पिंपळवाडी तीन नव्हे तर सात दिवस ‘लॉकडाऊन’!

नायक वृत्तसेवा, राहाता
शिर्डी शहरालगत असलेल्या पिंपळवाडी गावात कोरोनाने उच्छाद मांडल्यानंतर अखेर पंधरा दिवसांनंतर सरकारी यंत्रणेला जाग आली आहे. कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि प्राथमिक लक्षणे जाणवत असलेल्या पन्नास व्यक्तींची राहाता व पुणतांबे ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्ण आढळलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करुन लॉकडाऊनचा कालावधी तीन ऐवजी सात दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

गेल्या पंधरा दिवसांतया पिंपळवाडी गावात कोविडचे रुग्ण सातत्याने वाढत होते. सरकारी यंत्रणेने तत्परतेने हालचाल करून रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या कोविड चाचण्या करायला हव्या होत्या. वेळीच विलगीकरणाला प्राधान्य दिले असते, तर कदाचित ही वेळ आली नसती, अशी भावना येथील जाणकार ग्रामस्थांनी व्यक्त केली. लक्षणे आढळलेल्या रुग्णांनी सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहता, खासगी दवाखान्यात उपचार घेतले. परिस्थितीचे गांभीर्य सरकारी अधिकार्‍यांच्या लक्षात आले नाही. रुग्णसंख्या आटोक्यात येईनाशी झाल्यानंतर कालपासून गाव लॉकडाउन करण्यात आले. मात्र, तरीही रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या करण्यात आल्या नाहीत, हे विशेष म्हणावे लागेल. माध्यमांनी या परिस्थितीकडे लक्ष वेधल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के व गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी गावास भेट दिली. गावात घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात 85 जणांच्या कोविड चाचण्या कराव्या लागतील, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, रॅपिड अँटिजेन किट शिल्लक नाहीत. त्यामुळे पन्नास व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या राहाता व पुणतांबे येथील ग्रामीण रुग्णालयात केल्या जाणार आहेत. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतरच कोरोनाचा फैलाव किती झाला आहे हे स्पष्ट होणार आहे.

Visits: 205 Today: 3 Total: 1592410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *