आरोपांच्या राजकारणाला विखेंचा ‘रोखठोक’ आरसा! रोहित पवारांनी भूमिकेचा हिशेब द्यावा; सुजय विखेंचे तीन बोचरे सवाल..

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ उकलले गेले पाहिजे, त्यामागील प्रत्येक शक्यतेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, एखाद्या संवेदनशील दुर्घटनेच्या चौकशीची मागणी करताना पुराव्यांपेक्षा राजकीय संशयांना अधिक महत्त्व दिले जाऊ लागले, तर त्या भूमिकेच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेले प्रत्युत्तर याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यापूर्वी रोहित पवार यांनी स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे, असा थेट आणि परखड सवाल उपस्थित करीत विखे यांनी आरोपांच्या राजकारणाला जणू आरसाच दाखविला आहे.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या आरोपांचा समाचार घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ राजकीय प्रत्यारोपांवर भर न देता रोहित पवार यांच्या भूमिकेतील तीन महत्त्वाच्या विसंगती अधोरेखित केल्या. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेला केवळ पक्षीय प्रत्युत्तर म्हणून बाजूला सारता येणार नाही. उलट, दुर्घटनेच्या चौकशीच्या निमित्ताने सुरु असलेल्या राजकीय चर्चेला त्यांनी काही मूलभूत प्रश्नांच्या चौकटीत आणले आहे.

डॉ. विखे यांनी उपस्थित केलेला पहिला सवाल थेट रोहित पवार यांच्या आक्रमकतेवर बोट ठेवणारा आहे. अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली आहे, हे आधी स्पष्ट व्हायला नको का? शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची भूमिका काय आहे, हे समोर येण्यापूर्वी रोहित पवार एवढ्या आक्रमकपणे पुढे का येत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हा प्रश्न केवळ राजकीय टोला नाही. एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्या घटनेच्या चौकशीच्या मागणीला राजकीय संघर्षाचे स्वरुप प्राप्त होणे कितपत योग्य आहे, याचा विचार करण्यास भाग पाडणारा आहे. अपघाताबाबत शंका असतील तर त्या नक्कीच मांडल्या पाहिजेत; परंतु त्या शंकांना अधिकृत आधार आणि संबंधितांची स्पष्ट भूमिका असणेही तितकेच आवश्यक आहे, हा विखे यांच्या प्रश्नांमागील आशय आहे.

विखे यांनी उपस्थित केलेला दुसरा सवाल रोहित पवार यांच्या तपास यंत्रणांबाबतच्या भूमिकेतील कथित विरोधाभास उघड करणारा आहे. सहा महिन्यांपूर्वी ईडीच्या कारवाईच्या वेळी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांवर अविश्वास व्यक्त केला जात होता. मग आता अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी सीआयडीऐवजी सीबीआय तपासाची मागणी करताना याच सीबीआयवर विश्वास कसा निर्माण झाला? तपास यंत्रणांबाबतची भूमिका बदलण्यामागचे नेमके कारण काय? असा थेट सवाल विखे यांनी केला.

तपास यंत्रणांवरील विश्वास हा राजकीय सोयीनुसार बदलणारा निकष असू शकत नाही. एखादी यंत्रणा आपल्या भूमिकेला अनुकूल निर्णय घेत असेल तर तिच्यावर विश्वास आणि प्रतिकूल कारवाई झाली की तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, अशी भूमिका स्वीकारली गेली तर निष्पक्ष तपासाच्या मागणीतील नैतिक बळच कमकुवत होते. विखे यांनी याच मुद्द्याला हात घालत रोहित पवार यांना त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेची आठवणही करुन दिली आहे.

रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र दाखवून संशय व्यक्त केल्याच्या मुद्द्यावर विखे यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. केवळ एखाद्या व्यक्तीसोबत छायाचित्र आहे म्हणून त्यांच्यात काही संशयास्पद संबंध असल्याचा निष्कर्ष काढता येतो का? असा ठोक सवाल करत त्यांनी प्रतिप्रश्नांची सरबत्तीच केली. रोहित पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे छायाचित्र दाखवून त्यांच्याबाबतही असेच प्रश्न उपस्थित करायचे का? राहुल गांधी ज्या अदानी यांच्यावर सातत्याने आरोप करतात, त्यांच्याच गाडीचे सारथ्य करतानाचे छायाचित्र दाखवून रोहित पवारांना जाब विचारायचा का? असे सवाल उपस्थित करत विखे यांनी छायाचित्रांच्या आधारे संशयाचे राजकारण करण्यातील विसंगती उघडी पाडली.

राजकारणात सार्वजनिक व्यक्तींचे अनेकांबरोबर छायाचित्रे असणे ही सामान्य बाब आहे. मात्र, त्या छायाचित्रांच्या आधारे संबंधांचे अर्थ लावून गंभीर आरोप करणे आणि ते सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. विखे यांनी याच फरकाची जाणीव करुन देत केवळ छायाचित्रांच्या राजकारणाला ठोस प्रत्युत्तर दिले.

अजित पवार हे आमचे नेते होते. त्यांच्याबद्दल आम्हाला मनापासून आदर आहे. त्यांच्या निधनाचे राजकारण होऊ नये, हीच आमची भूमिका आहे, असे स्पष्ट करत विखे यांनी या प्रकरणातील संवेदनशीलतेवरही भर दिला. विमान अपघाताबाबत कोणतीही शंका असेल तर निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. आवश्यक पुरावे, व्हिडिओ आणि उपलब्ध माहिती तपास यंत्रणांसमोर आणली पाहिजे. मात्र, चौकशीच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांना विनाकारण लक्ष्य करणे योग्य नाही, अशी त्यांची ठाम भूमिका होती.

अपघाताबाबत ठोस पुरावे असतील तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागावी आणि आवश्यक असल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत. केवळ माध्यमांसमोर आरोपांची सरबत्ती करुन कोणालाही दोषी ठरविता येत नाही. माध्यमे ही जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचे माध्यम आहेत; ती न्यायाधीश नाहीत, असे सांगत विखे यांनी आरोपांच्या राजकारणाला कायदेशीर प्रक्रियेची चौकटही दाखवून दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशाच पद्धतीने विनाकारण आरोप केले गेले, तर यापुढे ते खपवून घेतले जाणार नाहीत. पक्ष म्हणूनच नव्हे, तर वैयक्तिक पातळीवरही आपण ठाम भूमिका मांडू, असा स्पष्ट इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. त्यांच्या या विधानातून मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची त्यांची भूमिका स्पष्ट झाली. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य समोर येणे हीच सर्वांची अपेक्षा असली पाहिजे. त्यासाठी निष्पक्ष तपास, पारदर्शक प्रक्रिया आणि उपलब्ध पुराव्यांची शास्त्रशुद्ध पडताळणी आवश्यक आहे. मात्र, या प्रक्रियेला राजकीय आरोप-प्रत्यारोपांची जोड देऊन तपासाचा रोखच भरकटविण्याचा प्रयत्न होऊ नये. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे तपासातून मिळाली पाहिजेत; त्याचवेळी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकेचीही कसोटी लावली पाहिजे, हा सुजय विखे यांच्या प्रत्युत्तराचा केंद्रबिंदू आहे.

राजकारणात आरोप करणे सोपे असते; पण त्या आरोपांना पुराव्यांची जोड देणे आणि स्वतःच्या भूमिकेतील विसंगतींची उत्तरे देणे अधिक महत्त्वाचे असते. विखे यांनी उपस्थित केलेले सवाल आता रोहित पवार कोणत्या शब्दांत परतवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तूर्तास, अजितदादांच्या अपघाताच्या तपासापेक्षा राजकीय आरोपांची चर्चा अधिक रंगू नये, एवढीच अपेक्षा.

Visits: 3 Today: 3 Total: 2367676
