विघ्नहर्त्याच्या उत्सवावर यंदा ‘समन्यायी’ पाणी वाटपाचे विघ्न? दहा वर्षांपूर्वीच्या आठवणी जागल्या; जायकवाडीत अद्यापही चौदा टक्क्यांची तूट..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागांना पावसाच्या लहरी स्वभावाचा मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामात दुबार पेरण्या होवूनही पाऊसच न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. भंडारदरा धरणाचा अपवाद वगळता जिल्ह्यातील उर्वरीत मोठ्या धरणांच्या पाणलोटातील पावसाचे प्रमाणही जेमतेमच राहिल्याने मुळा, निळवंडे सारखी धरणं आजही रिकामीच आहेत. नाशिक जिल्ह्यातील स्थितीही यापेक्षा वेगळी नसल्याने यावर्षी गोदावरीच्या पात्रातूनही फारसे पाणी वाहिलेे नाही. त्याचा परिणाम मनमानी पद्धतीने पाण्याचा वापर करुन खपाटीला घातलेल्या जायकवाडीच्या महाकाय पोटात यंदा पाणी सोडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या सूत्रानुसार जायकवाडीत अद्यापही १४ टक्क्यांची तूट आहे. आगामी कालावधीत पाऊस न झाल्यास त्यात वाढ होण्याची शक्यताही कायम आहे. अशा स्थितीत तोंडावर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी यंदा पाणी सोडणार की संगमनेरात दहा वर्षांपूर्वी घडलेल्या सामाजिक आंदोलनाची पुनरावृत्ती होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा पश्चिम घाटमाथा म्हणजे पावसाचे आगारच समजले जाते. गोदावरीच्या उर्ध्व खोर्‍यात मोडणार्‍या या परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मान्सून बरसतो. त्याच जोरावर राहुरी तालुक्यातील २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे मुळा, अकोले तालुक्यातील ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमतेचा भंडारदरा, ८ हजार ३२० दशलक्ष घनफूट क्षमतेचा निळवंडे आणि १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा प्रकल्पासह लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प भरले जातात व त्यावर जवळपास ७५ टक्के जिल्ह्याची पिण्याच्या व सिंचनासाठीच्या पाण्याची भूक शमविली जाते.

या व्यतिरिक्त कोसळणार्‍या पावसाचे पाणी पारंपरिक पद्धतीने मुळा व प्रवरा नदीपात्रातून वाहते. हरेगावजवळ मुळा प्रवरेत येवून मिसळते, तर प्रवरासंगम येथे प्रवरा नदी गोदावरीच्या पात्रात विलीन होते. हा प्रवाह पुढे गोदावरीच्या नावाने ओळखला जावून पैठण (जि.छत्रपती संभाजीनगर) जवळील महाकाय जायकवाडी जलायशात जावून विसावतो. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील धरण समूहांमध्ये होण्यार्‍या पावसाचे पाणीही अशाच पद्धतीने नांदूर मधमेश्वर बंधार्‍यात अडवून पुढे गोदावरी पात्रातून सोडले जाते. नाशिक व नगर जिल्ह्यातील याच पाण्यावर १०२ टी.एम.सी. क्षमतेच्या जायकवाडी धरणाचे महाकाय पोट भरले जाते. हा सगळा प्रकार वरच्या भागातील पाण्याची गरज पूर्ण झाल्यानंतर घडत होता. मात्र २००५ साली राज्य विधीमंडळाने सर्व संमतीने मंजूर केलेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे ही स्थिती बदलली.

सन २०१२ साली गणेशोत्सवात जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होता. मात्र मराठवाड्यातील परिस्थिती एकदम उलट होती. सप्टेंबर महिना पावसाचाच असल्याने दुष्काळ जाहीर झालेला नसला, तरीही अवस्था मात्र बिकटच होती. राज्य सरकारला मराठवाड्यातील स्थिती, समन्यायी पाणी वाटप कायदा आणि उर्ध्व गोदावरी भागातील धरणांची स्थिती अवगत असल्याने धरणातील साठे सुरक्षित करण्यात आले होते. अशा स्थितीत संगमनेरचा गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर विसर्जनाच्या नियोजनात मोठा पेच उभा राहिला. शहरातील बहुतेक सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी एकसुरात नदीपात्रात वाहत्या पाण्याशिवाय विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे संगमनेरात दाखल झाले.

