संगमनेर शहर पोलिसांनी अकरा दुचाकींसह तिघांना घेतले ताब्यात

संगमनेर शहर पोलिसांनी अकरा दुचाकींसह तिघांना घेतले ताब्यात
आरोपींकडून समजलेल्या इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत सराईत वाहन चोरटे वाहन व्रिकीकरिता संगमनेरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन सापळा रचत तिघा चोरट्यांना अकरा वाहनांसह नुकतेच ताब्यात घेतले आहे.

शिवनाथ कोंडीराम माळी (वय 30, रा.शिवडी वस्ती, निमगाव जाळी, ता.संगमनेर), गणेश विष्णू शिंदे (वय 29, रा.शिवडी वस्ती, निमगाव जाळी, ता.संगमनेर) आणि करण ज्ञानदेव बर्डे (वय 19, रा.वडगाव सावताळ, ता.पारनेर जि.अहमदनगर) हे तिघे सराईत वाहनचोर संगमनेरात वाहन विक्रीकरिता येणार असल्याची गुप्त माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी, पोलीस नाईक विजय पवार, बापूसाहेब देशमुख, पोलीस कर्मचारी सागर धुमाळ, अमृत आढाव, सुभाष बोडखे, साईनाथ तळेकर, महादेव हांडे, प्रमोद गाडेकर, पोलीस नाईक फुरकान शेख यांनी संगमनेर शहरातून तसेच पुणे, नाशिक येथून केलेल्या चोरी केलेल्या तिघा चोरट्यांना अकरा दुचाक्यांसह ताब्यात घेतले आहे.

यामध्ये शहर पोलिसांत गु.र.नं.225/2018 भारतीय दंड संहिता कलम 379, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दुचाकीची चोरी केल्याची देखील कबुली दिली आहे. तसेच त्यांनी संगमनेर व इतर ठिकाणावरुन दुचाकींची चोरी केल्याचे सांगितले आहे. सदर हस्तगत करण्यात आलेल्या दुचाकींची ओळख पटविण्यासाठी वाहनमालकांनी शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघा आरोपींकडून इतर साथीदारांची नावे समजली असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. तर ताब्यातील आरोपींना एम.आय.डी.सी. रांजणगाव पोलीस ठाणे येथे तपास कामी वर्ग करण्यात आले असल्याचे समजते.

Visits: 92 Today: 1 Total: 1111123

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *