इतिहास मनात जागा असला तरच भविष्य चांगले घडते : डॉ.संजय मालपाणी मराठ्यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचा वेध घेणार्या ‘दुर्ग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
इतिहास मनात जागा असला तरच भविष्य चांगले घडते. जर माणूस इतिहासच विसरला तर भविष्यात अधःपतन झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या पराक्रमाचा इतिहास वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या पुढच्या पिढ्यांसमोर सातत्याने आणला पाहिजे. विश्रामगडाच्या जवळच राहणार्या अंकुर काळे व त्यांच्या सहकार्यांनी यासाठी मोठी मेहनत घेवून ‘दुर्ग’ या दिवाळी अंकातून मराठ्यांच्या पराक्रमाचा जाज्ज्वल्य इतिहास आपल्यासमोर आणण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. त्यादृष्टीने या अंकाचे मोल खूप मोठे आहे. प्रकाशाकडे घेवून जाणारा हा अंक खर्या अर्थी आपली दिवाळी प्रकाशमय करणारा ठरेल असे प्रतिपादन उद्योजक डॉ.संजय मालपाणी यांनी केले.
शिवसमर्थ सेवा प्रकाशन संस्थेच्यावतीने प्रकाशित झालेल्या ‘दुर्ग’ या दीडशे पानांच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ.मालपाणी यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गिरीश मालपाणी, अंकाचे संपादक अंकुर काळे, सहसंपादक संतोष जाधव, व्यवस्थापकीय संपादक श्रीकांत कासट, रेणुका काळे, दुर्गप्रेमी प्रवीण कुलकर्णी, श्याम तिवारी व दत्ता भांदुर्गे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ.मालपाणी म्हणाले की, मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या गड-कोटांवर अनेकांना जाण्याची मनशा असते, पण सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. अशावेळी महाराष्ट्राच्या दुर्गसंपदेची परिपूर्ण माहिती असलेले सचित्र संकलन जर आपल्या हाती पडले तर? असाच प्रयत्न विश्रामगडाच्या पायथ्याजवळ असलेल्या ठाणगावातील अंकुर काळे व त्यांच्या टीमने केला आहे. या अंकाची मांडणी अतिशय सुरेख व आकर्षक पद्धतीने केली गेली असून अंकातील ऐतिहासिक वास्तू आणि गडकोटांची छायाचित्रे ओढ लावणारी आहेत.
छत्रपती शिवराय, शंभुराजे व पेशव्यांच्या दैदीप्यमान इतिहासाचा आढावा या अंकातून घेण्यात आला आहे. ग्वाल्हेरचे शिंदे संस्थान, शिवछत्रपतींचा राज्यव्यवहार कोश आणि शस्त्रवर्ग, जलसंस्कृतीचा शोध आणि ऐतिहासिक जुन्नर नगरीच्या माहितीचा वेधही यातून घेण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या विविध किल्ल्यांचा इतिहास आकर्षक छायाचित्रांसमवेत मांडण्यात आल्याने दुर्गप्रेमींसाठी हा दिवाळी अंक प्रकाशाकडे नेणारा ठरेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
गिरीश मालपाणी यांनी या अंकातील मजकूर आणि छायाचित्रे प्रत्यक्ष इतिहासाची सफर घडवणारी असल्याचे सांगितले. समुद्रसपाटीपासून खूप उंचावर असलेल्या गडकोटांवर जाणारे तेथून प्रचंड सकारात्मक ऊर्जा घेवूनच माघारी येतात. मात्र सगळ्यांनाच तेथे जाणे शक्य नसल्याने दुर्ग दिवाळी अंकातून सकारात्मक ऊर्जेचा हा स्रोत अंकुर काळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आपल्या समोर आणाला आहे. पॅशन आणि पेशन्स असलेला माणूस काय करु शकते याचे उत्तम उदाहरणही दुर्गच्या संपादक मंडळाने निर्माण केल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातील काही परिचित आणि काही अपरिचित दुर्गांची सविस्तर माहिती, संस्थांनाचा इतिहास, विविध ठिकाणच्या ऐतिहासिक लढाया आदिंचे सचित्र वर्णन असलेला हा सातवा दिवाळी अंक दुर्ग भटक्यांसाठी मार्गदर्शकाचीही भूमिका बजावणारा आहे. ज्यांना हा अंक पाहिजे असेल त्यांनी श्रीकांत कासट (9422905267) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.