सुरुवातीला त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांशी संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती असल्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. मात्र गणेश मंडळे आपल्या भूमिकेवर कायम राहिली. त्यातच अधीक्षक शिंदे यांनी भर बैठकीतच प्रमुख कार्यकर्त्यांना दरडावण्याचा प्रयत्न केला आणि यंदाच्या विसर्जनाचा विषय चिघळणार हे तेथेच ठरले. त्यानुसार घडलेही, पोलिसांनी मंडळांची मागणी झुगारुन ज्यांना मिरवणुका काढायच्या असतील त्यांनी वाजतगाजत काढण्याचे आवाहन केले, त्यासाठी आवश्यक बंदोबस्त देण्याचीही तयारी दर्शविली. मात्र शहरातील एकाही सार्वजनिक गणेश मंडळाने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही.

विसर्जनाच्या दिवशी शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले. पालिकेने नागरी सुविधेसाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली. विसर्जनासाठी फिरत्या तलावाचा आणि मूर्ती संकलनाचाही प्रयोग राबविण्यात आला. मात्र तो पर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांच्या विचारात संगमनेरकरांचेही विचार मिसळलेले होते. त्यामुळे इतके सगळे करुनही त्यावेळी शहरातील केवळ दोन-पाच टक्के नागरिक वगळता छोट्या-मोठ्या दोनशेवर गणेश मंडळांसह संगमनेरच्या पंचक्रोशीतील जवळपास ६० हजार घरगुती गणपतींचेही विसर्जन खोळंबले. त्यानंतर प्रशासनाने मंडळांच्या संयमाची परीक्षाही घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्याप्रमाणे सन १९२९ साली संगमनेरकर हनुमान भक्तांनी दोन महिने मारुतीरायाचा रथ रंगारगल्लीत उभा ठेवला पण ब्रिटीशांसमोर माघार घेतली नाही, त्याप्रमाणे बहुतेक संगमनेरकरही वाहत्या पाण्याचा आग्रह धरुन या आंदोलनात उतरले.

अभूतपूर्व पद्धतीने उद्भवलेला हा प्रसंग प्रशासनासाठी डोकेदुखी ठरु लागला. त्यातून प्रशासनाने मंडळाच्या एकोप्यावरही घाव घालण्याचा, त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयोग करुन पाहिला. काही कार्यकर्त्यांना कायद्याचाही धाक दाखवला गेला. मात्र या कशाचाही या आंदोलनावर परिणाम झाला नाही. त्यामुळे अखेर प्रशासनालाच नमावे लागले आणि गणेशोत्सवाच्या अठराव्या दिवशी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ व्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता सदरचे पाणी संगमनेरात पोहोचले आणि त्यानंतर शहरातील घरगुती गणपतींचे विसर्जन सुरु झाले. पाणी सोडल्याची माहिती आदल्या दिवशीच देण्यात आल्याने परंपरेनुसार मुख्य विसर्जन मिरवणूक सकाळीच सुरु झाली होती. धार्मिक कारणाने प्रशासना विरोधात इतिहासात दुसर्‍यांदा संगमनेरकर एकवटले आणि त्यांनी आपला लढा यशस्वी केला. सन १९२९ च्या हनुमान विजय रथानंतर सन २०१२ सालच्या १९ दिवसांच्या गणेशोत्सवाची इतिहासाने नोंद घेतली.

मात्र त्याच वर्षी गणेशोत्सवानंतर पावसाच्या अभावाने मराठवाड्याची अवस्था अतिशय भयानक झाल्याचे समोर येवू लागले. जनावरांनाही पाजायला पाणी नसल्याने अनेक तालुक्यांमध्ये चारा-पाण्याशिवाय दुभती जनावरं तडफडून गतप्राण झाल्याचे वेदनादायी दृष्यही निसर्गाच्या कोपातून दिसू लागले. पिकं गेली, जनावरंही मेली, आता हातात काय राहीले? असा स्वतःलाच सवाल करीत मराठवाड्यातील अनेक शेतकर्‍यांनी ओसाड झालेल्या आपल्याच रानातील झाडांना फास बांधले. मानवी हृदय पिळवटून निघावे अशी मराठवाड्यातील स्थिती असतांना लातूर सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या जिल्हा मुख्यालयाला पिण्यासाठी रेल्वे वॅगनमधून पाणी वाहून आणावे लागले. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची ‘नाम’ संघटनाही याच काळात मराठवाड्यात जन्माला आली.

