पहिल्यांदाच जिल्ह्याने एकाच दिवशी तब्बल दोन हजारांहून अधिक रुग्णांचा आकडा पाहिला आहे. आजच्या अहवालांमध्येही अहमदनगर महापालिका क्षेत्राच्या खालोखाल राहाता तालुका कायम असून त्याखालची जागा आज संगमनेर व अकोले तालुक्याने घेतली आहे. अर्थात आज अचानक इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्यामागे गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेले अहवाल आहेत. गेल्या रविवारीच संगमनेर भेटीवर आलेल्या जिल्हाधिकार्यांनी शासकीय प्रयोगशाळेसाठी नवीन आरटीपीसीआर मशिन घेतल्याचे व त्यामुळे प्रलंबित अहवाल मंगळवारपर्यंत समोर येण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आजची रुग्णवाढ गेल्या दोन दिवसांतील स्राव घेतलेल्यांचीच नव्हे तर गेल्या काही आठ ते दहा दिवसांपासून शासकीय प्रयोगशाळेकडे प्रलंबित असलेल्या अहवालांमुळे आहे हे स्पष्ट असल्याने नागरिकांनी वाढलेली रुग्णसंख्या पाहून घाबरुन न जाता अधिक सावध व सतर्क होण्याची आवश्यकता आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेचे 763, खासगी प्रयोगशाळेचे 860 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 397 असे एकूण 2020 जणांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधीक 622 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रातून समोर आले असून राहाता 214, संगमनेर 205, अकोले 161, पाथर्डी 117, नगर ग्रामीण 116, कोपरगाव 106, श्रीरामपूर 105, राहुरी 90, शेवगाव 65, नेवासा 52, पारनेर 47, भिंगार लष्करी परिसर 45, जामखेड 18, श्रीगोंदा 10, कर्जत 5 व लष्करी रुग्णालय 1 तसेच अन्य जिल्ह्यातील 39 तर अन्य राज्यातील दोघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 5 हजार 516 झाली आहे.
संगमनेर व अकोले तालुक्याच्या कोविड इतिहासात आजवर इतक्या मोठ्या संख्येने बाधित समोर आले नव्हते. आजच्या रुग्णसंख्येने मात्र या दोन्ही तालुक्यातील कोविड अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. अर्थात आज अचानक जिल्ह्यातील इतके रुग्ण समोर येण्यामागे शासकीय प्रयोगशाळेतील प्रलंबित अहवाल आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नगरच्या शासकीय प्रयोगशाळेकडे अनेक तालुक्यातील स्राव नमुन्यांचे निष्कर्ष प्रलंबित होते. त्यासाठी प्रशासनाने नवीन आरटीपीसीआर मशिन खरेदी केले असून त्याचे कामकाज सुरु झाल्याने आज अचानक रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे.