संगमनेर शहराच्या सुशोभिकरणाला विकृतींचे गालबोट! पुलावरील फुलदाण्यांची मोडतोड; झोपडपट्टीतील विकृतांचे कृत्य असल्याचा संशय..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहर सुशोभिकरणाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या करातून मिळणारा लाखो रुपयांचा महसूल पाण्यासारखा खर्च केला जात असताना शहरात बेकायदा वस्त्या करुन राहणार्या टुकारांकडून मात्र त्याला वारंवार गालबोट लावले जात असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी हिंदू धर्मियांची स्मशानभूमी असो, अथवा प्रवरा नदीचे सुशोभिकरण या सर्वांवर अशा विकृतांनी आपल्या दुष्कृत्यांची मोहोर उमटवल्यानंतर आता विजयादशमीच्या दिनी म्हाळुंगी नदीच्या पुलावर ठेवण्यात आलेल्या हजारों रुपये किंमतीच्या फुलदाण्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे. सदरचा प्रकार चक्क म्हाळुंगी नदीपात्रातच राजेशाही इमले बांधून ‘बिनधास्त’ राहणार्या टोळक्यांनी केल्याचा संशय असून नागरी पैशांची नासधूस करणार्या अशा विकृतींवर कायद्याची जरब बसण्याची आवश्यकता आहे, मात्र याबाबत कोणाविरोधात तक्रार देणार? असे अजब उत्तर सर्वाजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे.

मागील काही वर्षांपासून संगमनेर शहराच्या सुशोभिकरणासाठी संगमनेर नगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी संगमनेरकरांना फिरण्यासाठी एकमेव ठिकाण असलेल्या प्रवरा नदीपात्रालगतच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले होते. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन संरक्षक जाळ्या, बसण्यासाठी बाके आणि आकर्षक झाडांची लागवडही करण्यात आली होती. मात्र सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत शहरातील काही विकृतींनी बाकांची मोडतोड करीत संरक्षक जाळ्यांच्या मधल्याभागातील नक्षीदार काम असलेले भाग तोडून नेले. असंख्य झाडांची नासधूसही करण्यात आली.

याच कालावधीत हिंदू धर्मियांच्या स्मशानभूमीचेही सुशोभिकरण करण्यात आले होते. त्यासाठीही जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. अमरधाममध्ये नव्याने न्हानीगृह बांधून त्यात शॉवरसारख्या सुविधाही देण्यात आल्या होत्या. पण सुशोभिकरणाचे काम पूर्ण होताच परिसरातील काही टवाळखोरांनी नव्याने बसविण्यात आलेल्या नळांच्या तोट्यांसह येथील शॉवर्सही काढून नेले. त्यावर पालिकेकडून कोणावर गुन्हेही दाखल झाले नाहीत, आणि अशा विकृतींचा बिमोड करण्याचा प्रयत्नही केला गेला नाही. मात्र कोटी रुपये खर्चून अवघ्या पंधरा वर्षांपूर्वी सुशोभिकरण करुनही पालिकेने चालू वर्षात पुन्हा त्यासाठी सव्वाकोटीहून अधिक रुपयांची उधळण केली आहे

शहर सुशोभिकरणाच्या प्रक्रीयेत संगमनेर नगरपालिकेने वेगवेगळ्या प्रभागांमध्ये उद्यानांची निर्मिती केली. त्यासाठी झालेला एकूण खर्च काही कोटींच्या घरात आहे. मात्र आजच्या स्थितीत त्यातील निम्म्याहून अधिक उद्यानांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या उद्यांनाचा लाभ आता व्यसनी लोकांना होत आहे. अडगळीत असलेल्या काही उद्याने तर अश्लिल लिलांचे केंद्रही ठरले आहेत. मात्र त्याकडे लक्ष द्यायला कोणाकडेही वेळ नसल्याचे भयानक वास्तवही वेळोवेळी समोर आले आहे. पालिकेकडून नागरिकांसाठी सुविधा निर्माण केल्या जात असताना त्या सुरक्षित रहाव्यात यासाठी कोणत्याही उपाययोजना नसल्याने अथवा अशा ठिकाणांच्या सुरक्षेसाठी नेमकी व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या करातून मिळालेल्या कोट्यावधी रुपयांची डोळ्यादेखत माती होतांना पाहून नागरिकांमधून आश्चर्यही व्यक्त होत आहे.

आता या साखळीत सार्वजनिक बांधकाम विभागाचाही प्रवेश झाला असून असाच प्रकार समोर आला आहे. विभागाकडून सध्या ‘संथगतीने’ कोल्हार-घोटी राज्यमार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. मागील अनेक दिवसांपासून रडतखडत सुरु असलेल्या या कामाने प्रवाशांना मोठा मनस्तापही सहन करावा लागत आहे हा भाग वेगळा. या मार्गावर संगमनेर शहरानजीक म्हाळुंगी नदीवर दुहेरी स्वरुपाच पुलही आहे. हा संपूर्ण रस्ताच खड्डेमय असतांना बांधकाम विभागाने या पुलाच्या सुशोभिकरणाचे काम मात्र अतिशय जलदगतीने पुर्णत्त्वास नेले आहे. या पुलावरील रस्त्यावर अद्यापही खड्ड्यांचे साम्राज्य असताना पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे उभारण्यात आले असून त्यांना रंगरंगोटीही करण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता.15) विजयादशमीच्या अनुषंगाने सीमोल्लंघनासाठी हजारो नागरिक हा पुल ओलांडून जाणार हे माहिती असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या काही दिवसांत केवळ या पुलाच्या कामाची गती वाढवली. शुक्रवारी सकाळीच पुलाच्या मध्यभागी सुमारे आठ ते दहा आकर्षक उभ्या फुलदाण्याही मांडण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा रस्ता अतिशय देखणा दिसू लागला होता. सायंकाळी सीमोल्लंघनासाठी जाणार्या हजारों नागरिकांनी या कामाचे कौतुकही केले. मात्र रात्र होता होता याच भागात चक्क म्हाळुंगी नदीच्या पात्रातच कोठून कोठून आलेल्या आणि या शहराविषयी कोणत्याही भावना नसलेल्या काही टवाळखोरांनी त्यांतील जवळपास निम्म्याहून अधिक फुलदाण्या अक्षरशः फोडून टाकल्या. आज सकाळी ही गोष्ट समोर आल्यानंतर ते पाहणार्या संगमनेरकरांच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. खरेतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या विकृत कृत्याची गांभिर्याने दखल घेवून फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे. मात्र नुकसान झाले तरच कामे होतील, आणि कामे झाली तरच कमिशन खाता येईल अशीच या विभागाची भूमिका असल्याचेही समोर आले आहे.

अवघ्या 24 तासांपूर्वी म्हाळुंगी नदीच्या पुलावर ठेवण्यात आलेल्या हजारो रुपये किंमतीच्या आकर्षक फुलदाण्या होत्याच्या नव्हत्या झालेल्या पाहून काही पत्रकारांच्या भावना तीव्र झाल्या. त्यातील काहींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत कळविल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद धक्कादायक होता. ‘कोणीतरी फुलदाण्या फोडल्या आहेत, याची माहिती मिळाली. पण आम्ही कोणतीही तक्रार करणार नाही. पुन्हा नव्याने दुसर्या फुलदाण्या बसविल्या जातील’ असे उत्तर कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांनी दिले. खरेतर म्हाळुंगी नदीपात्रात बेकायदा झोपड्या बांधून राहणारे कोण आहेत? ते कोठून आले आहेत? या भागात राहणार्या अनेकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यांना पाठीशी घालून त्यांचे उदात्तीकरण नेमके कशासाठी? कोणाच्या दबावाने? असे अनेक प्रश्न या विकृत घटनेतून निर्माण झाले आहेत.