माध्यमांद्वारा मराठवाड्यातील ही भयानक स्थिती राज्याच्या घराघरात पोहोचली. त्यामुळे माणसांच्या मनाला पाझर फूटू लागले. मदतीचे ओघ सुरु झाले, पण प्यायला पाणी कोठून आणणार? असा दिव्य प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी पहिल्यांदा समन्यायी पाणीवाटपाच्या कायद्यातील तरतुदी समोर आल्या. गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांनी माध्यमांवरील चर्चा सत्रात वारंवार या कायद्याचा आणि त्यावरील तरतुदींचा ऊहापोह केल्याने २००५ साली मंजूर झालेला कायदा २०१२ मध्ये जनमानसाला समजला. मात्र त्यावेळी त्याला विरोध करण्यासारखी स्थिती नसल्याने राज्य शासनाच्या आदेशाने जिल्ह्यातील भंडारदरा व मुळा धरणासह गोदावरी नदीवरील नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मिळून जवळपास १३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. मात्र मानवतेच्या कारणाने त्यावेळी त्याला कोणताही विरोध झाला नाही.

मात्र २०१२ सालच्या मराठवाड्यातील दुष्काळाने हा कायदा जनतेसमोर आणल्यानंतर नगर व नाशिक जिल्ह्यातील गोदावरी उर्ध्व भागातील नागरीक विरुद्ध जायकवाडी धरणाचे लाभार्थी यांच्यात वाद उभा राहिला. वेळोवेळी तो न्यायालयातही गेला, यापूर्वी दोनवेळा न्यायालयाच्या आदेशाने चक्क पोलीस बंदोबस्तात या धरणांमधून पाणीही सोडावे लागले आहे. यंदाही तशीच स्थिती निर्माण झाली असून यावेळी मात्र खुद्द अहमदनगर न नाशिक जिल्हेच दुष्काळाचा सामना करीत आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणातील एकूण पाणीसाठा ६५ टक्के असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी पाणीसाठा असल्यास राहिलेली तूट वरच्या भागातील (अहमदनगर व नाशिक) धरणांमधून पाणी सोडून ती भरुन काढली जाते.

आज सकाळपर्यंत जिल्ह्यातील धरणांची स्थिती पाहता मुळा धरणात २० हजार ७४५ दशलक्ष घनफूट (७९.७९ टक्के), भंडारदरा (ओव्हर फ्लो), निळवंडे ६ हजार ८५९ दशलक्ष घनफूट (८२.३६ टक्के), आढळा व भोजापूर (ओव्हर फ्लो) इतका पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील, पाणलोटातील व मराठवाड्यातील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. त्यातच जायकवाडी धरणाचा आज एकूण पाणीसाठा अवघा ५१.०६ टक्के असून उपयुक्त पाणीसाठा ३४.४२ टक्के आहे. याचाच अर्थ समन्यायी पाणी वाटपानुसार जायकवाडी धरणात अद्यापही १४ टक्के पाण्याची तूट आहे, १५ ऑक्टोबरपर्यंत या स्थितीत बदल न झाल्यास जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडून ती भरुन काढावीच लागणार आहे. म्हणूनच निळवंडे धरणातून सुरु असलेले आवर्तनही आता थांबवण्यात आले आहे. अशा स्थितीत विसर्जनाच्या कारणासाठी पाणी सोडण्यास प्रशासन अनुकूल होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


वाहत्या पाण्यातच विसर्जनाची मागणी करीत सन २०१२ साली तब्बल १९ व्या दिवशी संगमनेरातील श्रींचे विसर्जन पार पडले होते. तशीच स्थिती पुन्हा एकदा २०१४ सालीही निर्माण झाली होती. विसर्जनाच्या आदल्या दिवसापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्याने मंडळांनी पुन्हा एकदा विसर्जन न करण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र यावेळी प्रशासनाने तत्काळ बोध घेत मध्यरात्री १२ वाजता धरणातून पाणी सोडले, दुसर्‍या दिवशी सायंकाळी ५ वाजता ते संगमनेरात पोहोचल्यानंतर संगमनेरातील विसर्जन सोहळा सुरु झाला होता.

Visits: 17 Today: 1 Total: 82673

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *