नऊ दशकांच्या ‘अखंड’ परंपरेत ‘खंड’ पडता कामा नये! हनुमान जयंती उत्सव समितीची भूमिका; ध्वजाचा मान निरीक्षकांच्या खुर्चीचा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
माध्यमातील पत्रकबाजीतून चर्चेत आलेल्या संगमनेरच्या ऐतिहासिक श्री हनुमान विजयरथाच्या अखंड परंपरेत शुक्रवारी ट्विस्ट आला होता, मात्र सायंकाळ होताहोता श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीने पोलीस निरीक्षकांची भेट घेत ‘त्या’ विषयापासून आपण दूर असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे गेल्या नऊ दशकांपासून स्त्री शक्तीच्या पराक्रमाचा अखंड इतिहास सांगणार्या संगमनेरच्या हनुमानजयंती रथोत्सवातील अडथळे आपोआप बाजूला सारले गेले आहेत. परंपरेनुसार पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी रथाला ध्वज अर्पण करण्यासाठी यावे अशा आशयाचे पत्रही यावेळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना सोपवण्यात आले. ही परंपरा अखंडीतपणे सुरु राहिले पाहिजे असाच काहीसा सूर उत्सव समितीने पोलिसांना दिलेल्या पत्रातून दिसून आला. त्यामुळे या ऐतिहासिक रथोत्सवाबाबत निर्माण होऊ पाहणारे अनिश्चिततेचे ढग आपोआप निवळले आहेत.

शहर भाजपाचे अध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले यांनी व्यक्तिगत पातळीवर पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार केला होता. या पत्रातून त्यांनी संगमनेरच्या दोन्ही वरीष्ठ पोलीस अधिकार्यांवर गंभीर आरोप करुन संगमनेरच्या बेकायदा कत्तलखान्यांना त्यांचे समर्थन असल्याचे त्यांना सांगितले होते. संगमनेरच्या श्री हनुमान जयंती रथोत्सवाला मोठा पराक्रमी इतिहास आहे. महाबली हनुमान भक्ती आणि शक्तीचे प्रतीक म्हणून हिंदू धर्मियांमध्ये पूजले जातात. या रथाला दरवर्षी संगमनेरचे पोलीस प्रभारी वाजतगायत येवून ध्वज अर्पण करतात. गेल्या 93 वर्षात यात खंड पडलेला नाही. मात्र गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी संगमनेरातील साखळी कत्तलखान्यांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई झाल्यानंतर सापडलेल्या डायर्यांमध्ये संगमनेरातील अधिकार्यांची नावे आहेत. त्यामुळे या अधिकार्यांच्या आलेला ध्वज हनुमान जयंतीच्या ऐतिहासिक रथावर त्यांच्याच हस्ते चढवण्यास विरोध दर्शविला. त्या बदल्यात तालुक्यातील अन्य अधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांनी स्वतः येण्याची विनंती त्यांनी या पत्रातून केली होती.

कोविड संक्रमणाच्या सावटात केवळ औपचारिक साजर्या झालेल्या आणि तब्बल दोन वर्षांनंतर धूमधडाक्यात साजर्या होऊ पाहणार्या या उत्सवाबाबत या पत्रामुळे अनिश्चितता निर्माण झाली. सदरचे पत्र माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर त्याची ‘ब्रेकींग’ होवून या ऐतिहासिक रथोत्सवाबाबत शहरात अनिश्चितता निर्माण झाली. त्यामुळे शुक्रवारी (ता.8) सायंकाळीच श्रीराम नवमी व हनुमान जयंती विश्वस्त समितीचे सदस्य कमलाकर भालेकर, गिरीश देशपांडे, योगीराजसिंह परदेशी, सर्वेश देशपांडे, मुन्ना जोशी आदींनी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विश्वस्त संस्थेच्यावतीने या दोन्ही उत्सवांबाबतच्या माहितीसह त्यांना परवानगी देण्याची विनंती करण्यात आली.

याच पत्रात समितीने स्वातंत्र्यपूर्व काळापासून जन्मोत्सवानंतर हनुमानाची ‘चल’ प्रतिमा रथात ठेवली जाते. त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वाजतगायत ध्वज घेवून येतात व स्वतःच्या हाताने तो रथावर चढवतात. त्यानंतर त्यांच्या हस्ते मारुतीरायाच्या रथातील प्रतिमेची आरती होते. या सर्व क्रियांनंतरच महिला रथाला ओढतात आणि या रथोत्सवाला सुरुवात होते असा गेल्या नऊ दशकांपासून आजवरचा अखंड इतिहासाही सांगण्यात आला आहे. रविवारी (ता.10) श्रीराम नवमी निमित्त दुपारी बारा वाजता जन्मोत्सव आणि सायंकाळी 6 ते 10 यावेळेत भजनसंध्येचा कार्यकम. शनिवार 16 एप्रिलरोजी सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव, सकाळी साडेआठ वाजता रथोत्सव, रात्री फटाक्यांची आतषबाजी. रविवार 17 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता प्रवराकाठी जंगी कुस्त्यांचा हगामा अशा सविस्तर कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे.

या पत्राने संगमनेरच्या रथोत्सवाबाबत निर्माण झालेले अनिश्चिततेचे ढग हटले असून अॅड.गणपुले यांनी घेतलेल्या विरोधाच्या भूमिकेला श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीने (विश्वस्त संस्था) महत्त्व दिले नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे 23 एप्रिल, 1929 रोजीच्या रथोत्सवात संगमनेरकर नागरीकांनी दाखवलेल्या पराक्रमाची साक्ष देणारा 93 वर्षांचा हा अखंडीत प्रवाह विनाअडथळा यावर्षीही वाहताच राहणार आहे. आजवरच्या परंपरेनुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी वाजतगाजत ध्वज नेवून तो या ऐतिहासिक रथावर चढविणे अपेक्षीत आहे. या सर्व घटनाक्रमानंतर ते काय भूमिका घेतात याबाबत मात्र उत्सुकता कायम आहे.

परंपरेनुसार गेल्या 93 वर्षांपासून संगमनेर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक वाजतगाजत ध्वज आणून रथावर चढवतात. त्यानंतर त्यांच्या हस्ते रथातील मारुतीरायाची पूजा होते. त्यामुळे दरवर्षीच्या औपचारिकतेप्रमाणे समितीने शहर पोलीस निरीक्षकांना पत्र देवून श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सवाबाबत माहिती दिली आहे. रथावरील ध्वजाचा मान पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीचा आहे, त्यामुळे त्या खुर्चीवर कोण आहे याच्याशी या परंपरेचा संबंध रहात नाही.
– कमलाकर भालेकर
विश्वस्त : श्रीराम नवमी हनुमान जयंती उत्सव समिती

हनुमान जयंतीच्या रथोत्सवाचे निमित्त साधून शहर भाजपाध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले यांनी ‘गोवंश’ विरोधातील ‘त्या’ कारवाईचा धागा धरुन संगमनेरच्या पोलीस अधिकार्यां विरोधात भूमिका घेतली. त्या कारवाईनंतर संगमनेरात दोनवेळा आंदोलनही झाले होते, त्यामुळे आपल्या भूमिकेला इतर संघटनांची साथ मिळेल असे त्यांना अपेक्षित होते. मात्र खुद्द श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीनेच याबाबत स्पष्टता केल्याने त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे महत्त्व संपले आहे. वास्तविक त्यांच्या या भूमिकेला व्यक्तिगत वादाचीही पार्श्वभूमी आहे. एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांचे ‘त्या’ दोन्ही पोलीस अधिकार्यांशी खटकले होते. त्यावरुन बरेच आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर एकदा तर चक्क काही पत्रकारांच्या साक्षीतच या दोन्ही अधिकार्यांची त्यांच्याशी मोठी खडाजंगी झाली होती, एकवेळ तर अनर्थ होतो की काय अशीही स्थिती त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी अनुभवली. त्यातून विरोधाचा हा सूर उमटला असल्याचीही शक्यता यातून निर्माण झाली आहे.

