श्रीरामपूरमध्ये सापडलेला गुटखा ‘निमगाव जाळीतूनच’ गेला होता! पोलीस गुटखा तस्करीवरील पडदे हटवित असताना ‘अन्न व भेसळ’ विभाग गप्प कसा?

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील गुटखा तस्करीचे वलय उघडे करणार्या श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गुटखा कारवाईत आता रोजच नवनवीन खुलासे होवू लागले आहेत. गुरुवारी पोलिसांनी या कडीत आणखी दोघांना ताब्यात घेतले असून त्यातील एक निवृत्त शासकीय अधिकारी तर दुसरा एकलहरेच्या गुलाब बागेचा मूळमालक आहे. विशेष म्हणजे ‘तो’ साठा निमगाव जाळीतूनच तेथे पोहोचला होता. त्यामुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करीत संगमनेर तालुक्यातील संतोष डेंगळेच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे गुटखा तस्करीवरुन संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालेले असताना यावर नियंत्रणाची मुख्य जबाबदारी असलेल्या अन्न व भेसळ विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांची आत्तापर्यंतची चुप्पी खूप काही सांगून जाणारी असून पोलिसांनी गुटखा तस्करांसोबतच त्यांना पाय पसरण्यासाठी अर्थपूर्ण प्रोत्साहन देणार्यांचीही पाळेमुळे खोदण्याची गरज आता व्यक्त होत आहे.

राज्यात गुटख्याचे उत्पादन, त्याची साठवणूक, वितरण व विक्रीला पूर्णतः बंदी आहे. त्यामुळे जिल्ह्यात कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने गुटखा आणला जातो व जवळपास दुपटीपेक्षा अधिक किंमतीने सर्रास विकलाही जातो. यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याने संबंधितांचे हातही ओले केले जातात. त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या गुटखा तस्करीच्या या जाळ्यावर आजवर यंत्रणांची नजर पडली नव्हती. पण एकलहरे प्रकरण मात्र जिल्ह्यातील या सर्वात मोठ्या उलाढालीच्या बेकायदा व्यवसायावर प्रकाश टाकणारे ठरले आहे. अर्थात हे प्रकरण इतके तापेल याची पुसटशीही कल्पना नसल्याने सुरुवातीला कारवाई करणार्या अधिकार्यांनीही ‘परंपराच’ पाळली होती, मात्र सदरचा विषय थेट नाशिक दरबारी पोहोचल्याने अखेर यामागील वास्तवाचे दर्शन घडायला सुरुवात झाली आहे.

या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास करणारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी या प्रकरणावरील सुरुवातीचा पडदा उठविल्यानंतर इतर पडदे झाकण्यासाठी शर्थ केल्याचेही आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळेच त्यांच्यावरील संशय बळावल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी गुटखा प्रकरणातून त्यांना बाजूला सारीत शिर्डीचे उपविभागाीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविली आणि गेल्या चारच दिवसांत या प्रकरणातील धक्कादायक दुवे समोर येवू लागले आहेत.

सुरुवातीचे तपासी अधिकारी पो.नि.बहिरट यांनी एकलहरेत छापा घातल्यानंतर त्या गोदामाच्या मालकाचा शोध घेण्यासाठी आठवडा घालवला, तर त्याच ठिकाणी दुसर्या एका खोलीत सापडलेल्या गुटख्याचा मालकच त्यांना सापडला नव्हता. मात्र पोलीस उपअधीक्षकांनी बहिरट यांनी शिल्लक ठेवलेले काम अवघ्या 48 तासांतच पूर्ण केले असून एकलहरेतील ‘त्या’ गुलाबबागेचा मूळ मालक असलेल्या अरुण गांगुर्डेसह श्रीरामपूर बस आगारात अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या व सध्या निवृत्तीच्या जीवनात गुटखा तस्करी करणार्या अन्सार आजम शेख यालाही ताब्यात घेतले आहे. अरुण गांगुर्डे याने एकलहरेतील आपली शेतजमीन करीम शेख याला ‘नोटरी’ करुन कसायला दिली होती, मात्र त्या कागदावरील नावात खाडाखोड असल्याचे निरीक्षण पोलीस उपअधीक्षक सातव यांनी नोंदविल्यानंतर जागेचा मूळमालक गांगुर्डे ताब्यात येण्यासोबतच बहिरटांचा आणखी एक कारनामाही उघड झाला.

या तपासातून एकलहरेत सापडलेला एकूण 65 लाखांहून अधिक किंमतीचा गुटखा संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळीच्या संतोष ज्ञानदेव डेंगळे या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हिरा गुटख्याच्या तस्कराने व्हाया कोल्हार तेथे पोहोचविल्याचेही आता तपासातून समोर आले आहे. मात्र त्याने पो.नि.बहिरट यांनी ठेवलेल्या सापटीचा आधार घेत यापूर्वीच जिल्हा न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविल्याने तो सध्या तपासापासून दूर आहे. मात्र गुरुवारी रात्री ताब्यात घेण्यात आलेल्या आझम शेख या संशयिताकडून या दोन्ही ठिकाणी सापडलेला गुटखा कोणी व कधी पाठवला यावरील पडदा आता दूर होण्यास मदत मिळणार आहे.

जिल्ह्यातील गुटखा तस्करीचे वलय शोधताना पोलीस उपअधीक्षक सातव यांनी संगमनेर-बेलापूर-एकलहरे अशी साखळी समोर आणली असून बेलापूरचा जावई असलेला संगमनेरचा गुटखा तस्कर संतोष डेंगळे सासर्याच्या मदतीने एकलहरेत गुटखा पोहोचवित. तेथून एकलहर्याचे तिघे बंधू श्रीरामपूर तालुक्यात रातोरात त्याचे वितरण करीत. एकलहरेतील गुटख्याचे गोदाम गुलाबाच्या बागेत असल्याने गुटखा वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या वाहनाच्या आतील भागात गुटख्याच्या बॅगा व बाह्य बाजूस गुलाबाच्या गोण्या भरल्या जात असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांच्या तपासातून अजून बरेच काही उघड होणे बाकी असून अद्यापपर्यंत तपासाची गाडी संगमनेरातील गुटखा माफियांपर्यंत पोहोचलेली नाही, त्यामुळे सध्या ते ‘पांडव’ सैरभैर आहेत.

फक्त फायद्याची कारवाई करणारा विभाग म्हणून जिल्ह्यातील अन्न व भेसळ या खात्याची ओळख अलिकडच्या काळात घट्ट झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून गुटखा प्रकरणाने अवघ्या जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघालेले असताना प्रत्यक्षात गुटखा तस्करांवर कारवाईची मुख्य जबाबदारी असलेला हा विभाग मूग गिळून बसला आहे. अर्थात आम्ही त्यावरही प्रकाश टाकणारच आहोत, मात्र पोलिसांनीही आपल्या अधिकार्याना दोषी ठरवण्यासोबतच ‘साव’ बनून बघ्याची भूमिका घेणार्या या विभागातील गलेलठ्ठ झालेल्या अधिकार्यांच्या सहभागाची आणि मालमत्तेची चौकशीही करण्याची गरज आहे. अन्यथा सदरची कारवाई परिपूर्ण होणार नाही.

