राजहंस दूध संघ सरासरीच्या दूध दरात राज्यात अग्रेसर ः देशमुख
राजहंस दूध संघ सरासरीच्या दूध दरात राज्यात अग्रेसर ः देशमुख
राजहंस दूध संघाकडून 48 कोटी 33 लाख बँकेत वर्ग
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजहंस दूध संघाने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक व कामगारांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी अडचणीच्या काळात देखील दूध दर फरक व कर्मचार्यांना बोनस देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षात शेतकर्यांना राज्यात सर्वाधिक सरासरी प्रतिलिटर 28 रुपये असा उच्चांकी दर दिला. तर दूध दरातील फरक, दूध पेमेंट, अनामत, वाहतूक, कर्मचारी पगार व बोनस देण्यासाठी 48 कोटी 33 लाख रुपये बँकेत वर्ग केले. दूध संघाने चांगले दर दिल्यामुळे स्थानिक सहकारी संस्थांनी देखील दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात दूध दर फरक दिल्याची माहिती महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली.
याविषयी अधिक बोलताना देशमुख म्हणाले, कोरोनासारख्या महामारीत दुग्ध व्यवसाय अक्षरशः कोलमडून गेला आहे. लॉकडाऊनमध्ये पॅकिंग दूध विक्री 50 टक्केने कमी झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात पावडर व बटरचे दर लक्षणीय कमी झाले. या प्राप्त स्थितीमुळे दुधाचे दर कोसळले, अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला. लॉकडाऊनच्या काळात तर दूध संकलन बंद ठेवण्याची वेळ आली. परंतु महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारने महानंदमार्फत प्रतिदिन 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अतिरिक्त दूध भुकटीत रूपांतर झाले. त्यामुळे दुध दर 25 रुपये शेतकर्यांना मिळू लागला. राजहंस दूध संघाचे 4 लाख 17 हजार लिटर दूधापैकी एक लाख लिटर दूध महानंद योजनेत समाविष्ट होत होते. या व्यतिरिक्त संघाने 1 लाख 50 हजार लिटर दुधाची 2000 टन दूध भुकटी स्वत:च्या दूध भुकटी प्रकल्पात बनवली. परंतु बाजारात उठाव नसल्यामुळे 2000 टन दूध भुकटी मागणीअभावी संघाकडे शिल्लक असून, भविष्यात दूध भुकटी विदेशात निर्यात करण्याचा संघाचा मानस आहे, असे असले तरी इतरांच्या तुलनेत प्रतिलिटर पाच रुपये अधिक दर दिल्यामुळे दूध उत्पादकांना 21 कोटी अतिरिक्त रक्कम राजहंस दूध संघाने उत्पादकांना दिली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
या व्यतिरिक्त राजहंस दूध संघाने दूध उत्पादकांसाठी दुष्काळी भागात चारा छावणी, चारा निर्मिती अभियान, दुधावरील उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी वाजवी दरात दूध उत्पादकांना औषधे मिळण्यासाठी राजहंस मेडिकल स्टोअर, अनुदानित तत्त्वावर काविळ लसीकरण व सामूहिक गोचिड निर्मूलन, मुरघास निर्मिती, राजहंस महिला सक्षमीकरण, उच्च प्रतीचे पशुखाद्य व मिनरल मिक्स्चर यासारख्या योजना राबविल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक मदत करणे व अधिकचा दूध दराची परंपरा कायम ठेवणे, ग्राहकांना स्वच्छ व निर्मळ दूध पुरवण्यासाठी संघाने आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्याधुनिक राजहंस मिल्क शॉप राज्यभर सुरु करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. या निर्णयाबद्दल उपाध्यक्ष साहेबराव गडाख, बाजीराव खेमनर यांसह सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक डॉ.प्रताप उबाळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.