राहुरीत अवैध प्रवासी वाहतूक करणार्यांची ‘दबंगगिरी’! दामदुप्पट भाडे घेऊन प्रवाशांची करताहेत आर्थिक लूटमार
नायक वृत्तसेवा, राहुरी
सध्या सुरू असलेल्या एसटी बस कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे राहुरी तालुक्यातील अवैध प्रवासी वाहतूकदारांनी त्याचा चांगलाच गैरफायदा घेतला आहे. बससेवा बंद असल्यामुळे दामदुप्पट भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूटमार सुरू झाली आहे. तर अनेक बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक प्रवाशांसह महिलांनाही अरेरावी करीत असल्याने राहुरीत बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्यांची ‘दबंगगिरी’ वाढली आहे. या लुटमारीला वाहतूक पोलीस प्रशासनाने आळा घालावा आणि लूटमार करणार्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून जोर धरु लागली आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे. यासह अन्य मागण्यांसाठी 7 नोव्हेंबरपासून एसटी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. राज्यभर पुकारण्यात आलेल्या या संपामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एसटी कर्मचार्यांनी देखील सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे लालपरीची चाके जागेवरच आहे. दरम्यान एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका शिर्डी व शनि शिंगणापूर येथे दर्शनासाठी आलेल्या भक्त प्रवाशांना तसेच इतर प्रवाशांना बसत आहे. या संपामुळे राहुरी तालुक्यातील खासगी अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
आंदोलनापूर्वी राहुरी ते नगर एसटीचे भाडे 55 रुपये होते. त्यावेळी खासगी प्रवासी वाहतूक चालक 50 रुपये भाडे घेत होते. आता 70 ते 100 रुपयांपर्यंत मनमानी भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात आहे. त्याचप्रमाणे राहुरी ते वांबोरी, राहुरी ते सोनई तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात चालणारे वाहने प्रवाशांची लूटमार करत आहेत. राहुरी ते राहुरी फॅक्टरी या आठ किलोमीटर अंतरासाठी बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक 20 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत भाडे वसूल करीत आहेत. सध्या राहुरी ते पुण्याचे भाडे 500 रुपयांपर्यंत घेतले जात आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नुकताच दिवाळी सण होऊन ओवाळी चालू आहे. त्यामुळे प्रवाशांची ये-जा सुरू आहे. याचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट करण्याचे काम वाहनचालकांकडून होत आहे. वाहतूक प्रशासनाने या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.