अवघ्या दोन आठवड्याच्या पावसाने उघडली सांडव्याची दारं! भंडारदर्‍याची पाणीपातळी नियंत्रणास सुरुवात; जुलैच्या अखेरीसच दोन्ही धरणं होणार तुडूंब..

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या दोन आठवड्यांपासून धरणांच्या पाणलोटात सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्याची चिंता दूर सारतांना अवघी स्थितीच पालटवली आहे. सुरुवातीला आला..रंऽआलाऽ.. म्हणता मोठी ओढ देणार्‍या वरुणराजाने मागील पंधरवड्यापासून पाणलोटासह लाभक्षेत्रातही धुवाँधार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा झंझावात कमी झाला असला तरीही सलग सुरु असलेल्या संततधारेने ओढ्या-नाल्यांचा आवेश कायम असल्याने धरणातील पाण्याची आवक टिकून आहे. त्यामुळे जुलैच्या मध्यातच 85 टक्के भरलेल्या भंडारदरा धरणाच्या सांडव्याची व्रकदारे करकर करीत उघडण्यात आली आहे. त्यातून निळवंडे धरणातील पाण्याची आवक वाढली असून जुलैच्या अखेरीस जिल्ह्यातील दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाची ही दोन्ही धरणं तुडूंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण परिचलन सूचीनुसार पावसाचे प्रमाण लक्षात घेवून आज मंगळवारी सकाळी आठ वाजता सांडव्याद्वारे 1 हजार 218 क्युसेकसह भंडारदरा धरणातून 2 हजार 336 क्यूसेकने पाणी सोडले जात असून निळवंड्यातून प्रवरापात्रात मात्र अवघा 800 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

जूनच्या जवळपास संपूर्ण महिनाभर लाभक्षेत्रासह पाणलोटालाही पावसाने ओढ दिली होती. एव्हाना राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर मुळा व प्रवरा खोर्‍यातही त्याचे आगमन होते. यंदामात्र राज्यात दाखल झालेला मान्सून प्रदीर्घ काळ किनारपट्ट्यांवर बरसत राहील्याने उर्वरीत महाराष्ट्राला जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्याची वाट पहावी लागली. त्यातही उशिराने दाखल झालेल्या पावसाला पाणलोटापेक्षा लाभक्षेत्रात अधिक जोर असल्याने एका डोळ्यात आसू तर दुसर्‍या डोळ्यात हसू अशी बळीराजाची अवस्था झाली होती. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनच्या ढगांनी जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिनही धरणांच्या पाणलोटात फेर धरुन बरसण्यास सुरुवात केल्याने अवघ्या पंधरवड्यातच उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्प ओसंडले असून तीनही मोठ्या धरणांची अवस्था समाधानकारक स्थितीत पोहोचली आहे.

मुळा व प्रवरा खोर्‍यात रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. यापुढील कालावधीतही पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली आहे. आज सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 85.06 टक्के तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा 78.45 टक्के झाला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीत भंडारदरा धरणाचे परिचलन कसे करावे याबाबतची नियमावली असून त्यानुसार पावसाचे प्रमाण लक्षात घेवून धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्याची पद्धत आहे. त्या अनुषंगाने पुढील कालावधीतही पाऊस टिकून राहणार असल्याने नदीकाठावरील लोकवस्तीला अचानक संकटात न टाकता टप्प्याटप्प्याने धरणातील अतिरिक्त पाणी सोडण्याचे व्यवस्थापन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी धरण परिचलन सूचीचा आधार घेवून भंडारदर्‍याचा पाणीसाठा सध्या 85 टक्क्यांवर नियंत्रित केला जात असून सद्यस्थितीत आवक होत असलेल्या प्रमाणात धरणातून विसर्ग सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार कालपर्यंत भंडारदर्‍याच्या विद्युतगृह मोरीद्वारा सोडण्यात येत असलेला 832 क्यूसेकचा विसर्ग कायम ठेवून आज सकाळी 6 वाजता धरणाच्या व्हॉल्वमधून 289 क्यूसेक तर वक्राकृती सांडव्याद्वारे 1 हजार 218 क्यूसेक असा एकूण 2 हजार 339 क्यूसेकचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली असून हे सर्व पाणी निळवंडे धरणात अडविले जात आहे. आज सकाळी निळवंडे धरणाचा पाणीसाठाही 78.45 टक्क्यांवर पोहोचला होता व धरणाच्या विद्युतगृह मोरीद्वारा अवघा 800 क्यूसेकचा प्रवाह प्रवरानदी पात्रात सुरू असल्याने भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेले संपूर्ण पाणी आता निळवंडे धरणात अडविले जात असून हे धरण 90 ते 95 टक्के पातळीवर पोहोल्यानंतर धरणाच्या मुख्य सांडव्याद्वारे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.

अकोले तालुक्याच्या पश्चिम व उत्तर पट्ट्यात मिळून लघु व मध्यम स्वरुपाचे एकूण बारा प्रकल्प असून ते सर्व यापूर्वीच तुडूंब भरले आहेत. मुळा खोर्‍यातील पिळगाव खांडचा प्रकल्प ओसंडल्यानंतर मुळा धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून आज सकाळी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाचा पाणासाठा 61 टक्क्यांवर पोहोचला होता. निळवंडे धरणाच्या पाणलोटातील प्रकल्पही यापूर्वीच तुडूंब झालेले असल्याने या धरणातही आता विनाअडथळा पाण्याची आवक सुरु झाली असून त्यात आता भंडारदर्‍याचे पाणीही मिसळू लागले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास महिना अखेरपर्यंत भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणं आपली तांत्रिक पातळी गाठतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

आज सकाळी 6 वाजता धरणातील पाणीसाठे पुढीलप्रमाणे – मुळा धरण 15 हजार 857 दशलक्ष घनफूट (60.99 टक्के, आवक 566 दशलक्ष घनफूट), (सायंकाळी 6 वा.) भंडारदरा 9 हजार 390 दशलक्ष घनफूट (85.06 टक्के, आवक 475 दशलक्ष घनफूट) व निळवंडे 6 हजार 533 दशलक्ष घनफूट (78.45 टक्के, आवक 304 दशलक्ष घनफूट). गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस – रतनवाडी 172 मि.मी., घाटघर 165 मि.मी., भंडारदरा 127 मि.मी., वाकी 103 मि.मी., निळवंडे 45 मि.मी., आढळा 11 मि.मी. व अकोले 19 मि.मी. सध्या सुरु असलेला विसर्ग – भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात 2 हजार 336 क्युसेक, निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात 800 क्युसेक, ओझर बंधारा (ता.संगमनेर) येथून प्रवरा नदीपात्रात 2 हजार 122 क्युसेक, कोतूळ येथून मुळा धरणाकडे 9 हजार 155 क्युसेक, आढळा धरणाचा ओव्हर फ्लो आढळा नदीतून 613 क्युसेक व भोजापूर जलायाच्या भिंतीवरुन म्हाळुंगी नदीपात्रात 540 क्यूसेकने पाणी वाहत आहे.


सोमवारी पूर्व भाद्रपदा नक्षत्रात पाणलोटात पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सायंकाळपासून धरणातील पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र आज (ता.19) उत्तर भाद्रपदा नक्षत्राच्या पूर्वाधापासूनच पावसाचा जोर निम्म्याने खाली आल्याने त्याचा परिणाम आता धरणातील पाण्याच्या आवकवर होवू लागला आहे. त्यामुळे धरण परिचलन सूचीचा आधार घेवून भंडारदरा धरणातून सध्या आवक होत असलेल्या प्रमाणात पाणी सोडले जात असून त्यात प्रसंगानुरुप बदल केले जाणार आहेत. सद्यस्थितीत पाणलोटात सर्वत्र सुरू असलेला कमी-अधिक पाऊस पुढील काही दिवस असाच टिकून राहिल्यास जुलैच्या अखेरपूर्वीच भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणं ओव्हर फ्लो होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 198 Today: 6 Total: 1109326

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *